My title My title
Something Different

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴

🌴☕⛈️☔❤️गोव्याच्या किनाऱ्यावर❤️☔⛈️☕🌴

©Nandini Nitesh Rajapurkar

  • खरतर ज्यांना ज्यांना भटकंती मनापासून आवडते किंवा ज्यांना फिरायला खुपच आवडत त्यांच्या मनात आयुष्यात एकदा का होईना पण गोवा जायचं एवढं नक्की असतं.!!

त्यातला एक म्हणजे गोवा जायचं ठरवून निघायच्या आदल्या रात्री प्लॅन फिस्कटलेले मी सोत्ताच्या डोळ्यांनी पाह्यलंय !😂
आणि दोन म्हणजे ज्यांचे गोवा जायचे प्लॅन पद्धतशीर ठरतात आणि ते एका फटक्यात गोवा पोहोचून तडीस ही नेतात अशा बहाद्दर गड्यांना अस्सल लवंगी फटाक्यांची सलामी..! 😍😍

आमचे तर बुवा चिक्कार वेळा गोवा जायचे प्लॅन फिस्कटलेत! त्यामुळे आम्ही प्रकार १ मध्ये मोडतो! 😒

पण पण पण यंदा आमचं नशीब लैच जोरात होतं म्हणून फिस्कटलेला प्लॅन देखील पुढं पुढं जात आमच्या स्वारी सोबत आणि चिरंजीवां सोबत आम्ही गोवा शहरी प्रस्थान करू शकलो. तसं गोवा जायची आमची ही दुसरी वेळ होती. पृथ्वीराज पोटात 4 महिन्यांचा असताना आमची गोवा वारी सहकुटुंब घडलेली. पण तेव्हा गोवा काही नीट पहायला मिळाला नाही.
जिथं जाऊ तिथं गर्दीच गर्दी!

पण यंदा बाबा कोरोनाच्या कृपेने (?)

निवांत गोवा अनुभवायला मिळाला.. आणि मी नव्याने त्याच्या प्रेमात पडले!❤️❤️❤️

गोव्याला जायचं म्हंटल की दोन दिवस आधी पासूनच पोटात फुलपाखरं जम्पिंग जपाक करू लागतात. मला पण काहीसं तसच झालेलं. (काहीसं??? खुप खुप जास्त!!!) शेवटी एकदाचा तो सोनियाचा दिनू उजाडला आणि पहाटे साडेपाचच्या सुमारास आंम्ही तिकडे पोहोचलो.
चारवर्ष आधी तोंडओळख झालेल्या गोव्यात काही ओळखीच्या जुन्या खुणा आठवतात का याचा शोध घेत मन गाडीसोबत पुढे धावत होतं. 😍
दुर्दैवाने माझी मेमरी अजिबात शार्प नसल्याने फारसा काही फायदा झाला नाही.. त्यामुळे काही आठवायचा प्रयत्न सोडून देऊन नव्याने दिसणारा गोवा अनुभवायला माझे मन सज्ज झाले..!

किंचितसा गारठा जाणवणाऱ्या गोव्यातल्या दमट हवेच्या झुळकेने आमचं स्वागत केलं.. गाडी पणजी मध्ये पुढे पळत होती आणि मला दर्शन झालं ते तिथल्या समुद्राचं..

अहाहा..

अगदीच सुंदर.. एका बाजूला डोंगर.. मध्येच मोठ्ठा पूल.. आणि दुसऱ्या बाजूला शांतसा रत्नाकर !🌴🏖️🏝️
समुद्र खूप आधीपासूनच माझा विक पॉईंट आहे. मनच नाही भरत कितीही वेळा समुद्र पाहिला तरी. ( भेंडी कोणीतरी करा रे काहीतरी पण तिच्यामारी पुण्यात समुद्र आणा😑)

रात्र आणि पहाट याच्या सीमारेषेवर असलेल्या, वर अवकाशी अखंड चांदण्या आणि खाली नजर पोहोचेल तिथपर्यंत समुद्र!! 🏝️आणि जोडीला त्याची ती विलक्षण गूढ गाज… त्या विलोभनीय दृश्याने मनाला एकदाची ग्वाही दिली… की हुश्श चला बाबा… पोहोचलो एकदाचे गोव्याला!! 😎

पहाटेच्या थोड्याश्या गार वाऱ्यात इकडे तिकडे रस्ता चुकत आम्ही आमचा हॉटेल शोधत होतो. शेजारी शेजारीच बरीच हॉटेल असल्याने थोडा गोंधळ होत होता. स्वारीनी ट्रेनिंग साठी काही महिने गोव्यात वास्तव्य केले असल्याने त्यांना हा परिसर परिचित होता, इतक्या वर्षांनी आलो असल्याने सापडत नव्हत इतकंच!

मीरामार साईडलाच फिरत असल्याने मला तर सगळं पाहतांना जाम मजा येत होती.

शेवटी दोन फेऱ्या मारून एकदाचे आम्ही आमच्या हॉटेल जवळ पोहोचलो.

कॅम्पल गार्डन / कंपाल परिसरात आमची हॉटेलची रूम होती. दोन्ही बाजूनी स्वच्छ फुटपाथ, जणू प्राचीन काळापासूनचा गोवा आम्ही पाहिला आहे असं भासवणारी प्रचंड मोठी जुनी झाडे दुतर्फा शानसे उभी होती. आमच्या हॉटेलची सीसीटीव्ही सुरक्षा पण जाम जोरात होती. रिसेप्शन जवळून पास होताना तिथल्या स्क्रीनवर आत एंट्री करण्या पासून मी आणि पृथ्वी तिथल्या टीव्ही स्क्रीनवर कॅमेऱ्यातून स्वतःला पहात होतो .. 😂

सब मोह माया हे! कसे वेड्यासारखे करतोय आपण याचा विचार करून लॉबीतुन वर जाताना खुसुखुसु हसायला येत होतं! नंतर ही आमचा हा वेडेपणा चेक आउट करे पर्यंत सुरूच होता हे वेगळं सांगायची गरज आहे का? 😝 मला माहीत आहे तुम्ही पण असं कुठंतरी नक्की करत असणार.. 【थोडी ना मी परग्रहावरून आलेय】 😂😂😂🏃🏃

तर स्वच्छ आणि छान रूम ताब्यात येताच बॅगा फेकून आम्ही सगळे झोपी गेलो. अस पण आता थोडं फार फटफटलं होतं. पण उगाच प्रवासाचा शीण जावा म्हणून झोपायचं , यासाठी जरा वेळ पडलो.

मला जाग आली तेव्हा बहुदा दोन तीन मच्छर माझा हात चवीने खात होते, त्यांच्यामुळेच झोपेत व्यत्यय येऊन मला जाग आली. भेंडी कितना टाइम मेरा रक्त पी रहे थे पता नहीं.. 😑

अंदाजानेच हातावर जोरात मारून दोघांना यमसदनी पाठवत मी खिडकी जवळ गेले.

आणि ते भलेमोठे पडदे बाजूला करत खिडकी उघडली आणि दोन क्षण डोळे मिटून त्या हिरव्या वनराईतील मोकळी हवा श्वासात खोलवर भरून घेतली..

बाहेरच दृश्य कमालच होतं!मला उठवलं म्हणून त्या मेलेल्या मच्छरांना मी मनोमन माफ पण करून टाकलं.😂

पहाटे पेंगुळलेल्या नजरेने एवढं काही पाहता नव्हतं आलं. ते सर्व आता स्वच्छ उजेडात पाहताना भारी वाटत होतं. तसं बघायला गेलं तर अगदी साधं दृश्य होत ते!

पण खरोखर प्रसन्न वाटत होतं. लांबलचक पसरत गेलेला स्वच्छ रस्ता , एवढी सकाळ असूनही गोव्यातल्या गोव्यात फिरणाऱ्या खचून भरलेल्या रंगीबेरंगी बसेस, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रुंद फुटपाथ..

विशाल झाडांच्या आडून हलके ऊन पसरवत उगवणारा सूर्यनारायण..

आजूबाजूला असलेली कागदी फुलांची लाल, गुलाबी, पिवळी झाडे, रंगवलेल्या भिंतीचे सलग मोठे सुबक कंपाउंड, आणि त्या भिंतीच्या आत असलेले वेगवेगळ्या रंगातील सुरेख बंगले!

मला तर खुपच आवडलं!!पुण्याच्या तुळशीबागेत फिरणारं माझं मन आज गोव्याच्या रस्त्यांवर डोळ्यांचं पारणं फेडत घुटमळत होतं!
फुटपाथवरून तुरळक लोक कानात हेडफोन घालून मॉर्निंग वॉक करत फिरत होते.

शहरांच्या गर्दीत हरवलेला वेगवेगळ्या पक्षांचा सुमधुर गोड आवाज कानांना वेगळीच मेजवानी देत होता.

ते म्हणतात ना,

पाखरांचे बोल कोणासाठी गाणे,
कोणा येई धुंदी, कोणी छेडी तराने..

मोठी झाडे असल्याने, डोळ्यांना न दिसणाऱ्या पक्षांचे मधुर कूजन कानावर पडत होते.

कोकिळा, पोपट, चिमण्या इ. आवाज जास्ती करून ऐकले असल्याने अजून वेगळे आवाज ऐकायला मज्जा येत होती.

ठराविक अंतराने हे आवाज येत असल्याने स्पष्ट ऐकू येत होते पण मी पक्षीप्रेमी नसल्याने कोणता आवाज कोणाचा हे मात्र समजत नव्हतं!

बाहेरच्या दृश्यात ऑलमोस्ट हरवलेली असताना एक परिचित आवाज कानावर आला..

नी माझी तंद्री भंग पावली.. तो आवाज म्हणजे चिरंजीव उठल्याने आई आई करत मला शोधत होते.
आत वळून मी त्याला बेडवरून उचलून खिडकीत आणून बसवलं आणि थोडा वेळ बाहेरची गंमत बघू म्हणून सांगितलं.

पण बाहेरच्या बस, झाडे, रस्ते , पक्षांचे आवाज हे सगळं पाहून ऐकून तो फारसा खुश झाला नसावा,
कारण बसल्या बसल्या तो माझ्या कुशीत पुन्हा एकदा झोपला होता. त्याला म्हंटल पण मी,

” अरे वेड्या गोव्यातील सकाळ आहे ही , रोज रोज थोडी ना बघायला मिळणारे?”

पण तो ढिम्मच होता. शेवटी कंटाळून मीच आत आले.

आणि घोषणा केली की ऊन चढायच्या आत लवकर आवरून बाहेर पडू आणि मस्त फिरू!

पण माझं कोणी ऐकलंच नाही.

स्वारीने तोंडावरून चादर घेतली असल्याने काय प्रतिक्रिया दिली हे मला समजले नाही, आणि पृथ्वीतर ढुंगडी वर करून एव्हाना घोरायला पण लागलेला. 😑🤣

शेवटी मीच म्हंटल आधी मी घेते आवरून मग दोघांना उठवते . आणि पुढील गोष्टी उरकण्यासाठी कूच केले.

©Nandini Nitesh Rajapurkar

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button