My title My title
Brain StormingSomething Different

कुचराचें श्रवण | गुणदोषांवरी मन || ©रवी निंबाळकर

कुचराचें श्रवण | गुणदोषांवरी मन ||

समोरचा वक्ता किंवा प्रवचनकार काय बोलत आहे हे नीट ऐकून घ्यायच्या ऐवजी काही मुर्ख लोकांना वक्त्याच्या चूका काढण्यातच धन्यता वाटते.
अशी लोकं कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला गेली की तेथे चांगले काय आहे, हे पाहण्याच्या ऐवजी आयोजकांकडून काय चूका झाल्या आहेत त्या चूका शोधण्यातच यांना आनंद मिळतो.
अशा कोत्या मनाच्या माणसांना मान – सन्मानांची तर भलतीच अपेक्षा असते आणि तो जर मिळाला नाही तर यांचा जळफळाट बघूनच घ्यावा लागतो.
मग अशा या कुजक्या बुध्दीच्या व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी चूकाच चूका दिसायला लागतात. नुसता जळफळाट हो… जळफळाट …
अशा विकृत माणसा विषयी संत तुकाराम म्हणतात…

कुचराचें श्रवण |

गुणदोषांवरी मन ||१||

जो माणूस नेहमी इतरांच्या कुचाळक्या करत असतो तसेच नेहमी दुसऱ्यांना नावं ठेवत असतो, असा माणूस जर एखादं व्याख्यान किंवा प्रवचन ऐकायला आला तर त्याचं लक्ष हे वक्ता काय बोलत आहे, याचा मतितार्थ समजून न घेता त्या वक्त्याचे गुणदोष काय आहेत याच्या विषयीच आपली टकळी चालवत असतो.
तो स्वत: तर काही नीट ऐकून घेत नाही अन् जे ऐकायला आले आहेत त्यांना ही नीट ऐकू देत नाही.

असोनियां नसे कथे |

मूर्ख अभागी ते तेथें ||२||

असा मुर्ख, कपाळकरंटा माणूस प्रवचनाच्या ठिकाणी असून नसल्यासारखा असतो. एकतर तो काही ऐकून घ्यायला मुळीच आलेला नसतो. तो फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठीच कार्यक्रमाला आलेला असतो.
स्वत: मध्ये तर काही करून दाखवायची धमक नसते परंतु इतर कुणी काही चांगलं काम करत असतील तर त्यांची बदनामी करत राहणं, एवढाच याचा धंदा असतो.
जो चांगलं करत आहे, समाजाला आपल्या कृतीतून वा उक्तीतून ज्ञान देत आहे, अशा माणसांविषयी इतरांच्या जवळ कुजक-पाजक बोलणं, तसेच दुसऱ्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणून तो कसा उधळून लावता येईल असा विध्वंसक विचार याच्या कुजक्या मेंदूत असतात.

निरर्थक कारणीं |

कान डोळे वेंची वाणी ||३||

असा हा मुर्ख श्रोता, फक्त वक्त्याच्या चूका काढण्यासाठी आलेला असतो. तसेच ‘मी किती शहाणा आहे! मला किती ज्ञान आहे!’ अशा खोट्या आविर्भावातच तो ऐकायला बसलेला असतो.  हा ऐकतो कमी मात्र, नको असलेल्या गोष्टींतच जास्त लक्ष घालतो.
समोरचा वक्ता बोलत असताना यांचे कान, जीभ, डोळे हे निरर्थक कामं करत असतात. थोडं कुठं खट्ट वाजलं की, तो लगेच दुसरीकडे पहातो.
याची नजर ही वाईट असते, ती सारखी येणाऱ्या जाणाऱ्यांना न्याहाळत असते. आणि प्रवचनाच्या दरम्यान काही ना काही तरी चघळत बसतो.
याचाच अर्थ, याचे ऐकण्याकडे कमी परंतु इतर चाळे करण्यातच जास्त लक्ष असते.

पापाचे सांगाती |

तोंडी ओढाळांचे माती ||४||

व्याखानाला आल्यानंतरही तो त्याच्या सारख्याच पापी विचारांच्या माणसांनाला सोबत घेऊन येतो. आणि ही लोकं ऐकतात कमी परंतु बडबडच जास्त करतात. अशा खोडसाळ आणि सडक्या वृत्तीच्या श्रोत्यांच्या तोंडात नेहमी मातीच पडते.

हिताचिया नांवें |

वोस पडिले देहभावें ||५||

‘काही तरी चांगले ऐकायला मिळेल! त्यातून आपलं काहीतरी भलं होईल!’ असा चांगल्या विचारांचा दुष्काळच यांच्या मनात आहे. त्यामुळे आपणं चांगलं वागतो का वाईट वागतो, याचे भानही त्यांना असत नाही.
कुणीतरी काहीतरी आपल्या हिताचं सांगतं आहे, आणि ते काळजीपूर्वक ऐकून घेऊन त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे.
असा विचारही या सडक्या वृत्तीच्या लोकांच्या मनाला देखील शिवत नाही.
दुसऱ्याचं तर काही ऐकायचं नाही तसेच ‘मी म्हणतो तेच खरं आणि मी वागतो तेच योग्य,’
अशा हेकेखोर वृत्तीच्या माणसा कडून दुसऱ्यांचे तर राहूच द्या! पण त्याचे स्वत:चेही भलं होत नाही.

फजित करूनि सोडी |

तुका करी बोडाबोडीं ||६||

तुकाराम महाराज म्हणतात, ‘ अशा लोकांची वेळीच कडक शब्दात खरडपट्टी केली पाहिजे. सगळ्या समोर फटफजिती केली पाहिजे.’
काही बिनडोक माणसं व्याख्यानाला किंवा प्रवचनाला येतात परंतु त्यांचा हेतू, चांगलं काही ऐकावं अन् त्यातील काही गोष्टी आत्मसात करून आचरणात आणाव्यात असा अजिबात नसतो.
ते ऐकायला नव्हे तर वक्त्याचे, आयोजकांचे दोष काढायला आलेले असतात. यांच्या सोबत आलेली माणसं देखील त्याच लायकीचे असतात.
समोर बोलणारा बोलत असतो अन् हे सगळे मिळून कुचाळक्या करत असतात. 
ऐकून घ्यायचेही काही नियम आहेत, त्यातील एक म्हणजे, बोलणाऱ्या व्यक्ती कडे लक्ष देऊन ऐकत रहाणे. परंतु काही लोकं वक्त्याकडे लक्ष द्यायचं सोडून इतरत्र बघत राहतात.
अशा लोकांची लागलीच कान उघडणी केली पाहिजे अन् त्यांना तेथून चक्क हाकलले पाहिजे. जेणेकरून इतरांना यांचा पुन्हा त्रास होणार नाही.
राम कृष्ण हरी 🙏
© रवी निंबाळकर
यशश्री क्लासेस, उस्मानाबाद

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!
Check Also
Close
Back to top button