My title My title
Post's

The kitchen in Marathi

स्वयंपाकघर नावाची रंजक गोष्ट



©प्रा. पंचशील डावकर

(समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)

Mob- 9960001617



प्रत्येक कृतीमधून लहान मुलं शिकत असतात. ती अगदी बिनचुक व्हावीत, त्यांना सर्व प्रकारची लाईफ स्कील्स मिळावीत यासाठी पालक म्हणून आपण जीवाचा आटापीटा करतो.

सोबतच आपली धडपडही ही असते की, त्याची जडण-घडण होतांना त्याचे कुठे अडायला नको. पण या धडपडीमध्ये आपण खरोखरच किती मुलांना किचन हे त्याचं लर्निंगसेंटर असतं आणि म्हणून त्याला आपल्या देखरेखीखाली ते उपलब्ध करतो?

खुप कमी सजग पालक मुलांना किचनमध्ये खेळण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी अवकाश देत असतात. त्यांना भाजेल, खरचटेल, कापेल, या भितीने अनेक गोष्टींपासुन आपण सुरक्षित ठेवत असतो.

एका अर्थी ते अगदी बरोबरही आहे पण खरं तर स्वयंपाकघरामध्ये मुलांना अनेक पदरी शिकता येतं, मुलांना भाषा आत्मसात करण्यासाठी किचन इतकी सुंदर जागा नाही.

शब्द, चिन्हे मोजमाप आणि संख्या कौशल्याचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी किचन ही उत्तम जागा आहे. तो सुंदर असा अनेक प्रयोगांचा मिलाफ आहे. नीना तिच्या मुलांना स्वयंपाक करतांना कणकेचा गोळा हमखास देते.

हा गोळा मुलांसाठी सर्वात आनंददायी गोष्ट असते. त्याची लवचिकता, मऊ स्पर्श मुलांना फार आवडतो. त्यातुन होणारे निरनिराळे आकार तिच्या मुलांना फार आवडतात.

विशेषतः कणकेच्या पीठाचा होणारा मऊ स्पर्श हा कमालीचा आनंददायी असतो.

एका बाजुला मुल त्या पीठाचा स्पर्श झाल्याने नैसर्गिकरित्या रिलैक्स होतं आणि दुस-या बाजुला त्यांना हवा तो आकार कणकेला देतो येतो त्यातून त्यांच्या बोटांचा व्यायाम तर होतोच.

पण ते कितीतरी वेळ त्याच्यासोबत खेळतात. मी नीनाला विचारलं, “हे मुलांना कणीक देणं, सांडासांड करणारं आहे त्यामुळे तुझं काम वाढत असेल की?”

त्यावरती ती म्हणाली, “हो, वाढतं! नक्कीच ते पसारा सांडासांड करतात पण त्यांची खेळातली तल्लीनता पाहुन मला फार सुखद वाटतं.”  

किचनमधील कणकेसोबत खेळातले अनेक फायदे आहेत. पदार्थांचे आकार नक्की कसे बदलतात, ते बदलल्यावरती कसे दिसतात.

त्यांच्या माध्यमातुन प्रश्नांना अडचणींना कसे सोडवता येऊ शकते यातील शोध मुलं घेत असतात. ती सवय वाढीस लागते.

विविध प्रकारातल्या आकाराची गंमत मुलांना मजा आनंद देते. आपण काही तरी नवे तयार करु शकतो यातील आनंद त्यांचा आत्मसन्मान वाढवणारी गोष्ट असते.

किचनमध्ये सियानाला फार आवडतं ती पातेलं, डबे, ग्लास, असे वेगवेळ्या भाड्यांना रांगेत ठेवून त्यातून आवाज कसा येतो हे तपासते प्रत्येक वेळी तिला काहीतरी नवीन आयडिया येते त्यामध्ये तिचा वेळ कसा जातो हे कळत नाही.

ग्लासाने कोबी कापण्याचा सराव मुलांना खुप रंजक वाटतो. त्यातुन येणारा आवाज वेगळीच मजा देतो. अन्वीला किचनमध्ये सरबत बनवतांना विशेष आनंद होतो ती सरबतासाठी किती पदार्थ लागतात, ते कसे मोजून घ्यायचे, हे शिकली आहे.

ती त्यासाठीची तयारी जाम खुशीने करते आईला समोर बसवुन कृतीचा क्रम विचारते त्यामुळे तिला सरबत बनवायला फार म्हणजे फार आवडतं.

अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या तयारीत मुलांना आपण सोबत राहुन कृती करायला सांगितलं तर प्रत्येक मुल स्वावलंबी आणि खुप आत्मसन्मानाने वाढेल.

आपल्या भारतामध्ये तरी अनेक मुलांना अडचणीच्या काळात आजही स्वतःचा स्वयंपाक स्वतः करता येत नाही कारण काय तर आईने त्यांना हे तुमचं क्षेत्र नाही.

यामध्ये नसती लुडबुड करु नका म्हणून कायम दूर ठेवलेलं असतं. स्वयंपाकामधल्या आनंदापासून एक प्रकारे आई मुलांना दुर ठेवत असते.

त्यामुळे आणि आपल्या सामाजिक जडण-घडणीमुळे देखील मुलांना किचन फक्त पोटभर जेवण मिळणारे ठिकाण म्हणून परिचित असते.

पण जेंव्हा हीच मुलं मोठी होऊन घर सोडून राहतात तेंव्हा त्यांचे स्वंयपाक न शिकल्यामुळे होणारे हाल प्रचंड मनस्ताप देणारे असतात.

मुलगा आहे कशाला पाहीजे त्याला किचनचे ज्ञान या धारणेपोटी आपल्यातील हजारो आया मुलांना त्यांच्यामधील उत्कृष्ट अशा आचा-याचा खात्मा जणू काही बालवयातच करीत असतात.

स्त्रीयांनीच स्वयंपाक केला पाहीजे हे नैसर्गिकरण सतत केल्यामुळे पुरुषांना स्वयंपाकासाठी कराव्या लागणा-या बौध्दीक आणि शारिरीक श्रमातुन, त्या घ्याव्या लागणा-या जबाबदारीमधून आपोआप सुट मिळत असते.

आणि दुसरं असं ही सुट ते घेतात पण ज्यांच्या श्रमातुन त्यांचे भरण-पोषण होत असते, त्यांच्या श्रमाबद्दल संवेदना आणि आदर वेळोवेळी व्यक्त करावा लागतो ही गोष्ट सोयीस्कररित्या ते गृहीत धरतात.

मला वाटतं मुलांना समता शिकवायची असेल तर किचन इतकी सुरेख जागाच नाही.

किचनमध्ये आपल्या मुलांनी केलेले अनेक पदार्थ ते जेवढ्या चवीने खातात त्याही पेक्षा ते अधिक जबाबदार बनतात.

त्यांना स्वयंपाक घरातील श्रमाचे महत्व उमगते, पदार्थांना नावं ठेवण्यापुर्वी त्याला लागणारे श्रम किती व कसे असतात याचे चित्र डोळ्यासमोर येते.

ती प्रक्रिया त्यांना परिपक्व बनवण्यास मदत करते. त्यांची कल्पनाशक्ती वाढते, बौध्दिक विकास होतो, मदतीची भावना वाढीस लागते. मयंक आणि मिथांशला त्यांची मम्मा दररोज भांडी पुसण्यासाठी मदत करायला सांगते.

ते दोघेही हाती कपडा घेऊन मोठ्या आनंदाने हे काम करतात.

चपाती गोल असते ती कधी पृथ्वीचा गोल असते तर कधी वर्तुळ असते. तिचा मध्यबिंदु कुठे आहे हे सांगण्यासाठी मोहीतला त्याची मम्मा जाम भावते.

त्यावेळी ती त्याची भुमितीची जगातली सर्वात बेस्ट टिचर असते. लोणच्यांची प्रकिया समजुन घेतांना मुलांना रासायनिक प्रक्रिया सहज कळुन जातात. ती मोठ्या गमतीने मुलं पाहत असतात.

हळद टाकल्याने येणारा भाज्यांना रंग कसा येतो हे अनुभवनं जसं रंजक असतं तसेच चिंचेंमुळे येणारी चवही. आज आपण पाहतो की, आपल्या लहान मुलांना आपल्यापेक्षा जास्त मोबाईल मधील फिचर जास्त समजतात.

ते स्मार्टपणे हाताळतातही त्याच तोडीला किचन सुध्दा आपण खुलं केलं तर सर्व मुलांना हा अवकाश खुप सुखद आणि सोयीचा वाटेल. फ्रुट सॅलड, केक, बिस्कीट, लाडु तयार करण्यासाठी तर मुलांना फार आवडते.

स्वयंपाक हा एक बहुसंवेदनात्मक अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या मुलांना स्पष्टपणे स्वयंपाकाच्या माध्यमातुन ‘शिकवू शकता ‘ त्यामुळे  ते त्यांच्या इंद्रियांद्वारे संवेदना शिकतील.

चव, श्रवण, स्पर्श, गंध आणि वेगवेगळे पदार्थ पाहून त्यांच्यामधील संवेदना कौशल्य निर्माण करण्यासाठी मेंदू त्यांना तल्लख करतो. मुलं अनेक प्रश्न विचारतात चौकस होतात.

चवींबद्दल बोलतात त्यांचं शेअरींग वाढतं. कोणता पदार्थ खारट, तिखट, गोड आहे हे चाखु शकता. पदार्थांच्या तयारीत  मिसळतांना, किसतांना,  निवड करतांना, वितळतांना तुम्हाला कोणते आवाज ऐकू येतात?

हे मुलं पाहत असतात. जेंव्हा मुलं चपातीचा रोल करतात तेंव्हा कसे वाटते?

अन्न शिजवण्यापूर्वी आणि त्यानंतर अन्नाला कसा वास येतो?  

केकच्या मिश्रणाच्या रंगापेक्षा प्रत्यक्षात केकचा रंग वेगळा का असतो ?

जिरं मोहरी एवढी लहान का असतात?

लसूण पाकळ्यांना घट्टपकडून कसं ठेवतो?

कांदा कापतांना डोळ्यांना पाणी का येतं?

या आणि अशा अनेक प्रश्नांमागील सर्व विज्ञान मुलं किचनमध्ये शिकतात.

भांड्यांची स्वच्छता का करावी लागते ? ते केल्याने काय होते? याचे जणुकाही संशोधन मुलं करत असतात. आपण मात्र त्यांना ह्या नव्या संशोधनापासुन दुर लोटत असतो.

किचन इतकी संवादाची दुसरी जागा नाही सहज क्रिया करत आनंद घेत कितीही गप्पा करता येतात. हात आणि डोळे, यांचा समन्वय मुलांना करता येतो.

विचार करता येतो, बुध्दीबळाच्या खेळात जसे विविध पर्याय शक्यता तपासता येतात अगदी त्याच शक्यता मुलं तपासत असतात. श्रमाबद्दल प्रतिष्ठा वाढते त्याबद्दलची कृतज्ञता मुलं शिकतात.

अशा प्रकारे किचनमध्ये मुलांना मजा करु देण्याची नामी संधी पालकांनी दयायला हवी.

लॉकडाऊनच्या काळात काही करण्याचे आणि काही कळण्याचे दिवस अनेकांनी अनुभवले त्यापैकी, अवलोकित एकुलताएक आहे. त्याच्या आईची लॉकडाऊनच्या काळात मणक्यांची शस्त्रक्रिया झाली.

पुढील २ महिने तिला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली. सर्वत्र खानावळी बंद, हॉटेल बंद, स्वयंपाकी माणसांना घरात येण्याची सोय नसल्यामुळे अवलोकित आणि त्याच्या बाबांचे जेवणाचे फार हाल झाले.

तेंव्हापासुन त्यांनी ठरवलं सर्व स्वयंपाक दोघांनीच करायचा आणि खरोखऱ आजघडीला ते उत्तम स्वयंपाक करत आहेत. याचा अर्थ कोणताही सशक्त पुरुष कोणत्याही वयात स्वयंपाक शिकु शकतो.

त्याची कौशल्ये वाढवु शकतो, त्यामुळे कुटुंबातील स्त्रीयांवरती वाढणारे त्याचे अवलंबन कमी करु शकतो. माणसांना जिकंण्याचा मार्ग पोटातुन जातो असं आपण म्हणतो तर त्या विजयाचे भागीदार मुलांनी सुध्दा व्हायला काय हरकत आहे.



स्वयंपाकघर नावाची रंजक गोष्ट



प्रा. पंचशील डावकर

(समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)

Mob- 9960001617



Children’s reggae and their brotherhood(Opens in a new browser tab)

The Honey trap of Coding Classes For Kids(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button