sanjay ingle an awesome personality
December 14, 2021 | by Varunraj kalse
संजय इंगळे : एक भन्नाट माणूस
©रवींद्र साळवे, बुलडाणा
प्राध्यापकाच्या सुरक्षित नोकरीचा राजीनामा देत वेगळी वाट निवडून थेट सलून व्यवसायात प्रवेश करणारे संजय इंगळे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
औरंगाबादला त्यांनी भव्य ‘हर्षा- संजय सलून मॉल’ उभा केला. त्याच्या विविध ठिकाणी शाखा उघडल्या आणि या क्षेत्रात स्वत:चे साम्राज्य निर्माण केले.
संजय यांचा हा प्रवास प्रचंड जिद्दीचा, मेहनतीचा, धाडसाचा आणि वेगळ्या वाटेचा आहे. त्यात अनेक ‘आश्वासक’ ठिकाणे आहेत.
या व्यवसायाने त्यांना यश व कीर्ती दिली आहे. विशेष हे की, यश व कीर्ती नंतरही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.
म्हणूनच आजच्या काळात वेगळे काही करणाऱ्यांसाठी ते मार्गदर्शक आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी…
जग विशाल आहे आणि त्यात मोठ मोठी माणसे आहेत हे तेव्हा कळते जेव्हा तुम्ही औरंगाबादला संजय इंगळे यांना भेटता.
‘हर्षा ॲंड संजय सलून मॉल’ चे ते संस्थापक. एक अफलातून व्यक्तिमत्व. त्यांचे मोठेपण शब्दांच्या पलीकडचे आहे.
तरीही शब्दांच्या चिमटीत पकडून वाचकांसमोर ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.
संजय यांचे वडील आयकर विभागात सहाय्यक आयुक्त होते. दोन बहिणीची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या. परिवाराचे एकमेव वारस म्हणजे सुपुत्र संजय.
इतर चारचौघांप्रमाणे आपल्या मुलाने शिकावं आणि चार-चौघांसारखं चौकटीतलं आयुष्य जगावं ही त्यांच्या आई-वडिलांची इतरांसारखी माफक अपेक्षा.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेत गुणवत्ता यादीत आल्यावर मात्र आई-वडिलांनी संजय समोर मेडिकल की इंजिनिअरिंग?
हा पर्याय ठेवला. त्यात तिसरा पर्यायच उपलब्ध नसल्याने निमूटपणे संजयने इंजिनिअरींग हा पर्याय स्वीकारला. संगणक शाखेत बी. ई. केले. पुढे एम. बी. ए. केले.
मॅनेजमेंट कॉलेजवर प्राध्यापकाची नोकरी करीत असताना संजय यांना त्यांच्या आतील ऊर्जा वेगळे काही करून पहा असं सांगत होती.
म्हणूनच त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ‘काहीतरी व्यवसाय करायचाय’ हा निर्णय जेव्हा त्यांनी वडिलांना सांगितला तेव्हा त्यांनाही आनंद झाला.
मात्र सलून चा व्यवसाय करणार म्हटल्यावर घरात जोरदार खडाजंगी झाली. बाप विरुद्ध मुलगा हा सामना झाला.
दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यात बिचारी आई मात्र दुःखी झाली. आमच्यासाठी तु मेला असं बाबा म्हणाले तर तुमचा फोटो मी देखील माझ्या घरी लावून हार घालतो असं म्हणत संजय घराबाहेर पडले.
सलून व्यवसायात उतरले आणि अवघ्या दहा-बारा वर्षात ‘हर्षा ॲन्ड संजय सलून मॉल’ विकसित केला. लाखोचा टर्न ओव्हर झाला.
विविध शहरात ब्रॅंचेस उभ्या राहिल्या. लोक मुलाखतीसाठी ताटकळत उभे राहू लागले. चॅनलवाले मुलाखतीसाठी वेळ मागू लागले.
पुरस्काराच्या ट्रॉफी घरपोच आल्या. स्वतःची बी. एम. डब्ल्यू. कार घेतली. मोठ मोठ्या सन्मान सोहळ्याचा मान मिळाला.
एक बंडखोर मुलगा संजय व त्याला खंबीर साथ देणारी तितकीच त्याची बंडखोर पत्नी हर्षा ही जोडी बघता बघता औरंगाबाद शहरात वलयांकित झाली.
बापालाही मग कालमानापरत्वे लेकाचं महत्त्व कळालं. बाप म्हणाला ‘मला माहित होतं, माझा मुलगा ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात माझे नाव कमावेल!’
आई काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यातील अश्रूच सारे काही बोलले. आपल्या बंडखोर स्वभावाने तुटलेली नाती संजयच्या आयुष्यात यशस्वी झाल्यावर परत जुळली.
टीका करणारे प्रशंसक झाले. वेड्यात काढणारे अवाक झाले… आणि संजय चा वेगवान प्रवास सुरू झाला. जो अजूनही सुरूच आहे.
‘हर्षा ॲन्ड संजय सलून मॉल’ या नावाने औरंगाबादला उभी असलेली तीन मजली भव्य इमारत ही त्याची साक्ष आहे.
महाराष्ट्रात तरी आज यापेक्षा दुसरा कुठेही मोठा सलून मॉल नाही. परंतु या यशाने संजय इंगळे हुरळून गेलेले नाहीत.
जमिनीवर पाय ठेवून आहेत. हे झालं संजय यांचे व्यवसायिक यश.
या यशाच्या पलीकडेही संजय यांचं मोठेपण आहे. ते म्हणजे संजय यांनी बी. ई. नंतर एमबीए (फायनान्स), एमबीए (मार्केटिंग) केलं. एलएलबी केली.
मानसशास्त्र विषयात एम. ए. केले. सायबर लॉ, टॅक्सेशन लॉ या विषयात डिप्लोमा केला. डायट ॲंड न्यूट्रिशन या विषयात एम. डी. केले. ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र आणि निसर्गोपचार या शाखेची पदविका घेतली.
एवढं सारं शिक्षण कशासाठी? तर ‘ज्ञान लालसे पोटी’ असं टिपीकल उत्तर संजय देतात.
AD’s
💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.
💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.
10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही.
सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
संजय यांच्या बंडखोर स्वभावाची खात्री तशी आई-बाबांना बालपणीच झाली होती. शालेय जीवनात परीक्षेला जाताना ‘देवाच्या पाया पड’ असं आई म्हणाली तेंव्हा ‘मुळीच पडणार नाही’ असं संजय म्हणाले.
जन्माने हिंदू असूनही पाया पडत नाही म्हटल्यावर आईला राग आला. तिने संजयला बदडून काढलं. त्याचा परिणाम असा झाला की, संजय रोज परीक्षेला जाताना देवाच्या पाया पडू लागला.
परंतु त्या वर्षी मात्र वर्गात चक्क नापास झाला. आईने खडसावून विचारले, ‘नापास कसा झाला?’ त्यावर संजयने उत्तर दिलं की, ‘सारं काही देवच करणार होता तर मी अभ्यास तरी कशाला करू?’
पोराने अभ्यासच केला नाही फक्त देवाच्या पाया पडला. हे आईच्या लगेच लक्षात आलं. ती काय ते समजून गेली. तिने त्यानंतर कधीच संजयला ‘देवाच्या पाया पड’ असं म्हटलं नाही.
मात्र अभ्यास करून संजय पुढे इयत्ता बारावी सायन्सला ९३% गुण मिळवून गुणवत्ता यादीत झळकले.
त्यानंतरही संजय यांनी आपल्या आयुष्यात प्रयोगच केले. हर्षा यांच्याशी त्यांचा विवाह हा आंतरजातीय विवाह आहे.
त्यातही त्याकाळी मोठा संघर्ष झाला. बंडखोरी तर संजयच्या स्वभावाचा भाग होता.
संजय यांना ज्यांनी २ वर्षापूर्वी बघितलेय ते त्यांना आज ओळखू शकणार नाहीत. याचे कारण म्हणजे संजय यांनी स्वतःचे घटविलेले वजन.
२ वर्षापुर्वी त्यांचे वजन १३० किलो होते. वाढलेले शरीर सांभाळताना त्यांना मोठी कसरत करावी लागे. नीट उठता की बसता येत नसे. मग त्यांनीच स्वतः एक दिवस प्लॅन केला.
आपले वजन कमी करायचे. स्वतःच अभ्यास केला. डायट प्लॅन निश्चित केला आणि सुरू झाला प्रयोग. या प्रयोगात अवघ्या सोळा महिन्यात संजय यांनी विना ऑपरेशन ६५ किलो वजन कमी केले.
आता त्यांचे वजन केवळ ६५ इतके आहे. स्वतःचे कपडे अडगळीत गेले. ‘आता मुलाचे कपडे घालू शकतो’ असं ते गंमतीने म्हणतात.
घटलेल्या वजनामुळे पहिल्या पेक्षाही ते अधिक सुंदर दिसतात. वय ५५ असले तरी चाळिशीचे वाटतात. हा चमत्कार कसा झाला?
तर तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. त्यावर ‘आय वॉन्ट टू डाय यंग’ नावाचं पुस्तक ते स्वतः लिहीत आहेत. सध्या लोकांना ते आरोग्याचे धडे देतात.
‘तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला सुंदर आणि तरुण करतो’ असं ते आत्मविश्वासाने सांगतात.
मूर्तिजापूर तालुक्यातील घुमशी मुंगशी हे त्यांचं वडलोपार्जित गाव. बाबांच्या शिक्षण आणि नोकरीमुळे त्यांचे गाव सुटले.
गावात नातेवाईक राहतात. संजय यांचा परिवार सुख दुःखाच्या प्रसंगी गावी येत असतो. संजय यांची कर्मभूमी मात्र औरंगाबाद झाली आहे.
उस्मानाबाद, नाशिक आणि औरंगाबादला त्यांच्या मॉलच्या ब्रांच आहेत.
मेकअप स्टुडिओ, स्पा, सलून ॲकेडमी, प्लेसमेंट सेंटर, फोटोग्राफी इन्स्टिट्यूट, ब्रायडल ज्वेलरी सेंटर व सौंदर्य शास्त्रावरील ग्रंथालय असं खूप काही त्यांनी औरंगाबादच्या मध्यवर्ती मॉलमध्ये कलात्मकतेने मांडले आहे.
सलून क्षेत्रात असं काही भन्नाट करता येते याचे हे एकमेव उदाहरण आहे.
या व्यवसायामुळे न्हावी म्हणून जन्म झाला नसला तरी स्वतःला न्हावी म्हणून घेण्यात संजय यांना अभिमान वाटतो.
ते म्हणतात, ‘या व्यवसायांना मला ग्लॅमर दिलं, पैसा दिला व सन्मान दिला. आपल्या देशात श्रमविभागणी आहे.
अमुक एक काम प्रतिष्ठेचे आणि अमुक एक काम म्हणजे हलक्या प्रतीचे ही इथली मानसिकता आहे. ही मानसिकता दूर झाली पाहिजे, जग बुद्धाच्या विचार वाटेने गेले पाहिजे’
संजय यांची पावले बुद्धाच्या विचार वाटेवर कधीच पडली आहेत. त्यामुळेच त्यांच्या मॉलमध्ये जागोजागी आपल्याला बुद्ध प्रतिके आणि पुतळे दिसतात.
माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची बुद्धाची सम्यक दृष्टी त्यांच्यापाशी आहे. गर्व आणि अभिमान त्यांना ठाऊक नाही.
दोन मुले आणि कर्तृत्ववान पत्नी हर्षा यांची त्यांना खंबीर साथ आहे. आपल्या कर्मचाऱ्यांशी ते मानवतेने वागतात. अनेकांना मदत करतात.
प्राणीमात्रावरही प्रेम करतात. त्यांच्या घरात आज दहा कुत्रे आणि पंचवीस मांजरी आहेत. या प्राण्यांना ते जीव लावतात.
हे कुत्रे त्यांनी विकत घेतले नाहीत तर भटके कुत्रे सांभाळले आहेत. त्या प्रत्येकाची एक वेगळी भन्नाट कहाणी आहे.
संजय म्हणतात की, ‘माणूस माणसावर कंडिशनल प्रेम करतो तर प्राणि मात्र अनकंडिशनल प्रेम करतात’ संजय इंगळे आयुष्य प्रवासाच्या या टप्प्यावर अजूनही वेगवेगळ्या प्रयोगात व्यस्त आहेत.
त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान अफाट आहे. रोज नवे प्रयोग ते करीत आहेत. त्यांच्या भावी प्रयोगास माझ्या अनंत शुभेच्छा.
(जिज्ञासुंसाठी संजय इंगळे यांचा मो. क्र.9822035876)
– रवींद्र साळवे, बुलडाणा
नोट: सदरील लेख दैनिक अजिंक्य भारत ‘आश्वासक’ मध्ये आलेला होता. संजय सरांच्या परवानगीने itworkss च्या वाचकांसाठी देत आहोत.
—
मराठीतुनच शिकुन, प्रगती करू भर भरून…!
टीम इट-वर्क्स
www.itworkss.in
RELATED POSTS
View all
