My title My title
Something Different

Construction of Missiles

क्षेपणास्त्रांची जडणघडण…!

Construction of Missiles…!



© काशिनाथ देवधर, DRDO



स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:

युद्ध सिद्धतेसाठी आवश्यक असणाऱ्या शस्त्रास्त्रांवर महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू झाले. त्यानंतरच्या काळात ही शस्त्रास्त्रे अधिकाधिक आधुनिक व्हायला लागून, इतरांकडे असणाऱ्या शस्त्रास्त्रांपेक्षा वरचढ शस्त्रास्त्रे आपल्याकडे असावीत म्हणून मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.

या शस्त्रास्त्रांच्या जोरावर जगामध्ये आपली महासत्ता निर्माण व्हावी असा प्रयत्न अनेक देशांकडून सातत्याने केला जात आहे. युद्धसज्जतेसाठी सर्वच प्रकारची शस्त्रे अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करून बनविली जात आहेत.

प्रत्येक देश आपली सशस्त्र दले म्हणजेच भूदल, नौदल, वायुदल अद्ययावत शस्त्रास्त्रासह युद्धसज्ज करत आहे. युद्धासाठी अनेक प्रकारची शस्त्रे आवश्यक असतात.

त्याचे वर्गीकरणही अनेक प्रकारे केले जाते. शस्त्राचे प्रकार हे त्याचा पल्ला, मारक क्षमता, त्याचे लक्ष्य, त्याचा उपयोग व उपयोगात येणारे तंत्रज्ञान, इत्यादी बाबींवरून निश्चित केले जाते.



शस्त्रास्त्रांच्या पहिल्या प्रकारातील

शस्त्रे एकट्या जवानाने चालवायची असतात. अशा शस्त्रांना व्यक्तिगत शस्त्रे म्हणतात.

ज्यांमध्ये रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, रायफल, मशीनगन, कार्बाइन अशा प्रकारची शस्त्रे असतात. साधारणपणे, यांचा पल्ला पन्नास मीटर ते आठशे मीटर असतो.

पण काही विशेष शस्त्रांचा (उदाहरणार्थ, स्नाइपर रायफल) पल्ला मात्र बाराशे ते पंधराशे मीटर असतो व अचूकतेने शत्रुलक्ष्य भेदण्याची त्यांच्याकडे क्षमता असते. या सर्व शस्त्रांतून छोटी गोळी प्रचंड वेगाने झाडली जाते व शत्रूचा जवान टिपून मारला जातो.

एक गोळी झाडण्यासाठी, क्रमाने गोळी भरण्यापासून, शस्त्र लॉक करणे, अनलॉक करणे, अशा अनेक क्रिया कराव्या लागतात. या सर्व क्रिया जवान स्वत:च्या हाताने करत असेल, तर त्या शस्त्रास ‘हस्तचलित’ शस्त्रे म्हणतात.

जी शस्त्रे चालवताना सर्व क्रिया करण्यासाठी कोणत्याही अन्य ऊर्जेचा उपयोग केला जात असला, तर त्यास ‘स्वयंचलित’ शस्त्रे म्हणतात. यांतील प्रत्यक्ष गोळी झाडण्यासाठी चाप ओढण्याची क्रिया सोडून इतर सर्व क्रिया स्वयंचलित पद्धतीने केल्या जातात, अशा शस्त्रांना ‘अर्धस्वयंचलित’ शस्त्रास्त्रे म्हणतात.



दुसऱ्या प्रकारच्या

शस्त्रास्त्रांना ‘गटशस्त्रे’ (ग्रूप वेपन) म्हणतात. या प्रकारची शस्त्रे सामान्यतः दहा-दहा जवानांच्या एका गटाला एक अथवा दोन, अशी आवश्यकतेनुसार दिली जातात.

दोन-तीन जवानांकडून, मिळून अशी शस्त्र युद्धप्रसंगी चालवली जातात. व्यक्तिगत शस्त्रांपेक्षा या गटशस्त्रांची मारकता, भेदकता, पल्ला हा जास्त असतो व शत्रूचे जास्त नुकसान करण्याची या गटशस्त्रांची क्षमता असते.

याची उदाहरणे म्हणजे

छोटी उखळी तोफ,

छोटी धक्कारहित तोफ,

छोट्या बॉम्बची प्रक्षेपक तोफ, इत्यादी.



तिसऱ्या प्रकारच्या

शस्त्रांमध्ये प्रामुख्याने विनाशकारी आर्मर्ड तोफा, म्हणजेच रणगाडे येतात. कोणत्याही प्रकारच्या युद्धभूमीवर जाण्यासाठी व सहजतेने वावरण्यासाठी या तोफांना पोलादी पट्ट्यांची चाके असतात.

त्यामुळे रणगाड्यांना चपळाईने हालचाली करून, जागा बदलून हल्ले चढवता येतात. दुसरे म्हणजे रणगाड्यांची तोफ ही अतिशय ताकदवान असते. त्यातून अत्यंत शक्तिशाली तोफगोळे डागले जातात व शत्रूवर हल्ला केला जातो.

रणगाड्याचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे असणारे अभेद्य कवच. शत्रूचा तोफमारा सहन करून शत्रूला बाहेरच थोपवून ठेवणे किंवा उडवून देणे, व हे करताना रणगाड्याच्या आतील यंत्रणा सुरक्षित व कार्यरत ठेवणे, असे कार्य हे कवच करते.

रणगाड्यांमध्ये, हलक्या वजनाचे (चाळीस टनी), मध्यम वजनाचे (पन्नास टनी) व जड वजनाचे (साठ टनी) याप्रमाणे वजनानुसार गट केले आहेत.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:



चौथ्या प्रकारामधील

शस्त्रे ही अत्यंत विनाशक व लांब पल्ल्याची शस्त्रे असतात. त्यांना तोफखान्याची शस्त्रे असे म्हणतात. हे तोफखाने तीन प्रकारचे असतात.



पहिल्या प्रकारच्या तोफखान्यांमध्ये

मोठमोठ्या लांब पल्ल्याच्या तोफा,

मैदानी तोफा,

डोंगरी तोफा,

उखळी तोफा,

धक्कारहित तोफा येतात.

या तोफांद्वारे अनेक ताकदवान तोफगोळे, अत्यंत कमी वेळेत डागून शत्रुतळ किंवा शत्रुठाणे नष्ट केले जाते. या तोफगोळ्यांमध्ये अतिस्फोटक, तुकड्यांच्या स्वरूपात विनाशकारी मारा करणाया.

आगी लावणाऱ्या, अशा विविध तोफगोळ्यांचा समावेश असतो.



दुसऱ्या प्रकारच्या तोफखान्यांमध्ये

थेट तोफगोळे न डागता, अग्निबाणाद्वारे बॉम्बचा लक्ष्यावर मारा केला जातो.

बऱ्याच नळ्यांच्या स्वरूपात असणाऱ्या या अग्निबाण प्रक्षेपक यंत्रणेला स्वतःची दिशा निर्देशन प्रणाली नसते. तरीही दूरच्या शत्रुठाण्यांना लक्ष्य करून ते बेचिराख करण्याची क्षमता या अग्निबाणांमध्ये असते.

‘फ्री फायर्ड रॉकेट’ या नावे ओळखल्या जाणाऱ्या या या तोफांत आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब वापरले जातात. या प्रकारच्या तोफखान्यातल्या तिसऱ्या प्रकारात ‘विमानभेदी’ तोफा येतात.

लढाऊ विमाने, कमी उंचीवरून उडणारे क्षेपणास्त्र अथवा लढाऊ हेलिकॉप्टर, अशांना हवेमध्येच भेदून नष्ट करणारी तोफ यंत्रणा प्रणाली यात बसवलेली असते.

पहिल्या दोन्ही तोफखान्यांचे लक्ष्य हे शत्रुठाणे किंवा शत्रु तळ असल्याने त्याचा वेध घेणे हे तसे सोपे काम असते.



मात्र,

या तिसऱ्या प्रकारच्या तोफखान्यात

अतिशय गतिमान शत्रुलक्ष्याचा, म्हणजेच साधारणपणे आवाजाच्या दुप्पट वा तिप्पट वेगाने आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूच्या विमानाचा वेध अचूकतेने घेतला जातो.

हे अतिशय अवघड काम असते व ते साध्य करण्यासाठी अतिशय क्लिष्ट यंत्रणा यात वापरावी लागते. या प्रकारात तोफगोळे डागण्याची गती ही जितकी जास्त असेल, तितकी अचूक वेध घेण्याची क्षमताही वाढते.



तोफखान्यानंतरचा पाचवा शस्त्रास्त्र प्रकार

म्हणजे नौदलीय शस्त्रे. यामध्ये नौदलास आवश्यक असणारी सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे येतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ही सर्व शस्त्रे सागरी वातावरणाला तोंड देऊ शकतात.

लोखंड, पोलाद, अॅल्युमिनिअम, तांबे, पितळ अशा धातूंवर समुद्रावरच्या दमट हवेचा त्वरित परिणाम होतो व शस्त्रास्त्रांचे आयुष्य कमी होते.

त्यामुळे नौदलाने वापरायच्या शस्त्रांसाठी वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते, तसेच त्यांची देखभालही वेगळ्या प्रकारे करावी लागते.



जी शस्त्रास्त्रे हवेतून शत्रुलक्ष्यावर डागली जातात, अशा सहाव्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांना वायुदलीय शस्त्रास्त्रे म्हणतात. यामध्ये लढाऊ विमानांवरून फेकायचे बॉम्ब, याबरोबरच तोफा, बंदुका यांचाही समावेश होतो.



शस्त्रास्त्रांच्या सातव्या प्रकारात

अभियांत्रिकीय शस्त्रास्त्रे, उदाहरणार्थ, भूसुरुंग, सागरी सुरुंग, अशी वेगळ्या प्रकारची महत्त्वाची शस्त्रे येतात.

या सुरुंगांचे एक वेगळेपण असे असते, की आतापर्यंत पाहिलेल्या सर्व शस्त्रांमध्ये आपले शस्त्र वा बॉम्ब हे आपणापासून प्रवास करून ते शत्रुलक्ष्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली असते.

मात्र, या सातव्या प्रकारातील सुरुंगांसारख्या शस्त्रांचे वैशिष्ट्य हे, की या शस्त्रांची जागा निश्चित ठरलेली असते. शत्रू हा त्या सुरुंगाजवळ आला, की हे सुरंग योग्य वेळी स्वयंनिर्णयाने कार्यरत होऊन शत्रूवर हल्ला करतात व त्याला नष्ट किंवा निकामी करतात.

यामध्ये रणगाडाविरोधी सुरुंग, तसेच वाहने व लष्करी तुकड्या नष्ट करणारे सुरुंग, समुद्रामध्ये जहाजे नष्ट करणारे सागरी सुरुंग, अशा सुरूंगांचा समावेश होतो.



आठव्या प्रकारच्या शस्त्रांमध्ये

‘अतिसंहारक’ शस्त्रांचा समावेश होतो. ही आहेत महाभयंकर परिणाम साधणारी व अत्यंत विनाशकारी शस्त्रे.

उदाहरणार्थ अणुबॉम्ब, रासायनिक बॉम्ब, जैविक बॉम्ब. या प्रकारच्या शस्त्रांचा वापर केल्यास प्रचंड प्रमाणावर मानववंश किंवा जीवसृष्टी नष्ट होऊ शकते.

अशा बॉम्बमुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक दोष, अपंगत्व निर्माण होऊ शकते वा पुढील काही पिढ्यांवर परिणाम करणारी हानीही होऊ शकते.

जिनिव्हा येथील करारानुसार अशा अतिसंहारक शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी घातली गेली आहे. तरीही अशा हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करावेच लागते.

शस्त्रास्त्रांचा नववा वर्ग हा क्षेपणास्त्रांचा. क्षेपणास्त्र म्हणजे असे शस्त्र, की जे मानवरहित हवाई वाहनाद्वारे लक्ष्याकडे झेपावून, विशिष्ट प्रकारच्या स्वयंचलित प्रणालीद्वारे त्याच्याकडील वॉरहेडने (बॉम्ब) शत्रूकडील लक्ष्याचा वेध घेते.

प्रक्षेपकापासून वेगळे होऊन झेप घेतल्यानंतर, क्षेपणास्त्र हे आपल्या शत्रूकडील लक्ष्यापर्यंतचा अचूक प्रवास करताना विविध प्रकारच्या निर्देशन (डायरेक्शन) प्रणालींचा वापर करते.

सध्याच्या आधुनिक युद्धांमध्ये क्षेपणास्त्रे हीच अग्रणी राहिली आहेत. क्षेपणास्त्रांच्या विकासाचा इतिहास बघितला, तर त्याची सुरुवात ही १९३९ ते १९४५च्या दरम्यान झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये झाली.

जर्मनीने नाझींच्या काळात व्ही१ हा एक प्रकारचा ‘उडता बॉम्ब’ आणि व्हीर हा अग्निबाण (रॉकेट) विकसित करून महायुद्धात उपयोगात आणले होते.

खरे तर, अगदी सोप्या अशा ऑटो पायलट यंत्रणा बसवलेली ही क्षेपणास्त्रे, नेमून दिलेल्या मार्गाने जाऊन लक्ष्यवेध करीत होती.

त्याच दरम्यान जर्मनीने, रेडिओ लहरींद्वारे चालणारी नियंत्रण प्रणाली विकसित करून त्याद्वारे जहाजविरोधी क्षेपणास्त्रे व विमानविरोधी क्षेपणास्त्रेही कार्यान्वित केली होती.

मात्र, त्याची संख्या खूपच मर्यादित होती. याच काळात रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रेसुद्धा विकसित व्हायला सुरुवात झाली होती. मात्र, त्याचा संपूर्ण विकास हा युद्ध संपल्यावरच जास्त प्रमाणात केला गेला.

कारण, कालांतराने रणनीतीच्या दृष्टीने क्षेपणास्त्रांचे महत्त्व वाढतच गेले व सध्या तर क्षेपणास्त्रे ही खूप महत्त्वाची ठरली आहेत. युद्ध जिंकण्याबरोबरच जगामध्ये धाक निर्माण करण्यासाठीही क्षेपणास्त्र तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक बनले आहे.

अगदी महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर, पाण्यावर किंवा पाण्याखाली समुद्राच्या तळापर्यंत, हवेमध्ये आणि अगदी अंतराळातसुद्धा आपले वर्चस्व दाखवायचे असेल, तर क्षेपणास्त्रास पर्याय नाही.

आवश्यकतेनुसार क्षेपणास्त्रे ही लहानात-लहानापासून (काही किलोग्रॅम वजनाची) ते मोठ्यातमोठी (कित्येक टन वजनाची) असू शकतात. ही मोठी क्षेपणास्त्रे सुदूर पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असू शकतात.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:

क्षेपणास्त्रांच्या विविध गुणधर्मांवरून, आकारावरून, पल्ल्यावरून, निर्देशनपद्धती, नियंत्रणपद्धती, वॉरहेड प्रकार, इत्यादींवरून क्षेपणास्त्रांचे विविध प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

मुख्य प्रकारच्या वर्गीकरणात क्षेपणास्त्र हे कोठून डागले जाते व त्याचे लक्ष्य कोठे आहे, हे लक्षात घेतले जाते.

यानुसार क्षेपणास्त्रांचे वेगवेगळे चार प्रकार होतात :

१) जमिनीवरून डागले जाणारे व जमिनीवरीलच लक्ष्यावर मारा करणारे ‘सर्फेस टू सर्फेस मिसाइल’,

२) जमिनीवरून डागले जाणारे व हवेमधील लक्ष्यावर मारा करणारे ‘सर्फेस टू एअर मिसाइल’,

३) हवेमधून डागले जाणारे व हवेतीलच लक्ष्यावर मारा करणारे ‘एअर टू एअर मिसाइल’

४) हवेमधून डागले जाणारे व जमिनीवरील लक्ष्यभेद करणारे ‘एअर टू सर्फेस मिसाइल’.

सर्वांत जास्त क्षेपणास्त्रे ही ‘सर्फेस टू सर्फेस मिसाइल’ या प्रकारात मोडतात. जमिनीवरील किंवा समुद्रावरील एका बिंदूवरून दुसऱ्या बिंदूला लक्ष्य करून मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रांचा उपयोग प्रामुख्याने मोठी लष्करी ठाणी, लष्करी तळ, शहरे आणि स्थिर स्वरूपाचे ठिकाण उद्ध्वस्त करण्यासाठी केला जातो.

ही क्षेपणास्त्रे लांबपर्यंतचा पल्ला गाठू शकतात. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला गाठणारी असतात.

लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण प्रथमतः पृथ्वीवरून वरच्या दिशेने केले जाते. ही क्षेपणास्त्रे वातावरणाबाहेर, जवळजवळ दोन हजार किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकतात.

त्यानंतर हे क्षेपणास्त्र परवलयी (पॅराबोलिक) मार्गक्रमण करते. या प्रकारच्या क्षेपणास्त्रास बॅलिस्टिक मिसाइल’ संबोधतात. याच्या ठरलेल्या मार्गात फारसा बदल होत नाही.

कारण, प्रक्षेपणाचे ठिकाण व लक्ष्य ही दोन्ही स्थिर असतात. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही चढाई करण्यासाठीच वापरली जातात.

पारंपरिक प्रकारच्या बॉम्बबरोबरच अणुबॉम्ब वाहून नेण्याचीही या क्षेपणास्त्रांची क्षमता असते.

म्हणून या क्षेपणास्त्रांच्या वर्गाला ‘सामरिक क्षेपणास्त्रे’ (स्ट्रैटजिक मिसाइल) म्हणतात.

चीनकडील सात हजार किलोमीटरचा पल्ला असणारी क्षेपणास्त्रे, रशियाकडील बारा हजार किलोमीटरचा पल्ला असणारी क्षेपणास्त्रे, अमेरिकेकडील साडेबारा हजार किलोमीटरचा पल्ला असणारी क्षेपणास्त्रे, तर भारताचे साडेपाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठणारे अग्नि-५ हे क्षेपणास्त्र, ही काही आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची उदाहरणे आहेत.

या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त कमी पल्ला असलेली, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारीही क्षेपणास्त्रेही असतात. त्यांच्या पल्ल्यांवरून त्यांचा प्रकार ठरवला जातो.

  1. उदाहरणार्थ,

  2. पन्नास ते तीनशे किलोमीटर पल्ला असणारी ‘क्लोज रेंज बॅलिस्टिक मिसाइल’,

  3. तीनशे ते एक हजार किलोमीटर पल्ला असणारी ‘शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाइल’,

  4. एक हजार ते तीन हजार किलोमीटर पल्ला असणारी ‘मीडियम रेंज बॅलिस्टिक मिसाइल’,

  5. तीन हजार ते पाच हजार किलोमीटर पल्ला असणारी ‘इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल’

  6. आपण वर उल्लेख केलेली साडेपाच हजार किलोमीटर किंवा त्याहून अधिक पल्ला असलेली ‘इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल’.

ही क्षेपणास्त्रे कोणत्या लक्ष्याविरुद्ध वापरतात त्यावरूनही त्यांची वर्गवारी केली जाते. उदाहरणार्थ, जहाजविरोधी, रणगाडाविरोधी, इत्यादी. या सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रांची अचूकता खूप असावी लागते.

क्षेपणास्त्राच्या निर्देशन, नियंत्रण आणि संचालन प्रणाली या सर्व अत्यंत योग्य व कार्यक्षम असाव्या लागतात, तरच ही अचूकता मिळू शकते.

दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीत, सुएझच्या कालव्यातून होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी दोन विशेष प्रकारची जहाजविरोधी क्षेपणास्त्रे विकसित केली गेली.

मात्र, ब्रिटिश फौजेने रेडिओ संपर्क जॅम करून ती क्षेपणास्त्रे निरुपयोगी केली. त्यानंतर १९६०च्या दशकात सर्वच प्रगत देशांनी जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, खूप मोठ्या प्रमाणात लष्करी सेवेत दाखल केली.

यामध्ये मुख्यतः कमी उंचीवरून उडणारी व अग्निबाणाची शक्ती वापरणारी ‘क्रूझ’ क्षेपणास्त्रे बनवली गेली. क्रूझ क्षेपणास्त्रे ही प्रामुख्याने जमिनीवरील लक्ष्यभेद करण्यासाठी वापरतात.

सध्या जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रां बरोबरच पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रेही बनवली जात असून त्यांच्या मार्गक्रमणाचे दोन भाग असतात. पहिला भाग हा क्षेपणास्त्र हवेतून पाण्यात शिरण्यापर्यंतचा असतो.

क्षेपणास्त्र पाण्यात शिरले, की दुसऱ्या भागाकडे सूत्रे सोपवली जातात. या दुसऱ्या भागात, पाण्यातून मार्गक्रमण करून पाणबुडीचा अचूक वेध घेऊन ती नष्ट करण्याचे कार्य केले जाते.

क्रूझ क्षेपणास्त्राचे आवाजापेक्षा कमी वेगाने जाणारे आणि आवाजापेक्षा अधिक वेगाने जाणारे (स्वनातीत), असे प्रकार आहेत. आवाजापेक्षा कमी वेगाने जाणारी क्रूझ क्षेपणास्त्रे हलकी व स्वस्त असतात.

परंतु ती शत्रूकडून भेदली जाऊ शकतात. मात्र स्वनातीत वेगाने जाणारी क्षेपणास्त्रे शत्रूकडून भेदली जाणे खूप कठीण असते. ही क्रूझ क्षेपणास्त्रे कमी पल्ला, मात्र भयानक वेग व परमोच्च अचूकता यांसाठी ओळखली जातात.

यावरूनच आपण विकसित केलेल्या ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे महत्त्व लक्षात येते. भारत व रशिया यांचा संयुक्त प्रकल्प असणारे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने झेपावणारे क्षेपणास्त्र आहे.

सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची अशी क्षेपणास्त्रे ज्या देशाकडे आहेत, तो देश चांगल्या प्रकारे स्वतःचे रक्षण करु शकतो. अमेरिकेचे टोमाहॉक आणि रशियाचे केएच-५५ ही क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत.

वायर गायडन्स वापरून तयार केलेली रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे उपयोगात आहेत. यांत त्यांची निर्देशन प्रणाली, प्रक्षेपक व क्षेपणास्त्र यांना जोडलेल्या तारांद्वारे क्षेपणास्त्राला दिशादर्शक संदेश देते.

१९७३मधील इस्राएल व इजिप्त यांच्यातील युद्धात ‘मल्युत्का’ या तार वापरणाया क्षेपणास्त्राचा उपयोग यशस्विरीत्या केला गेला. हे क्षेपणास्त्र खांद्यावरून डागता येणारे क्षेपणास्त्र होते.

मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता बिनतारी दिशादर्शक प्रणालीची निर्मिती शक्य झाली आहे. भारताने विकसित केलेले या प्रकारातले ‘नाग’ हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र जगातील कोणताही रणगाडा निकामी करू शकते.

या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांबरोबरच सध्या हवेतून, विमानाद्वारे अथवा हेलिकॉप्टरद्वारे डागता येणारी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रेही वापरात आहेत.

भारताच्या नाग या क्षेपणास्त्राच्या ‘नामिका’ आणि ‘हेलिना’ या पुढील आवृत्त्या तयार आहेत. यांतील हेलिना हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरद्वारे डागता येते.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:

सध्याचे प्रगत तंत्रज्ञान लक्षात घेता लढाईसाठी शत्रूकडून जमीन, पाणी यांवरील धोक्यांपेक्षा जास्त धोका हा हवाई हल्ल्यांचा आहे. यामध्ये लढाऊ विमान अथवा क्षेपणास्त्रांद्वारे हा हल्ला होऊ शकतो.

या दृष्टीने जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी, दुसऱ्या प्रकारात मोडणारी क्षेपणास्त्रे ही महत्त्वाची ठरली आहेत. दुसऱ्या महायुद्धात, १९४४ सालापर्यंत अमेरिका व ब्रिटन यांची हवाई दले लढाऊ विमानांद्वारे, जथ्याने जर्मनीवर व जर्मनीने बळकावलेल्या भूभागावर प्रचंड प्रमाणात हल्ले करत असत.

तेव्हा जर्मनी जमिनीवरून डागता येणाऱ्या विमानविरोधी क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु अशी कोणतीच प्रणाली दुसरे महायुद्ध संपेपर्यंत विकसित झाली नाही.

अमेरिकेच्या नौदलानेसुद्धा असे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.

अखेर दोस्तराष्ट्रांकडून ‘कामिकाझे हे अशा प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित करून आपल्यावरचा हवाई धोका कमी करण्यासाठी प्रयत्न केला गेला. १९५० सालाच्या सुमारास अमेरिका व रशियानेही अशा प्रकारची विविध विमानविरोधी क्षेपणास्त्र विकसित केली.

आज विमानविरोधी क्षेपणास्त्रे ही बहुविध प्रकारच्या प्रक्षेपकांद्वारे डागली जात आहेत.

त्यांमध्ये खांद्यावरून डागता येणाऱ्या लहान क्षेपणास्त्रापासून जमिनीवरून, वाहनावरून, जहाजावरून, पाणबुडीवरून डागता येणारे, तसेच हवेतून मारा करणारे, असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.

हवाई हल्ले जसे विमानांद्वारे होतात, तसेच ते क्षेपणास्त्रांद्वारेही होतात. अशांपासून रक्षण करण्यासाठी, आपल्यावर हल्ला करणारी क्षेपणास्त्रे हवेतल्याहवेतच नष्ट करणे आवश्यक असते.

या क्षेपणास्त्रांना ‘अँटिबॅलिस्टिक मिसाइल’ म्हटले जाते. काही वेळा अतिस्फोटक वॉरहेड वापरण्यापेक्षा केवळ लक्ष्याला धडकून गतिज ऊर्जेद्वारे लक्ष्यभेद करणे सोयीचे ठरते.

या क्षेपणास्त्रांची धडकण्याची गती अत्युच्च असते. रशिया, अमेरिकेसारख्या अनेक देशांबरोबरच भारतानेही अतिस्फोटक वॉरहेड असणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात केलेली आहेत. यांत आकाश व त्रिशूल या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.

या दोन क्षेपणास्त्रांबरोबरच भारताने आणखी दोन क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्या आहेत. त्यांतली एक आहे, समुद्रावरून वा जमिनीवरून, कमी उंचीवर येणाऱ्या क्षेपणास्त्रास भेदून त्याला नष्ट करणारी.

या प्रणालीला ‘अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स’ (एएडी) क्षेपणास्त्र म्हणतात व ते साधारणपणे तीस किलोमीटर उंचीवर हवेतल्याहवेतच शत्रूच्या क्षेपणास्त्रास भेदते.

या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगाच्या साडेचारपट इतका असतो. यात एकाच टप्प्यात उड्डाण करणारे, घनइंधनाचे इंजीन वापरतात. त्याला निर्देशन करण्यासाठी दोन तंत्रज्ञाने उपयोगात आणली आहेत.

ती म्हणजे, क्षेपणास्त्राचा मार्ग कळण्यासाठी ‘जीपीएस’ म्हणजे ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ आणि लक्ष्य भेदण्यासाठी रडार. दुसरी संरक्षक प्रणाली म्हणजे, ‘पृथ्वी एअर डिफेन्स’ (पीएडी). ही प्रणाली क्षेपणास्त्राचा वातावरणाबाहेरील (ऐंशी किलोमीटर उंचीपर्यंतच्या) क्षेपणास्त्राचा वेध घेऊन त्याचा अचूकतेने भेद करते.

त्यासाठी दोन टप्प्यांचे इंजीन वापरले आहे. या क्षेपणास्त्राची गती ही ध्वनीच्या पाचपटींहून अधिक आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटरपर्यंतचा आहे.

याचबरोबर भारताने अन्य प्रकारच्या हवाई धोक्यासाठी इतरही काही प्रकारच्या प्रणाली विकसित केल्या आहेत. ही झाली जमिनीवरून जमिनीवर किंवा जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे.

तिसऱ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांमध्ये हवेतून डागली जाणारी व जमिनीवरील लक्ष्य भेदणारी क्षेपणास्त्रे येतात.

अशा क्षेपणास्त्रांचा वापर आपल्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांवरून, हेलिकॉप्टरवरून किंवा मानवरहित हवाई वाहनांतून, शत्रूच्या ठिकाणांवर मारा करण्यासाठी व अचूकतेने शत्रुलक्ष्य टिपण्यासाठी केला जातो.

यामध्ये जमिनीवरील किंवा पाण्यावरील शत्रुलक्ष्य हे स्थिर किंवा थोडेसे हलते असू शकते. मात्र ज्यावरून क्षेपणास्त्र डागले जाते, ते मात्र खूप वेगात असणारे वाहन असते.

अशा क्षेपणास्त्राची निर्देशन प्रणाली गतिशील (डायनॅमिक) आणि मजबूत असावी लागते. या प्रकारातील क्षेपणास्त्रे ही प्रामुख्याने चढाईसाठीच वापरतात. परंतु, काही वेळा त्यांचा उपयोग रक्षणात्मक कामासाठीही केला जातो.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:

चवथ्या प्रकारची क्षेपणास्त्रे हवेतन मारा करून हवेतील लक्ष्य भेदणारी क्षेपणास्त्रे होत. यांमध्ये क्षेपणास्त्र ज्यावर बसवले आहे ते वाहन, तसेच ज्यावर मारा करायचा आहे ते लक्ष्य, हे दोन्हीही खूप वेगात, म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगवान असतात.

त्यामुळे अशा लक्ष्यांचा वेध घेणे खूपच आव्हानात्मक असते. या प्रकारात, क्षेपणास्त्राचा आरंभ बिंदू व लक्ष्याशी भिडण्याचा बिंदू हे दोन्हीही कोणत्याही क्षणी झटकन बदलण्याची शक्यता असते.

त्यामुळे यासाठी खूपच अचूक संगणकीय निर्देशन प्रणालीचा वापर करावा लागतो. ही क्षेपणास्त्रे चढाईसाठी किंवा स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडतात.

भारताने या प्रकारचे वीस किलोमीटर पल्ल्याचे अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स प्रकारचे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

या चारही प्रकारच्या क्षेपणास्त्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. असे तंत्रज्ञान हे बहुधा स्वत:चे स्वत:च विकसित करावे लागते.

जर ते प्रगत राष्ट्रांकडून खरेदी करायची वेळ आलीच, तर ते अत्यंत चढ्या भावात, अनेक अटी घालून विकत घ्यावे लागते. काही वेळा ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता न येण्याची नामुष्कीही येते.

म्हणूनच भारताला ‘क्षेपणास्त्रे’ या विषयात स्वयंपूर्ण बनवण्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी दिसते.

अत्याधुनिक क्षेपणास्त्रांतील शेवटचा व पाचवा गट म्हणजे, ‘उपग्रहभेदी’ क्षेपणास्त्रांचा. आतापर्यंत संपूर्ण जगात केवळ तीनच देशांकडे असे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान होते.

भारत हा आता नुकताच या गटातील चौथा देश बनला आहे.

दिनांक २७ मार्च, २०१९ रोजी भारताने ‘मिशन शक्ती’द्वारे आपल्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आपणच आपला मायक्रोसॅट-आर हा तीनशे किलोमीटर उंचीवरच्या कक्षेतील उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे अचूक भेदून नष्ट केला.

आणि सामरिक क्षेत्रातील एक अंतरिक्ष शक्ती म्हणून भारताची जगाला ओळख करून दिली.

क्षेपणास्त्रांत अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या विविध प्रणाल्या वापरल्या जातात. यांतील पहिली प्रणाली म्हणजे ‘उड्डाण नियंत्रण प्रणाली’ (फ्लाइट कंट्रोल सिस्टिम).

क्षेपणास्त्राचा पूर्ण ताबा हा उड्डाण नियंत्रण प्रणालीकडे असतो. निर्देशन प्रणालीद्वारे (गायडन्स सिस्टिम) येणारे संदेश व सूचना यांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे कार्य हे उड्डाण नियंत्रण प्रणालीचे असते.

तसेच, आदेशानुसार हे क्षेपणास्त्र हवे तेव्हा योग्यरीत्या वळवून, त्याची दिशा व गती नियंत्रित करून शत्रुलक्ष्य गाठेपर्यंत त्यावर ताबा ठेवला जातो.

हे नियंत्रण ठेवण्यासाठी पंख, शेपूट, पर (कनार्ड) यांच्या स्थितीत बदल करून क्षेपणास्त्राची दिशा वा गती बदलली जाते व क्षेपणास्त्र योग्य मार्गावर ठेवले जाते. क्षेपणास्त्र वातावरणाबाहेर असल्यास वायुगतिकीवर आधारलेल्या अशा नियंत्रणाचा उपयोग होत नाही. अशा वेळी इंधनाचा वापर करून (व्हेक्टर्ड थ्रस्ट टेक्निक) क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर नियंत्रण ठेवले जाते.

क्षेपणास्त्रातील दुसरी प्रणाली म्हणजे वर उल्लेख केलेली निर्देशन प्रणाली’. ही प्रणाली म्हणजे क्षेपणास्त्राचा मेंदू. या पद्धतीत एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रारणांच्या मदतीने क्षेपणास्त्र आपला मार्ग शोधत असते. ही प्रारणे अनेक प्रकारची असतात.

उदाहरणार्थ,

अवरक्त किरण,

अतिनील किरण,

लेझर किरण,

रेडिओ तरंग.

यांचा उपयोग करून क्षेपणास्त्रास शत्रुलक्ष्याकडे मार्गस्थ केले जाते. शत्रुलक्ष्य काही वेळा ही प्रारणे स्वत:च तयार करते. त्याचा फक्त मागोवा घेण्याची यंत्रणा क्षेपणास्त्रावर बसवलेली असते.

उदाहरणार्थ, शत्रुलक्ष्याच्या इंजिनाद्वारे बाहेर पडणारी उष्णता. इतर वेळी मात्र दिशादर्शनार्थ जवानांकडून मुद्दाम सोडलेल्या प्रारणांच्या मदतीने क्षेपणास्त्राला योग्य लक्ष्याकडे मार्गस्थ केले जाते.

अवरक्त किरण व लेझर किरण यांचा अशा प्रकारचा उपयोग करून जी क्षेपणास्त्रे निर्देशित केली जातात, त्या प्रकाराला ‘डागा आणि विसरून जा’ असे म्हणतात.

कारण, त्याला एकदा डागल्यानंतर परत परत मागाहून आधार दिला जात नाही. आधुनिक क्षेपणास्त्रांमध्ये, क्षेपणास्त्रावरच स्वयंनिर्देशन प्रणाली बसवलेली असते.

ही यंत्रणा ‘सीकर’ या उपकरणाद्वारे अवरक्त किरण, लेझर किरण किंवा रेडिओ लहरींचा वापर करून शत्रुलक्ष्यावर सतत स्थिर नजर ठेवून असते. ही यंत्रणा उहाण नियंत्रण प्रणालीला माहिती पुरवून अचूक लक्ष्यभेद केला जातो.

क्षपणास्त्रास आवश्यक असणारी ऊर्जा प्रदान करून योग्य गता देण्याचे कार्य प्रणोदन प्रणाली’ (प्रॉपल्शन सिस्टिम) करते.

उड्डाणाच्या वेळी आवश्यक तो सुरुवातीचा धक्का देऊन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि वातावरणीय अवरोध यांवर मात करून योग्य गती देण्याइतके (आणि तीही अत्यंत कमी वेळामध्ये) हे कार्य प्रणोदन प्रणाली करते.

क्षेपणास्त्र ज्या अग्निबाणावर बसवले आहे, त्या अग्निबाणातील इंधनांच्या ज्वलनातून निर्माण होणारे वायू हे मागच्या बाजूस सोडले जाऊन, त्यांचे प्रतिक्रियाबल क्षेपणास्त्रास पुढे ढकलत असते.

न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार हे क्षेपणास्त्र पुढे सरकत असते. अग्निबाणासाठी घनइंधन म्हणून सीटीपीबी, एचटीपीबी या प्रकारची मिश्र प्रणोदके, तसेच अॅल्युमिनिअमची भुकटीही वापरली जाते. ही प्रणोदके ज्वलनासाठी हवेतील प्राणवायूचा वापर करतात.

सर्वसाधारण क्षेपणास्त्रे ही एकाच टण्यात उड्डाण करणारी असतात. परंतु आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसारखी अतिदूरच्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे एकाहून अधिक टप्प्यांचा वापर करतात.

प्रारंभिक उड्डाणाच्या वेळी, जास्त प्रमाणातील गतिवर्धक इंधनाची सोय असणारे ‘बूस्टर’ या क्षेपणास्त्रांना जोडलेले असते. या बूस्टरद्वारे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल व वातावरणीय विरोध यांवर मात करून क्षेपणास्त्र खूप गतीने अवकाशात झेपावते.

गतिवर्धक इंधनाचे संपूर्णतः ज्वलन झाल्यावर दोन वा तीन टप्यांत (स्टेज) अग्निबाणाची प्रणोदन प्रणाली कार्यरत होते. ज्या-ज्या टप्प्याचे इंधन संपते, त्या-त्या टप्प्यातून पुढच्या टप्प्याला चेतवण्याचे काम केल्यानंतर, पूर्ण झालेल्या टप्प्याची रिकामी टाकी क्षेपणास्त्रापासून विलग होऊन गळून पडते.

गतिवर्धक इंधन व सुरुवातीचा पहिला टप्पा यांसाठी धनरूप इंधने उपयोगी ठरतात. कारण, त्यांचे ज्वलन अतिशय जलद गतीने होते.

आंतरखंडीय क्षेपणास्त्रे दुसऱ्या टप्यामध्ये द्रवरूप इंधनाचा उपयोगही करू शकतात. या इंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे इंधन आणि ज्वलनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू हे स्वतंत्र टाक्यांमध्ये दाबाखाली साठवलेले असतात.

या दोहोंचा पुरवठा ज्वलनकक्षामध्ये नियंत्रितरीत्या केला जातो. इंधन व द्रवरूप प्राणवायू जिथे एकत्र येतात, त्या ज्वलनकक्षामध्येच त्यांचे शीघ्र ज्वलन होते आणि अतिदाब असणाऱ्या तप्त वायूंमध्ये त्यांचे रूपांतर होते.

असे वायू एका शंक्वाकृती तोटीद्वारे (नॉझल) मागील दिशेने बाहेर सोडले जातात. वातावरणाबाहेरून प्रवास करताना आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या अग्निबाणांतील इंधनांना ऑक्सिजनची मदत मिळत नाही.

त्यामुळे त्यांना वेगळ्या ऑक्सिडायझरची गरज भासते. हायड्रोजन हे उत्तम द्रवरूपी इंधन मानले गेले आहे. द्रवरूपी हायड्रोजनबरोबर द्रवरूपी ऑक्सिजनचा ऑक्सिडायझर म्हणून वापर केला जातो.

रेड फ्युमिंग नायट्रिक अॅसिड हेसुद्धा इंधन म्हणून वापरले जाते. या इंधनाबरोबर हायड्रोजन पेरॉक्साइडचा ऑक्सिडायझर म्हणून वापर केला जातो.

क्षेपणास्त्रातील शेवटची प्रणाली म्हणजे ‘वॉरहेड सिस्टिम’. शत्रुलक्ष्यावर कोणत्या प्रकारचा परिणाम आवश्यक आहे हे पाहून त्यानुसार वॉरहेड तयार केले जाते.

वॉरहेड म्हणजे एका अर्थाने बॉम्ब, जो क्षेपणास्त्राद्वारे वाहून शत्रुलक्ष्यावर सोडला जातो व शत्रुलक्ष्य पूर्णतः नष्ट करतो.

काही वॉरहेड स्फोट घडवतात, काही वॉरहेड लक्ष्याचे तुकडे करतात, काही वॉरहेड लक्ष्याच्या गतीवर परिणाम घडवून आणतात, तर काही वॉरहेड आगीही लावतात.

अत्यंत विनाशकारी असणारी अण्वस्त्रे हीसुद्धा वॉरहेडच असतात. योग्य वेळी व योग्य पद्धतीने बॉम्ब फुटावा यासाठी या वॉरहेडमध्ये फ्यूजची आवश्यकता असते व त्याचेही अनेक प्रकार असतात.

काही फ्यूज लक्ष्याच्या अगदी जवळ आल्यानंतर फुटतात, काही फ्यूज ठरवून दिलेल्या वेळी फुटतात, काही फ्यूज जमिनीपासून ठरावीक उंचीवर असताना फुटतात.

या बॉम्बमध्ये ट्राय नायट्रोटोल्यूइन (टीएनटी), आरडीएक्स, एचएमएक्स, सीएल-२०, अशा प्रकारची स्फोटके वापरली जातात.

क्षेपणास्त्राचे सर्व भाग ज्या सांगाड्यावर बसविलेले असतात, त्याला ‘एअरफ्रेम’ म्हणतात. हा सांगाडा आपल्या सर्व कार्यरत अवयवांना शेवटपर्यंत एकत्रित ठेवण्याचे कार्य करतो.

हवेतून प्रवास आणि तोही वेगाने करत असताना, सर्व प्रकारच्या वायुगतिकीय बलांना योग्य पद्धतीने तोंड देऊन या सर्व क्षेपणास्त्रातील घटकांची अखंडता तो टिकवून ठेवतो.

एअरफ्रेम ही वजनाला जास्तीतजास्त हलकी, मात्र सर्व प्रकारची बले व्यवस्थित सहन करणारी असावी लागते.

क्षेपणास्त्राच्या सर्वांत पुढच्या भागावर, अग्रभागी रडार बसवलेला घुमटाच्या आकाराचा ‘रॅडोम’ हा भाग असतो.

या घुमटाच्या आकारामुळे लक्ष्याकडे अतिशय वेगात झेपावताना हवेचा रोध कमीतकमी राहतो. या अवयवाबरोबरच असलेले ‘सीकर’ हे उपकरण म्हणजे क्षेपणास्त्राचा डोळा.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:

निर्देशन प्रणालीचा भाग असणारे हे सीकर, अवरक्त लेझर किंवा तत्सम प्रारणांच्या उत्सर्जनाद्वारे व त्यानंतरच्या त्यांच्या वेधाद्वारे कायम आपल्या लक्ष्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात.

सीकरद्वारे लक्ष्याच्या स्थानाची माहिती सतत नियंत्रण यंत्रणेकडे दिली जाते, जेणेकरून निर्देशन प्रणालीकडून मिळालेल्या संदेशांद्वारे क्षेपणास्त्राचे उड्डाण नियंत्रण व दिशादर्शन केले जाते.

हे सीकर लक्ष्याच्या सतत मागावर राहत असल्याने, क्षेपणास्त्र हे लक्ष्याचा अचूक वेध घेऊन त्याला नष्ट करू शकते.

भारताने डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १९८२मध्ये जागतिक दर्जाची पाच क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला. त्याचे नाव होते “एकात्मिक निर्देशित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम’.

या कार्यक्रमात विकसित केली गेलेली पाच क्षेपणास्त्रे अशी आहेत –

पृथ्वी : कमी पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र,

आकाश : मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून डागता येणारे व हवेमधील लक्ष्याचा अचूक भेद घेणारे क्षेपणास्त्र,

त्रिशूल : लघुपल्ला असणारे, जलद प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र, नाग : रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र व

अग्नी : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र.

१९८२साली सुरू झालेल्या या कार्यक्रमात साधारणतः पंधरा वर्षांच्या कालावधीत पाचही जागतिक दर्जाची क्षेपणास्त्रे विकसित करून पूर्ण झाली.

त्यांच्या विविध प्रकारच्या, स्थिर स्वरूपाच्या, तसेच प्रत्यक्ष फायरिंग करून चाचण्या घेतल्या गेल्या व त्या यशस्वीही झाल्या. तिन्ही सशस्त्र दलांच्या सूचनांनुसार त्यांत योग्य ते बदल करून ही क्षेपणास्त्रे सशस्त्र सेनांकडे सुपूर्द करण्यात आली.

कालांतराने सशस्त्र दलांच्या मागण्यानुसार पृथ्वी व अग्नीची चढत्या क्रमाने अत्याधुनिक प्रारूपे तयार करून दिली गेली.

या पाच क्षेपणास्त्रांबरोबरच भारताने इतरही अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.

शत्रूच्या नौकेवर वा ठाण्याला लक्ष्य करू शकेल अशी क्षेपणास्त्रे डागण्यासाठी नौदलासाठी ‘धनुष्य’ ही प्रणाली विकसित केली गेली आहे.

घनइंधन वापरून केलेले, ‘प्रहार’ हे लांब पल्ल्य जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रही विकसित केले गेले आहे.

त्याचबरोबर, ‘निर्भय’ हे लांब पल्ल्याचे, परंतु आवाजापेक्षा कमी गतीने झेपावणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राचे विकासकार्यही सुरू आहे.

भारत संरक्षणाच्या दृष्टीने पूर्ण स्वावलंबी व्हावा, यासाठी अनेक भारतीय संशोधक अशी जागतिक दर्जाची क्षेपणास्त्रे निर्माण करीत आहेत.

भारताने विकसित केलेली क्षेपणास्त्रे, हा एका ग्रंथाचाच विषय आहे व त्याची ही फक्त वरवरची ओळख आहे. तरुणांना या क्षेत्रात बरेच काही करण्यास वाव आहे.

या विषयातून प्रेरणा घेऊन असंख्य तरुण शास्त्रज्ञ या कार्यात येऊन भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल करतील याचा विश्वास वाटतो..

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख सातवा:



Disclaimer:

This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through the writer © काशिनाथ देवधर, DRDO. This article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, and entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



Weapons Mean Power(Opens in a new browser tab)

Cyber Crime: अदृश्य चेहरे….(Opens in a new browser tab)

Science Behind Sculpture of Turtle in Temple(Opens in a new browser tab)



क्षेपणास्त्रांची जडणघडण…!

Construction of Missiles…!



©काशिनाथ देवधर, DRDO



Agni 5 cha Dhamaka(Opens in a new browser tab)

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button