My title My title
Something Different

वेताळवाडी किल्ला…

वेताळवाडी किल्ला…

©डॉ. मदन सुर्यवंशी


मराठवाड्याचा भूगोल हा प्रचंड मोठ्या इतिहासाचा साक्षीदार आहे.


अजिंठा-वेरूळ लेण्या, पितळखोरा लेण्या, बीबी का मकबरा, पाणचक्की, खुलताबाद यांसारख्या ऐतिहासिक पर्यटन स्थळांबरोबरच पर्यटकांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांमध्ये अजूनतरी ‘दौलताबाद’ हे एकमेव आकर्षण आहे.

परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात याच्या तोडीस तोड अंतूर, वेताळवाडी, लहुगड नांद्रा, तालतम, भांगसीमाता, सुतोंडा , राहिलगड, मस्तगड असे तब्बल आठ दुर्लक्षित गड-किल्ले आहेत.


माहितीच नसल्याने पर्यटक तिथे फिरकतही नाहीत. काळाच्या ओघात हे किल्ले दुर्लक्षित झाले. पुरातत्त्व खात्यासाठीही त्यांची ऐतिहासिक वास्तूएवढीच किंमत उरली आहे.
यापैकीच एक सोयगाव तालुक्यातील हळदा गावापासून अवघ्या ३ किलोमीटरवर असलेला ‘वेताळवाडी किल्ला’. या किल्ल्याला स्थानिक लोक वसईचा किल्ला किंवा वाडी किल्ला सुद्धा म्हणतात.
काही इतिहास संशोधकांनुसार सहाव्या शतकात गुप्त घराण्याचा राजा विक्रमादित्यने हा किल्ला बांधल्याचा इतिहास आहे. तर पुरातत्त्व खात्याच्या नोंदीनुसार हा किल्ला बाराव्या शतकात उभारला गेला.
वेताळवाडी किल्ला चालुक्य किंवा यादवकालीन असेल असेही म्हटले जाते. परंतु शिलालेख, नाणी यांसारख्या स्थापत्यशैलीच्या खुणांअभावी तोही केवळ कयास ठरतो .

पंधराव्या शतकानंतर औरंगाबाद व लगतच्या प्रदेशावर राज्य केलेले अहमदनगरचे निज़ाम, नंतर मुघल आणि त्यानंतर हैदराबादच्या निज़ाम राज्यकर्त्यांकडे ह्या किल्ल्याचा ताबा असेल असा फक्त अंदाज बांधला जाऊ शकतो.


पुराव्यांअभावी या किल्ल्याची निर्मिती कुणी आणि कधी केली ह्याबाबत अजूनही संभ्रम आहे.


सोयगाव आणि सिल्लोड तालुक्याच्या सीमेवर उभा असलेला हा किल्ला वेताळवाडीकडून हळदा गावाकडे घाट रस्त्याने जाताना डावीकडे अख्ख्या डोंगरालाच जणू कवेत घेतो.
घाटरस्त्याच्या बाजूला गेलं की किल्ल्यावर जाणारी एक पायवाट आहे. अजिंठा डोंगररांगेतील सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या या किल्ल्याला जंजाळा किल्ल्याच्या दिशेने तोंड असणारा उत्तरमुखी ‘जंजाळा दरवाजा’ हा मुख्य दरवाजा आहे.
याव्यतिरिक्त पायथ्याच्या वेताळवाडी गावाच्या दिशेने असणारा ‘वाडी दरवाजा’ देखील आहे. असे जवळपास २० फुट उंचीचे दोन भव्य दरवाजे वेताळवाडी किल्ल्याला आहेत. या दरवाज्यांच्या खांबावर शिल्प कोरलेली आहेत.
प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पाहरेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर किल्ल्यात एक घुमटाकार इमारत आहे.
याव्यतिरिक्त किल्ल्याची भव्य तटबंदी, बूरुज, धान्यसाठ्याच्या खोल्या, घोडपाग, तेला-तुपाचे टाके, नामजगीर मशीद, भग्न राजवाडा, ६ फूट१० इंच लांबीची तोफ आदी अवशेष आजही सुस्थितीत आहेत.
किल्ल्यावर पाण्याचा भला मोठा तलाव आहे. काळजीआभावी कोरडा पडला असला तरी हा तलाव किल्ल्याची पाण्याची गरज भागवत असेल याची खात्री पटते.
दरवाज्यातून दगडी जिन्याने उजव्या देवडीच्या वरच्या बाजूस गेल्यावर एका चौकोनी भागातून खाली उतरायला दीड ते दोन फुट उंचीच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या एका गोलाकार खोलीत घेऊन जातात. या खोलीच्या खिडक्यांमधून दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोडी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा अदभूत नजरा अनुभवायला मिळतो.

किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर कमानींनी वेढलेला एक हवामहल आहे. या हवामहलातून पायथ्याशी असलेलं वाडी गाव दिसत..


सध्या सुरक्षाव्यवस्थे अभावी किल्ल्यात असणाऱ्या खोल्या शेळ्या-मेंढ्या आणि त्यांच्या मालकांसाठी दुपारच्यावेळी विश्रांतीचं हक्काचं ठिकाण आहे.
किल्ल्याच्या खालच्या बाजूस काही कपारी आहेत. या कपारींबाबत अनेक कथा इथले स्थानिक लोक सांगतात. याविषयी बोलताना हळदा गावचे रहिवासी प्रकाश शिम्बरे सांगतात “उन्हाळ्यात सावलीसाठी आणि पाण्याच्या शोधात शेळ्या-मेंढ्या या कपारीत जातात. या मेंढ्या थेट अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये निघाल्याचं सुद्धा बोललं जातं.
काहीवेळा शिकारीसाठी जेव्हा तरुण मुलं या कपारींखाली जातात तेव्हा आतमध्ये मोठमोठ्या बंद बदरवाज्यांच्या खोल्या आणि त्यांना लोखंडी कुलूप असल्याचं सांगतात.
त्यांच्यामते आतमध्ये अंधार असल्यामुळे ठराविक अंतरानंतर पुढे जाता येत नाही” या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे हे शास्त्रीय पद्धतीने पडताळून पाहिल्याशिवाय कळणार नाही.
वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरातच रुद्रेश्वर लेणी आहेत. या संपूर्ण परिसरात लहान मोठ्या लेण्यांची संख्या भरपूर आहे.
अजिंठा डोंगररांगेचाच भाग असलेल्या या किल्ल्याच्या भूभागाचा अजिंठा लेण्यांशी संबंध असू शकतो ही शक्यता सुदधा नाकारता येणार नाही.
वेताळवाडी किल्ला सरकारी यादीत असला तरी त्याच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न करताना मात्र प्रशासनाचा हात आखडला जातो. किल्ल्याच्या परिसरात हजारो सीताफळाची झाडं आहेत.
मोसमात या झाडांचा वनविभागामार्फत व्यापाऱ्यांमधे लिलाव केला जातो. प्रशासन आणि वेताळवाडी किल्ला यांचा तेव्हढ्यापुरता संबंध यावेळी येतो.
निसर्गसंपदा लाभलेल्या परिसरातील प्राचीन किल्ले पाहण्याची संधी पर्यटकांना मिळावी यासाठी २०१४ साली औरंगाबाद जिल्ह्यातील अंतूर, वेताळवाडी आणि जंजाळा या तीन किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम वनविभागाने हाती घेतले होते.
त्यावेळी जवळपास २ कोटी इतका निधी या किल्ल्यांच्या वाट्याला आला होता. अंतुर किल्ल्याच्या डागडुजी आणि सौंदर्यीकरणानंतर हे काम पुन्हा मंदावलं.
अंतुर किल्ल्यानंतर जंजाळा आणि वेताळवाडीच्या कामला सुरुवात होणार होती पण हे किल्ले त्यानंतर दुर्लक्षित राहिले. काही महिन्यांपूर्वी वेताळवाडीच्या तटबंदीचा काही भाग ढासाळल्यानंतर पुन्हा एकदा किल्ल्याच्या सांवर्धनाचा प्रश्न समोर आला.
पुरातत्व विभागाकडून तटबंदीच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र या किल्ल्याला पर्यटकांच्या दृष्टीक्षेपात आणण्याबाबत प्रशासन उदासीनच असल्याचे दिसून येते.
आजही पिण्याची अनुपलब्धता सुरक्षा कठडे व माहितीफलकांचा अभाव आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे पर्यटक या सुंदर आणि भव्य वास्तुकडे पाठ फिरवतात.
असे असले तरीही दुर्गप्रेमी आणि इतिहासाचे अभ्यासक मात्र असुविधांकडे दुर्लक्ष करत वाडी किल्ल्याची वाट धरतात. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे सहकारी सतिश वाघमारे ‘मांडे सरांनी २०१३ सालच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस वेताळवाडी किल्ल्याची सफर करण्यात घालवल्याची’ आठवण सांगतात.

‘गड किल्ले महाराष्ट्राचे’ या पुस्तकातून प्रमोद मांडे यांनी वेताळवाडी आणि त्याची संरचना यावर प्रकाश टाकला आहे.


तितकासा प्रसिद्ध नसला तरी दुरून पाहिल्याल्यावर या किल्ल्याकडे जाण्याचा मोह बऱ्याच लोकांना आवरत नाही. किल्ल्याला भेट दिल्यानंतरच्या अनुभवाबद्दल सांगताना पर्यटक मिलिंद जमादार म्हणतात “सुस्थितीत असणारी तटबंदी ही या किल्ल्याची जमेची बाजू आहे. या वास्तूला जपलं जावं.
डागडुजीचं काम किल्यावर चालू आहे पण ते सुदधा अतिशय संथ गतीने चाललंय असं दिसतं. वाडी किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींच्या आधारे आपण निरीक्षण करतो.

या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल असं काहीच तिथे उपलब्ध नाही. अधिक योग्य माहिती मिळावी यासाठी इथे माहिती फलकांची आवश्यकता आहे. किल्ल्याच्या बऱ्याच भागात रस्त्यांअभावी जाता येत नाही.

त्यासाठी रस्त्यांची योग्य निगा आणि मार्गदर्शक फलकांची व्यवस्था केल्यास पर्यटकांची संख्या नक्की वाढेल.


 औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळ लेण्या ही जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं आहेत. इथे परदेशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. एक परदेशी पर्यटक सात जणांना रोजगार देतो.


या दुर्लक्षित गड-किल्ल्यांची योग्य निगा राखल्यास इथे पर्यटकांचा ओघ वाढेल आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. काही ठराविक पर्यटन स्थळांवरच नेहमी पर्यटकांची गर्दी असते.


जितकी जास्त पर्यटनस्थळे विकसित होतील तितका पर्यटकवर्ग विभागला जाईल. पर्यटकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील शासनाचे प्रयत्न आणि स्थानिक लोकांचा सहभाग यातून या वास्तूचे हरवलेले वैभव परत मिळवून देण्यास मदत होईल.


©डॉ. मदन सुर्यवंशी


Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button