My title My title
Brain Storming

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग



समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख आणि शहाण्या माणसाची लक्षणं सांगताना ‘आपली आपण करी स्तुती……तो येक मूर्ख ||’ असं सांगितलं आहे.

समर्थ सांगतात कि लोकांनी स्वतःची स्तुती करू नये कारण असे करणे म्हणजे स्वतःची एक प्रकारची जाहिरातच केल्यासारखं होईल. आणि ते मूर्खपणाचे लक्षण आहे.

पण आज जर समर्थ रामदास पृथ्वीवर अवतरले तर त्यांना खूपच वेगळं चित्र बघायला मिळेल.  इतरांपेक्षा आपणच कसे चांगले हे पटवून देण्याऱ्या लाखो जाहिराती त्यांना  ठिकठिकाणी बघायला मिळतील. या जाहिराती म्हणजे मार्केटिंगचाच एक भाग आहे.

स्पर्धेच्या युगात व्यवसायात प्रगती करण्यासाठी मार्केटिंगशिवाय पर्याय नाही. आपण विकत असलेली वस्तू किंवा सेवा अतिउत्तम असली तरी तेव्हढ्याने भागत नाही. 

त्या वस्तूची सविस्तर माहिती सतत लोकापर्यंत पोहचवून विक्री वाढवण्याचं महत्वाचं काम मार्केटिंग करत असते. विक्री वाढवायची असेल तर मार्केटिंग आवश्यकच. मार्केटिंग विक्रीसाठी पायघड्या (पायदान)टाकत असते. 

त्या पायघड्यावरच विक्री पुढं पुढं जात असते. मार्केटिंगचे इतर अनेक फायदे आहेत.

व्यवसायाचं उद्योगविश्वात नाव वाढवण्यासाठी, मार्केटमध्ये काय स्थिती आहे हे माहित करून घेण्यासाठी, ग्राहकांमध्ये वस्तू-सेवाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी, स्पर्धकाची माहिती मिळविण्यासाठी  आणि  ग्राहकाना समजून घेण्यासाठी मार्केटिंग आवश्यक आहे.

बदलत्या युगात मार्केटिंगच्या तंत्र आणि मंत्रात आमूलाग्र बदल घडले आहे. काही दशकांपूर्वी मार्केटिंग ‘प्रोडक्ट ओरियन्टेड’ होती.  म्हणजे आहे त्या तयार वस्तू बाजारामध्ये विकल्या जायच्या. 

ग्राहकाच्या आवडी-निवडी महत्वाच्या नव्हत्या. कालांतराने त्यामध्ये बदल होऊन आज ‘कस्टमर ओरिएंटेड’ मार्केटिंग म्हणजे ग्राहकाच्या आवश्यकतेप्रमाणेच माल तयार करून तो बाजारामध्ये विक्री होतं आहे.

ग्राहकराजा आता उद्योगाच्या केंद्रस्थानी आहे.  कोणत्याही व्यवसायामध्ये मार्केटिंग ह्रदयाप्रमाणे सर्व विभागांना रक्तामार्फत प्राणवायूचा पुरवठा करून त्यांना सतत कार्यान्वित ठेवण्याच महत्वाचं काम करत असते.

अमेरिकन लेखक फिलिप कोटलर ज्यांनी मार्केटिंगवर अनेक पुस्तक लिहिली त्यांना ‘फादर ऑफ मार्केटिंग’ असे म्हणतात.  पंतप्रधान मोदीजींना नुकताच ‘फिलीप कोटलर’ अवॉर्ड  देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

डिजिटल क्रांतीमुळे मार्केटिंगमध्ये बदल होणे साहजिक होते.  इंटरनेटमुळे जगाला खेड्याच रूप आलं.  वाढत्या स्मार्टफोन व समाजमाध्यमामुळे आपसातील संवादाला अफाट गती प्राप्त झाली.

मोबाईल व इंटरनेटचे वाढते प्रस्थ बघून सर्वच वस्तू इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. आज जन्मापासून अंतिम संस्कारासाठी सर्व जीवणोपयोगी  वस्तू इंटरनेटवर ऑन-लाईन उपलब्ध आहे. भारतात स्मार्टफोन धारकाची संख्या ४० कोटी आहे.

प्रत्येक ग्राहक सतत स्क्रीनशी जुळल्यामुळे विक्रेत्याला इंटरनेट व मोबाईलवर जाहिरात करणे क्रमप्राप्त झाले आहे.  कंप्युटर, इंटरनेट व मोबाईलसारख्या डिजिटल उपकरनाद्वारे केल्या जाणाऱ्या जाहिरातीलाच ‘ डिजिटल मार्केटिंग’ असे म्हणतात.

आज सगळीकडे डिजिटल मार्केटिंगची चर्चा होत असली तरी याची सुरुवात कित्येक वर्षांपूर्वी झाली आहे.  डिजिटल मार्केटिंगची सुरुवात कुणी केली या बद्दल भिन्न मतं आहेत.

गुग्लियीमो मार्कोनीने रेडिओचा शोध लावला मग त्यावर येणाऱ्या जाहिराती ह्या डिजिटल मार्केटिंगची सुरुवात असा माननारा एक वर्ग आहे. तर १९७१ मध्ये स्वतःलाच पहिला ई-मेल  पाठवणारा रे टोमलिंसनलासुद्धा डिजिटल मार्केटिंगचा जनक माननारा एक वर्ग आहे.

त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हि संज्ञा जरी खूप नंतर आली पण त्याची सुरुवात खूप पूर्वी झाली असं समजायला हरकत नाही. अस असलं तरी खरी डिजिटल मार्केटिंगची सुरुवात १९९० मध्ये इंटरनेटवर पहिला सर्च इंजिन आलं तेंव्हा पासून झाली.

त्यानंतर काही वर्षांनी वेबची सुरुवात झाली. १९९३ मध्ये पहिली जाहिरात इंटरनेटवर झळकली. वेबसाईटवर जाहिरात करणारी ‘हॉटवायर्ड’ पहिली कंपनी ठरली. १९९४ मध्ये याहू त्यानंतर हॉटबॉट, लुकस्मार्ट आणि अलेक्सा अवतरल्या. 

या विविध टूलमुळे आपली वेबसाईट सर्वात वर दिसावी म्हणून ‘सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन’  हा प्रकार सुरू झाला. जगविख्यात गुगलने १९९४ मध्ये या क्षेत्रात प्रवेश केला आणि डिजिटल मार्केटिंगला उसंत मिळाली.

वर्ष २००० नंतर गुगलच्या एडवर्ड तसेच वर्डप्रेसचा इंटरनेटवर प्रवेश झाला. अमेरिकेतील विविध उद्योगाची सविस्तर लिखित माहिती तयार करून ती वेबसाईटवर टाकण्याचे काम वर्डप्रेस करत असे.



डिजिटल मार्केटिंग का?

इतर माध्यमाच्या तुलनेने डिजिटल मार्केटिंग करणे खूप स्वस्त आहे. त्यासाठी खूप पैसे खर्च करावा लागतो असे नाही.  मोठया उद्योगापासून अगदी गल्लीतील लहान दुकानदार डिजिटल मार्केटिंग करून आपला व्यवसाय वाढवू शकतो.

आपली सुंदर वेबसाईट तयार करून ती माहिती ग्राहकापर्यंत सहज पोहचवू शकतो.  आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणचे ग्राहकांचा प्रतिसाद व प्रतिक्रिया काय याचा अंदाज बांधता येतो. 

ठराविक क्षेत्रातील, ठराविक वयोगटातील, विशिष्ट क्षेत्रातील ग्राहक, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडीच्या वेबसाईट्स आणि त्यांच्या सोयीच्या वेळाच पक्का अंदाज बांधून कमी खर्चात डिजिटल मार्केटिंग आपण करू शकतो.

असं करणं म्हणजे मशीनगन न वापरता रायफलने निशाणा साधल्या सारखा प्रकार आहे. 



डिजिटल मार्केटिंगचे ५० पेक्षा जास्त टूल आज उपलब्ध आहेत पैकी काही महत्वाचे टूल्स खालील प्रकारे –

  • फेसबुक : डिजिटल मार्केटिंगमध्ये फेसबुक सर्वांच्या आवडीचं टूल आहे. फेसबुक पेज तयार करून, आपल्या वस्तू-सेवेचा नेमका ग्राहक, ठिकाण, खर्चाचा बजेट याच गणित करून फेसबुकवर कमी किमतीत जास्त जाहिरात होऊ शकते.


  • गुगल अडवर्ड : हे टूल पूर्णतः कि-वर्डवर अवलंबुन आहे. तुमच्या व्यवसाय किंवा ब्रँडच नाव स्पर्धकांच्या आधी समोर यावं यासाठी यावर बोली लावली जाते. त्यानुसार गुगलला पैसे मिळतात.


  • गुगल अनालीटिक्स: गुगलचं हि फ्री सर्विस आहे. याद्वारे गुगलला कोणत्या पेजला कोणते ग्राहक, किती वेळ व्हिजिट, तिथे किती वेळ थांबतात हे माहित पडतं. त्यामुळे आपला संभाव्य ग्राहक कोण याची माहिती मिळते.


  • इंटरनेट मार्केटिंग : हा सर्वांच्या परिचयाचा ऑन-लाईन मार्केटिंग प्रकार आहे. विविध वस्तूच्या जाहिराती इंटरनेटवर दर्शवून त्या विकणे.


  • व्हिडीओ मार्केटिंग : विविध वस्तू किंवा सेवा उपभोगत असलेल्या ग्राहकांचा व्हिडीओ, टेस्टीमोनी युट्युबवर दाखऊन त्याची जाहिरात करणे.


  • कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेन्ट : आपल्या ग्राहकांचा डाटा तयार करून सतत त्यांच्याशी भावनिक संवाद साधणे, डाटा नियमित अपडेट करणे, नवीन वस्तू त्यांना ऑफर करणे इ.


  • डाटाबेस काँटॅक्टस :ग्राहकाला टेली-कॉलिंग करणे तसेच एसएमएस पाठवणे.


  • पीपीसी: म्हणजे पे पर क्लिक. आपल्या वेबसाईटवर जेव्हडे क्लिक होतील त्यानुसार आपल्याला पैसे लागतील, असा हा प्रकार.


  • डाटा मायनिंग : आपल्याकडे असलेल्या डाटा योग्य प्रकारे तपासून उत्कृष्ट मार्केटिंग आखणे. कोणत्या ग्राहकाला विक्री होत आहे तो डाटा तयार करणे.


  • सोशलमेडिया : फेसबुक, ट्विटर, पीइंट्रेस्ट, इंस्टाग्राम, लिंकडिन आणि युट्युबच्या जाहिराती या सोशलमेडिया जाहिराती असतात.


  • लिंक बिल्डिंग : आपल्या ग्राहकाला ओळखून त्याच्या संबंधित लिंक शेअर करून त्यामध्ये आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करणे.


  • अफिलीयेटेड मार्केटिंग : आपला ब्लॉग तयार करून त्यामध्ये ‘कि-वर्ड’ चा उपयोग करून आपण पैसे कमवू शकता.

आजघडीला एव्हडे टूल उपलब्ध असले तरी ग्राहकाच्या बदलत्या आवडीनुसार त्यामध्ये सतत बदल होत आहेत.



मार्केटिंग आणि युद्धात जास्त फरक नाही.  

ग्राहकाचा चार इंचाच मेंदू जिंकण्यासाठी सर्व कंपन्या युद्धाप्रमाणे मार्केटिंग करत असतात.

युद्धात ज्याप्रमाणे भूदल, जलदल व वायुदल  आणि युद्ध जिंकण्यासाठी शेकडो शस्त्र असतात, त्याचप्रमाणे मार्केटिंगमध्ये लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत असतात. 

जसेकी वृत्तमानपत्र, टेलेकॉलिंग, टीव्ही, होर्डिंग, पांप्लेट, बूथ कॅम्पेन व डिजिटल जाहिरातीचा उपयोग होतो. शेवटी कोणत्या ग्राहकांसाठी कोणता पर्याय चांगला हे विक्रेत्याने ठरवायचे असते.

आज देशातील उद्योग व्यवसायात मराठी टक्का पाहिजे तेव्हढा नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मराठी उद्योजकांची संख्या खूप कमी आहे.

कदाचित मराठी माणसाला जाहिरात हा प्रकार आवडत नसावा. हा संस्काराचा भाग असू शकतो. माझ्या मते, एखाद्या वस्तूच्या विक्रीमुळे खरोखरच ग्राहकांचा फायदा होऊन समाज आणि देशाचं हित साधत असेल तर त्या वस्तूची जाहिरात करण्यात काहीच गैर नाही. 

संभाव्य ग्राहकच स्मार्टफोनवर उपलब्ध असताना सोपा मार्ग टाळून पारंपरिक खर्चिक मार्गाचा अवलंब करणे अत्यन्त चुकीचे होईल.  स्वतः जाहिरात करता येत असेल तर अति उत्तमच. 

आज सर्व मुख्य शहरात डिजिटल मार्केटींची सेवा देणारे सल्लागार उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांची मदत  घेणे कधीही फायद्याचेच.

आज  ‘महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र’ पुणे सारख्या शासकीय संस्था कमी शुल्कात ‘डिजिटल मार्केटिंग’ चे प्रशिक्षण देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

व्यवसाय कोणताही असो, आज गरज आहे सर्वांनी इतर मार्केटिंग माध्यमासह डिजिटल मार्केटिंगच कौशल्य आत्मसात करण्याची, बदल स्वीकारण्याची व स्वतःला अपडेट करण्याची.

सर्वात महत्वाच म्हणजे उद्योग-व्यवसायात करोडोची उलढाल करून देशाच्या प्रगतीस आपलाही हातभार लावण्याची.

(हा लेख नावासह शेअर करावयास माझी हरकत नाही)

© प्रेम जैस्वाल,  premshjaiswal@gmail.com

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button