My title My title
Post'sSomething Different

Children’s reggae and their brotherhood

मुलांच्या रेघोट्या आणि त्यांचे भावविश्वप्रा. पंचशील डावकर

(समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)

Mob- 9960001617रंग आणि त्यांची अनुभुती घेणं हा लहान मुलांचा स्थायी भाव आहे. हातात रंग आले की, त्याच्या रेघोट्या मारणं ही एक त्यामधील नैसर्गिक प्रक्रिया होऊन जाते.

आपल्या आयुष्यात कोणती ना कोणती कला आली पाहीजे असं आधीच्या पिढीतले प्रत्येक जण म्हणत असत. नावीण्य, सर्जनशीलतेचा जन्म कलेच्या कुशीमधून होत असतो.

म्हणूनच चित्रकला ही सर्व मुलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. लहानपणापासूनच हातात जे पडेल त्यातून मुलं प्रयोग करायला सुरुवात करतात.

मोठ्यांनी पेन हातात धरलेला पाहीला की, लगेच मुलांनाही तो हवा असतो मग, कागदावरती त्यांच्याकडून रेघोट्या अवतरायला सुरुवात होते.

वेगवेगळे ठसे तयार करणं, पेन उघडून, उकलून पाहणं शाई कशी बाहेर येते ते तपासणं, हे केवढं मोठं संशोधन करण्यामध्ये मुलं मग्न होतात. मुलांचं वय जसजसं वाढत जातं तसतशा या कागदावरच्या भिंतीवरच्या खुणा अर्थपूर्ण बनू लागतात.

चित्रांच्या माध्यमातुन मुलांची जगाबद्दलची समज वाढत जाते. आपल्याला काय महत्वाचं वाटतं, हे सांगण्याची सोपी पध्दत म्हणजे, मुलांनी काढलेली चित्रे असतात.

बालविकासातील अभ्यासकांच्या मते अगदी, दहा महिन्यांच्या बाळाला देखील चित्रे काढण्याची संधी दिली पाहीजे, कारण शाब्दिक, भाषिक संवादाच्याही आधी मुल चित्राद्वारे संवाद साधतं.  

त्याची अभिव्यक्ती त्यातुन उतरत असते. एखादं मुलं चित्र काढतं म्हणजे ते कागद, रंग, किंवा पेन्सील यांना वाया घालवत नाही किंवा त्या नुसत्या रेघोट्या नसतात तर ख-या अर्थानं मुल चित्र पंचेइंद्रियांनी अनुभवत असतं.

मुलांनी पाहिलेले विविध रंगातील आकार त्यांना कमालीचा आनंद देतात. त्यातील एखादा भाग निरागसपणे रेखाटतांना ते देहभान विसरुन जातात. तर कधी स्वतःचा आनंद त्यांना होणारा त्रास ते व्यक्त करत असतात.

रंजन सात वर्षांचा आहे. त्याला चित्रं काढायला भिंतीवरती रेघोट्या मारायला प्रचंड आवडतं. त्याच्या चित्रांमध्ये बहुतेक वेळा माणसं आणि मोटारी असतात.

एके दिवशी त्याने एक मोटारीचे चित्रे रेखाटले, त्यामध्ये एक माणूस बसलेला आहे आणि त्याच्या हातात उलटी झाली तर बॅग पकलेले ते चित्र होते.

पुन्हा दुस-यांदा त्याने एक बस काढली, त्या बसमधील चित्रांमध्ये सर्व बसलेली माणसे आणि त्या प्रत्येकाच्या हातात उलटी झाली तर बॅग  पुढ्यात पकडलेली असे ते चित्र होते.

म्हणजे रंजन ला  होणारा प्रवासातला त्रास त्याने व्यक्त केला होता. त्याला नक्की काय होतयं, त्याच्या त्रासाची दाहकता त्यामधून त्याने व्यक्त केली होती. 

आपल्याला आलेला अनुभव आजुबाजुच्या लोकांनाही होतो हे त्याला दर्शवायचं होतं.  हा विचार त्याला कुठुन आला असेल त्याला हे सुचलं कारण त्याने त्याच्या चित्रांची मदत घेतली.

कधी कधी मुल एकच एक रंग निवडतं, कधी कधी मुलं फिक्कट रंग निवडतात याचा अर्थ त्यांची एनर्जी लेव्हल सध्या तरी तेवढी जास्त नाही शिवाय मनोवस्था तेवढी आनंदी नाही हे स्पष्ट होतं.

बालभवनात मुलं विविध रंगाच्या छटा अनेकदा चित्रातुन साकारतात. मुलांच्या चित्रात मोठी माणसं असतात तर कधी खुप लहान लहान अगदी गोळा टिंब असलेली इवलीशी देखील माणसं दिसुन येतात.

स्वीत्झर्लंडमध्ये काही वर्षापुर्वी मुलांच्या चित्रकाढण्याच्या शैली वरुन त्यांचा आय क्यू आणि भावावस्था समजण्याचा प्रयोग करण्यात आला होता. 

त्यावरुन आपण जे खेळ आणि शब्दाद्वारे सतत व्यक्त करतो, तेवढाच संवाद मुलं चित्रांच्या माध्यमातुन जगाशी करतात. हे पुन्हा पुन्हा सिध्द झालं.

  1. जी मुलं सारखी बडबडत असतात, त्यांच्या चित्रातला चेहरा मोठा आढळुन आला..!

  2. ज्या मुलांना डोळ्यांच्या धाकाने नियंत्रित करण्यात आलं, त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये चित्राच्या तुलनेत डोळे मोठे रेखाटले.

  3. ज्या मुलांच्या इच्छांचे दमन झाले त्यांच्या चित्रांमध्ये मान अगदी उंच दिसुन आली.  चित्रातील पसरलेले दोन्ही हात जगाशी संवाद आंतरक्रिया करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसले.

  4. तर ज्या मुलांचा बालपणात लैंगिक छळ झाला त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये हमखास हात नसलेल्या चित्रांना प्रकर्षाने रेखाटलं होतं. म्हणजे हातांनी प्रतिकार करता येतो पण माझ्या हातामध्ये तेवढी खरं तर ताकद नाही हे सांगण्याचा केवढा महत्वाचा प्रयत्न होता तो. 

खरं तर चित्रांची भाषा ही जागतिक भाषा आहे ती जगातल्या कोणत्याही माणसाला जोडून ठेवते.

आपल्या मुलांनी काढलेली चित्रं कशाची आहेत. त्यामध्ये नेमकं त्याला काय म्हणायचं आहे, हे पालकांनी आवर्जून विचारावं. त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी ती खुप मोठी संधी असते. 

खऱं तरं मुलांच्या चित्रांतुन त्याला काय अभिव्यक्त करायचं आहे, याचा अलिकडे खुप जास्त शास्त्रशुद्द अभ्यास केला जात आहे. अकरा वर्षांच्या अमनला वर्गात चित्रकलेचा तास असला की, सारखं एकच चित्र रेखाटायला आवडायचं आणि ते होतं घराचं चित्रं.

अनेक दिवस त्याच्या चित्रातुन येणारा घर हा विषय सरांनी जाणून घेतला होता.

अचानक एके दिवशी सर अमनच्या घराच्या रस्त्याच्या बाजुने जातांना दिसले. अमन पळत सरांच्या गाडीकडे आला. पण लगेच थबकला, सरांनी त्याला विचारलं, “अरे इकडे कसा ! काय?”

मनाने थिजलेल्या अमनने हाताने दाखवले, म्हणाला, “सर ते माझं घर..”  सरांनी पाहीलं ते लांब रस्त्याच्या कडेला ठोकलेले पाल होते.

आज त्यांना समजलं अमनच्या चित्रात घर का येत राहीलं ते. घरात असणारी स्थिरता सुरक्षितताच जणु काही अमन त्याच्या चित्रांच्या माध्यमातुन व्यक्त करत राहीला. 

थोडक्यात काय तर मुलं जसजसे मोठे होत जातील आणि परिपक्व होतील तसतशी त्यांची चित्रे अधिक तपशीलवार होतील आणि त्यांच्या भोवतालच्या जगाचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटेल.

अनेकदा आपण त्याला टोकतो, हे काय काढलंस?  पण तसं खरं तर न म्हणता त्याचा अर्थ विचारण्याचा प्रयत्न करावा त्यातुन एखादी गोष्ट एखादा अनुभवाचा प्रत्यय येऊ शकतो. 

मुलांना त्यांच्या वाढत्या वयात चित्रांची जादु अनुभवता आली तर तो त्यांच्यासाठी अत्यंत मोलाचा ठेवा होऊ शकतो. रेघोट्या आणि चित्रांच्या माध्यमातुन मुलं सर्जनशील तर होतातच पण त्याच बरोबर त्यांचे हात आणि नजर यांच्यातील ताळमेळ देखील सुधारतो. 

मुलांच्या भावविश्वाची ओळख आपल्याला होते. एवढंच नाही तर त्याची जगाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आणि दृष्टीकोन यांचे आकलन समोर येते. मुलं प्रगल्भ होतात. बौध्दिक विकासासह त्यांच्यातील कुतुहल उजागर होते.

एकदा आम्ही मुग्धा पोतदार यांच्या घरी जेंव्हा आम्ही बालभवनाच्या वतीने भेट द्यायला गेलो होतो, तेंव्हा त्यांनी त्यांच्या घरातील भिंती मुलींना चित्रे, रेघोटया काढण्यासाठी दिल्या होत्या.

आरोही आणि मनवा त्यांच्या मुड प्रमाणे केंव्हाही  या भिंतीवरती चित्रे काढू शकत होत्या. खरोखऱ बालपणातील हा चित्रकलेचा काळ फार मौल्यवान आहे, तो आपण पालकांनी काळजीने सांभाळायला हवा.

परंतु दुर्देवाने आपल्याकडे चित्रकला हळू हळू वय वाढत जातं आणि ती मागे पडत जाते. मुलांची माणसं करतांना नकळत आपण त्यांच्यातील कलेला मारत जातो. 

मग दिलेले ठोकळे रंगवत राहणं, अभ्यासात काय विचारलं जाईल, परिक्षेत काय येणार आहे?

हा ध्यास या चित्रांपेक्षा मोठा होत जातो. 

या मार्कांच्या मोजमापात अमुल्य असलेलं मुलांच भावविश्व त्याच्या आयुष्यातुन हिरावुन घेत असतो. हे असं आपलं पालक म्हणून वागणं कसं चालेल??

याचा विचार करणं अत्यावश्यक आहे.  चित्रांच्या माध्यमातुन अनेक प्रकारे मुल घडत असतं त्याचे नियोजन कौशल्ये वाढीस लागते, काय केल्यानंतर नक्की  काय करायला हवं याचा विचार प्रगल्भ होतो. निर्णय क्षमता वाढीस लागते.

अलीकडे चित्रकलेच्या माध्यमातुन उपचार करण्याची पध्दती अधिक विकसित होत आहे. त्याच्यावरती खुप सारं विविध पध्दतीने संशोधनही सुरू आहे.

आपण मात्र ठराविक चौकोनातलं शिक्षण आणि अभ्यास त्याचे पाठांतरामध्ये झालेले रुपांतर हा अत्यंत कंटाळवाणा झालेला प्रघात अधिक अधोरेखित करत आहोत का हे पुन्हा नव्याने तपासायला हवे. 

कारण मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी त्यांच्या निरागसतेला प्रकट होण्यासाठी जगाच्या पाठीवरती चित्रांसारखी अन्य भाषा नाही. म्हणूनच

जगप्रसिध्द फ्रेंन्च चित्रकार पिकासो नेहमी म्हणत की,

“मोठय़ा चित्रकारांसारखी वास्तववादी चित्रशैली आत्मसात करायला काही वर्षांची मेहनत पुरते, परंतु लहान मुलांसारखी चित्रं काढायचा मी आयुष्यभर प्रयत्न करत राहीन.”

चला तर मग मुलांच्या रेघोट्यांना अधिक रंजक करुयात.प्रा. पंचशील डावकर

(समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)

Mob- 9960001617मुलांच्या रेघोट्या आणि त्यांचे भावविश्वUbuntu-उबंटू(Opens in a new browser tab)

आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता(Opens in a new browser tab)

 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button