My title My title
EducationSomething Different

The Mess of Agricultural Education

The Mess of Agricultural Education

कृषि शिक्षणाचा खेळखंडोबा



©विजय रहाणे



कोकणातील एका खासगी कृषी महाविद्यालयातून आम्हाला बोलावणे आले, की एक दिवस आमच्या इथे प्राध्यापक म्हणून या, आम्ही चार हजार रुपये प्रत्येकी देऊ.

विद्यापीठीय समिती खासगी महाविद्यालयांचे मानांकन करण्यासाठी भेटी देऊन पाहणी करत आहे, त्यामुळे हे निमंत्रण आले होते.

‘अगं अगं म्हशी…’ करत मी व माझे काही मित्र तिथे गेलो, तर तिथली स्थिती पाहून मला बिरबलाच्या खिचडीची आठवण झाली.

एकाच इमारतीत कृषी व संलग्न अभ्यासक्रमाची तीन महाविद्यालये आहेत. समितीच्या पाहणीनिमित्त सर्व उपकरणे त्याच संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयातून ट्रकमधून भरून आणण्यात आले.

एवढंच काय तर नर्सरीतील रोपे व गोठ्यातील जनावरेसुद्धा एक दिवसासाठी आणण्यात आली. हे कमी म्हणून की काय दोन महाविद्यालयांचे प्राचार्यसुद्धा आमच्यासारखेच एकदिवसीय खेळाडू होते.

आम्ही सहज महाविद्यालयामध्ये चक्कर मारली, तर आम्हाला रात्रभर सगळ्या फाईल तयार करून, दमून झोपी गेलेली क्लार्क व इतर मंडळी दिसली.

नंतर आम्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटलो. त्यांनी दोन मिनिटांत आमची महाविद्यालयात रुजू होण्याची ऑर्डर काढली. आम्ही लाज सोडून त्यावर सह्या केल्या.

नंतर इतर काही कागदपत्रांवर पण सह्या केल्या. त्या कागदपत्रांवरून आम्हाला असं कळलं, की ज्या महाविद्यालयात आम्ही प्रथमच पाऊल ठेवले तेथे आम्ही फार दिवसांपासून रुजू होतो. अर्थातच कागदोपत्री.

महाविद्यालयात आमच्यासारखेच तब्बल ७० ते ८० एकदिवसीय प्राध्यापक गण जमले होते. त्यातले काही जण तर नुकतेच पदवीधर झाले होते. तर काही जण पदव्युत्तर पदवी न करताच पदवीच्या मुलांना शिकवायला आले होते.

त्यातले काही तर चक्क बीए, एमए होते. त्यानंतर आम्ही मुलांच्या सत्र नोंदणी फॉर्मवर सह्या केल्या.

मी पदवीला असताना ज्या फॉर्मवर सह्या घ्यायला मला ८ दिवस लागायचे अशा जवळपास ६० फॉर्मवर मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी अर्ध्या तासामध्ये सह्या केल्या.

विशेष म्हणजे आमच्या काही सह्या तिथल्या कारकून लोकांनी आधीच करून ठेवल्या होत्या. त्यानंतर आम्ही कोणता विषय शिकवत आहोत हे आम्हालाच सांगण्यात आले.

वेगवेगळ्या विभागांत पत्रके लावण्यात आली. ग्रंथालयात पुस्तके ठेवण्यात आली. मुले महाविद्यालयात येतच नसल्यामुळे सर्व बाकांवर धूळ साचली होती.

ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला गेला. महाविद्यालयाच्या समोर एक छोटसे कसले तरी कोठार होते, त्याला मुलींचे वसतिगृह असे नाव देण्यात आले.

मुलांचे वसतिगृह म्हणून चौथा मजला- जो अजून तयार झालेला नाही- तोच दाखवण्यात येणार होता.

समितीच्या स्वागताची पत्रके लावण्यात आली. त्यावर विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव चुकले होते. ते एक कागद चिकटवून बरोबर करण्यात आले.

समितीच्या स्वागतासाठी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असा सुकामेवा आणला गेला. आम्हाला एकेक वडापाव आणि चहा दिला गेला.

साधारण सकाळी १० वाजता समिती आली व एकदिवसीय महाविद्यालयीन तमाशा सुरू झाला. आम्ही आपापल्या जागा घेतल्या.

तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य व एक व्यवस्थापनातील व्यक्ती त्या समितीसोबत होते. समितीचे सदस्य प्रत्येक विभागवार फिरत होते व तिथल्या व्यक्तींना माहिती विचारून, त्यांच्या कसल्यातरी कागदपत्रांवर नोंदी घेत होते.

विशेष म्हणजे ते पेन्सिलने नोंदी घेत होते. बहुतेक पेनाने केलेल्या नोंदी खोडता येत नसाव्यात म्हणून! समितीचे सदस्य प्रश्न विचारायचे.

पण एकाही प्रश्नाचे उत्तर कुठल्याही प्राचार्याला समर्पकपणे देता यायचे नाही. पदोपदी समितीचे सदस्य प्राचार्यांचा अपमान करायचे आणि प्राचार्यही ते ऐकून घ्यायचे.

समिती सदस्य फक्त महाविद्यालयीन व्यवस्थापनातील व्यक्तीशी नीट बोलायचे… जुनी ओळख असेल कदाचित!

प्रत्येकाची धांदल उडाली होती. समिती प्रत्येकाची आब्रू काढत वेगवेगळ्या विभागांत पाहणी करत होती. मला प्राचार्यांची दुर्दशा पाहून वाईट वाटले.

म्हणून मीही समितीला उत्तर देण्यासाठी सरसावलो व त्यांच्या शब्दांचे वार झेलू लागलो; पण मग पुढे आम्ही ग्रंथालयात गेलो, तिथेपण एकदिवसीय ग्रंथपाल होता.

सगळे पंखे चालू असून, तो घामाघूम अवस्थेत उभा होता.

समितीने त्याला प्रश्न विचारण्यास सुरवात केली. प्रश्न काहीपण विचारला तर तो ठरलेली उत्तरे देऊ लागला.

भीतीने त्याची गाळण उडाली होती. त्याची दुर्दशा पाहून मी सरांना उत्तर देण्यास प्रारंभ केला. काही प्रश्न झाल्यावर त्यांनी मला एक प्रश्न विचारला.

‘‘तू एवढे बोलतोय तर तू ग्रंथपाल आहे का?’’ मी नाही म्हणून मान हलवली. समितीचे सदस्य बोलले, ‘‘तर आता मध्ये बोलू नकोस!’’

मी तेथून काढता पाय घेऊन माझ्या विभागाकडे परत आलो.

खाली काही प्राध्यापक व प्राध्यापिका एकमेकांशी हसत-खेळत गप्पा मारत होते. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत होते.

ते अद्भुत दृश्य पाहून मी काही वेळ हरखुन गेलो व माझ्या विभागात जाऊन प्राध्यापिकेशी गप्पा मारायला लागलो.

 नंतर अजून एक गोष्ट कळाली, की समितीने प्राचार्यांना मुलांच्या मध्य सत्राच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मागितल्या तर प्राचार्य ते देऊ शकले नाहीत.

कारण परीक्षा न घेताच गुणदान झाले होते. समिती आमच्या विभागात आली. आमच्या जैव-तंत्रज्ञान विभागात एकसुद्धा उपकरण जैव तंत्रज्ञानाशी संबंधित नव्हते.

त्यांनी जास्त काही प्रश्न विचारले नाहीत व आम्ही आधीच बोलणी खाल्ल्यामुळे जास्त बोललो नाही. जाताना ते आमची राहिलेली अब्रू काढून विजयोन्मादात निघून गेले.

महाविद्यालयांत जवळपास ८० च्या आसपास प्राध्यापक, तीन प्राचार्य व इतर बरेच मान्यवर असताना तीन महाविद्यालयांचे मिळून तीन वर्षांचे विद्यार्थी होते तब्बल १५ ते २०!

बाकीचे थेट परीक्षेलाच येणार असतील बहुतेक. मी विद्यार्थी जमा करून एक छोटसे व्याख्यान घेतले. मुलांबरोबर संवाद साधला तेव्हा कळाले, की तिथली परिस्थिती दिसते त्यापेक्षा वाईट आहे.

इथे नियमित व्याख्यान होत नाही. येथे केवळ १०-१२ जण कार्यरत आहेत. शिक्षकांना आपलाच विषय शिकवावा, असे बंधन नाही.

राहायला वसतिगृह नाही. बरेचसे विद्यार्थी आंध्र प्रदेशातील आहेत. त्यांनी तर डोनेशन भरून प्रवेश मिळविला आहे.

महाविद्यालयात ना सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ना खेळाच्या कसल्या स्पर्धा. तेथे खेळण्यासाठी कुठलीच सुविधा नाही.

मी मुलांना सांगितले, की तुम्ही भरलेल्या पैशाचा व वेळेचे मूल्य समजून घ्या व तुमचे प्रश्न समितीसमोर मांडा.

संध्याकाळी समिती बैठक घेऊन आल्या पावली परत गेली. आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला; पण आमचा आनंद जास्त काळ टिकला नाही.

कारण आमच्यासारख्या भुरट्या मनसबदारांना तिथला क्लार्क तीन हजार द्यायला लागला. आम्ही आमच्या एजंटकडे तक्रार केली.

त्याने व्यवस्थापनाशी भांडून आमच्या हक्काचे चार हजार मिळवून दिले; पण आमच्या संध्याकाळचे जेवणाचे पैसे त्याने काही दिले नाहीत.

म्हणून आम्ही जराशा जड अंतःकरणाने व चार हजार मिळाल्याच्या लाचार आनंदाने महाविद्यालयांना रामराम ठोकला.

येताना अनेक देवस्थानांना भेटी देऊन विद्यार्थ्यांप्रती केलेली पापे धुऊन टाकली.



टीप: सदरील लेख ऍग्रोवन ई-पेपर eSakal मध्ये आलेला आहे.

मुळ लेखक श्री विजय रहाणे यांनी परवानगी दिली असल्याने https://itworkss.in/ च्या वाचकांसाठी आम्ही हा लेख आपणासाठी उपलब्ध करून दिला आहे.



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button