Brain StormingMental HealthSomething Different
मनाच्या गाभाऱ्यात
माझ्या घरापासून थोडंस दूर एक भाजी मंडई आहे. तस अगदी घराजवळ ही आहेच पण थोडं चालणं ही होतं आणि तिथं एक माझ्या आवडीचं दृश्य पण बघायला मिळत…म्हणून मी पुढेच जाणं पसंत करते…
बाजाराच्या जवळ आलो की अलीकडे थोडी पानाफुलांची झाडी बघायला मिळते.. तिथूनच खरी पावलं रेंगाळायला सुरुवात होते.. अजून जवळ येताच रातराणीच झाड लागतं… आणि आपसुकच पाय थबकतात…
जमिनीवर आजूबाजूला त्या सुगंधी फुलांचा सडा पडलेला दिसतो…
ही रातराणी मला नेहमीच भुरळ पाडते.. तिचा तो सुवास श्वासात खोल भरून घेतल्यावर अनामिक आनंद होतो मला. तो शब्दात सांगता येणार नाही…
कुठं चाललेय? का चाललेय? हे विसरून मी ती खाली पडलेली फुलं वेचायला लागते..
अगदी मन भरे पर्यंत… त्यात आता जोडीला दोन छोटे हात ही असतात..
फुल वेचून होताच मोजून आठ नऊ पावले पुढं येताच नजरबंदी केल्यासारखे माझे डोळे आत डावीकडे वळतात..
आणि खजाना मिळाल्यासारखे तृप्त ही होतात.. आणि दिसतो असा नजारा जो मला माझ्या बालपणात घेऊन जातो..
तिथं आत भरपूर झाडी आहेत..
त्यात सुरुवातीलाच एक कौलारू घर त्याच्या आजूबाजूला फुललेली जास्वंद, त्याच्या बाजूलाच सढळ हस्ते नाजूक केशरी दांडा असलेला इवल्या फुलांची बरसात करणारा पारिजातक..
त्याच्या पुढेच लाल जर्द लगडलेले छोटे छोटे गुलाब…
आणि मग अजून कितीतरी लहानसहान फुलांनी लगडलेली झाडे..त्यांचा तो थोडा कडवट उग्र सुवास याने परिसर कसा भारल्यासारखा होतो…
मला आठवतंय तेव्हा मी लहान होते पाचवी सहावीत असताना थंडी मध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्हा सवंगड्यांमध्ये मॉर्निंग वॉकला जायची टुम निघायची.
घड्याळात अगदी साडेपाचचा गजर लावून सगळी लहान पोरंटोर आम्ही मंदिराजवळ जमायचो.
थंडी मी म्हणत असायची पण आम्ही त्याची पर्वा न करता आमच्या शाळेच्या रस्त्याला चालत सुटायचो.
अंधुक उजडलेलं..इकडे तिकडे दूधवाले, पेपरवाले यांची लगबग..
कुठं आमच्या सारखे वॉकला निघालेले आजी आजोबा. अस बघत बघत आम्ही आमच्या रास्ते वाड्यातल्या शाळेत पोहोचायचो..
तिथं पण अशी फुलांनी लगडलेली भरपूर झाडे असायची.
कुठं तरी पेटलेली चूल शेकोटी दिसली की परतताना आम्ही त्या भोवती कोंडाळ करून हात शेकत उभे राहायचो.
आणि मग भांडणाला सुरुवात होयची की पहिलं कोण उठलं आणि त्याने कस बाकीच्यांना हाका मारून उठवलं त्यावरून…
मोठे मजेशीर दिवस होते ते… अगदी फुलपाखरी..सुवासिक..न विसरता येणारे!!!