My title My title
Post's

Cyber Crime: अदृश्य चेहरे….

Cyber Crime: अदृश्य चेहरे…!



तंत्रज्ञानात भयंकर वेगाने होणारी ही प्रगती जितकी मानवाच्या प्रगतीसाठी पूरक आहे तितकीच ती त्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी घातकही ठरू शकते.

Cyber Crimes हे गुंतागुंतीचे जाळे किती भयानक ठरू शकते याची काही उदाहरणे –

प्रत्येक cyber criminals ची एक विशिष्ट मानसिकता असते यावर बरेच मानसशास्त्रीय संशोधन झाले आहे. बहुतांशी हे criminals अगदी तरुण वयातील मुले असतात.

विशेषतः भारतात या मुलांचे शालेय शिक्षणही पूर्ण झाले नसते. देशातील काही विशिष्ट गावं ही सायबर गुन्हेगारांची (internet crime) गावं आहेत. यातल्या प्रत्येक घरातल्या मुला-मुलींना सायबर गुन्ह्यासाठी वडीलधाऱ्यांमार्फत प्रशिक्षित केले जाते.

इथल्या समाजात सायबर गुन्ह्यात सहभाग असलेल्या मुलाला लग्नाच्या बाजारात मोठा भाव असतो. मोठ्या परिश्रमाने गुन्ह्याचा शोध शोध लावत पोलिस तिथे पोहोचलेच तरी त्यावेळी हे संपूर्ण गावच रिकामे झाले असते.

 

चेहरे नसलेल्या या गुन्हेगारांचा शोध म्हणूनच गवताच्या पेंडीतून सुई शोधण्यासारखा असतो.

या अदृश्य नजरा सोशल मीडियावरील हालचाली घारी सारख्या टिपून आपले सावज शोधतात.

यांना बळी पडणारा सगळ्यात मोठा असुरक्षित वर्ग म्हणजे ज्येष्ठ नागरिक, तरुण मुले-मुली आणि एकल स्त्रिया.

 

नुकतीच माझ्या तरुण लेकीच्या बाबतीत एक घटना घडली. इंस्टाग्रामवरील तिच्या अकाउंट वरील फॉलोअर्सची संख्या बघून काही नामांकित कंपन्या आणि स्टार्टअप मंडळी तिला आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी संपर्क करतच असतात.

याच साखळीत तिला ‘झारा इंडिया’ या कंपनीच्या नावाने इमेल आला. समोरच्याला कुठलाही संशय येऊ नये इतक्या व्यावसायिक कुशलतेने तयार केलेल्या या मेलच्या माध्यमातून या मंडळींनी माझ्या लेकीशी व्हाट्सअपवर संपर्क साधला.

‘लूकटेस्ट’ साठी वेगवेगळ्या ड्रेसेस मध्ये व्हिडीओ लागतील’ असे सांगितले.

‘कागदोपत्री कुठलाही व्यवहार नसताना व्हाट्सअपवर असे व्हिडिओ इतकी मोठी कंपनी कसे मागेल’ हा संशय आल्यावर आम्ही ताबडतोब मुंबई Cyber Crime ब्रँचला संपर्क केला आणि त्यांना ही माहिती दिली.

त्याच बरोबर ‘झारा’ कंपनीच्या आऊटलेटलाही संपर्क केला. त्यातून लक्षात आलं की तो ईमेलही बनावट होता आणि ज्या मोबाइल क्रमांकावरून माझ्या लेकीला संपर्क केला जात होता ते क्रमांकही ओडिशा राज्यातील एका महिलेच्या नावावर होते.

वेळीच सावध झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही ,पण या निमित्ताने Cyber Crime ब्रँचच्या पोलीस उपायुक्त डॉ.रश्मी करंदीकर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

त्यांनी दिलेली सायबर गुन्ह्यांच्या स्वरूपाविषयीची माहिती ही हादरवून टाकणारी आहे. या गुन्हेगारांचे चेहरे अदृश्य असल्याने गुन्ह्यांचा तपास लावणे हे अतिशय जिकरीचे आणि चिकाटीचे काम असते.

आणि ते आपला सायबर विभाग कौशल्याने करतच असतो. पण ‘माणूस आयुष्यातून उठू शकतो’ इतकं गंभीर स्वरूप या गुन्ह्यांच आहे आणि म्हणूनच जनजागृती शिवाय याला पर्याय नाही.



१) Casting Fraud:

या प्रकारात मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने ‘तुमच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो’ म्हणून करारही केले जातात. 

त्यानंतर फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च इत्यादी नावाखाली लाखोंनी रक्कम उकळली जाते. या सर्व गोष्टी ऑनलाईन होतात आणि आरोपी कधीही तुमच्या समोर येत नाही.



२) KYC Fraud :

यात SMS मध्ये लिंक येते. बँकेचे KYC अपडेट करायचे आहे म्हणून सांगितले जाते. लिंकवर क्लिक केल्यावर डुप्लिकेट वेबसाईट उघडली जाऊन तुमचे सर्व बँक डिटेल्स घेतले जातात.

त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात. बँकांचे व्यवहार हे म्हणूनच अधिकृत वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणे हे आवश्यक.



३) Amazon Fraud:

‘तुम्हाला ‘दिवाळी धमाका’ ‘न्यू इयर धमाका’ या प्रकारच्या लॉटरीमध्ये ॲमेझॉनवर बक्षीस लागलय’ असा फोन येतो, पत्रही पाठवले जाते.

फुकट मिळणारी दहा लाखाची कार कोणाला नको असते, मग त्यांनी दिलेल्या साईटवर आपण ऑनलाइन जातोच. आणि तिथेच फसतो.



४) OLX Fraud:

यात OLX वर ऑनलाइन आपण ‘विकत घेत असलेली वस्तू’ अथवा ‘आपल्याला विकावयाची वस्तू’ या दोन्ही बाबतीत गुन्हे घडू शकतात.

बहुतांशी वेळा तुम्हाला संपर्क करणारी व्यक्ती ही स्वतःला सैनिकी क्षेत्रातील असल्याचे दर्शवते, जेणेकरून ती फसवणार नाही याचा आपल्याला विश्वास वाटतो. तशी खोटी सैनिकी ओळख पत्रेही दिली जातात.

आपण बँक डिटेल्स शेअर करुन पैसे भरतो, पण वस्तू येत नाही. ‘काहीतरी गडबड झाली असावी’ असं म्हणून दिलगिरी व्यक्त करून समोरचा आरोपी QR कोड पाठवतो.

आपण तो स्कॅन करतो आणि आपले अजूनच पैसे गायब होतात. वस्तू आपल्याला विकायची असेल तर समोरचा फोन करून ऑफर देतो. ‘अकाउंट खात्रीसाठी मी आधी १रू पाठवतो’ असं सांगून तो QR कोड पाठवतो.

आपण स्कॅन करतो आणि खरंच १रू. जमा झाल्यावर आपली खात्री पटून आपण त्याने पाठवलेला दुसरा कोडही स्कॅन करतो आणि आपल्या खात्यातले अजून पैसे गायब होतात. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये QR कोड वापरू नका आणि शक्यतोवर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करा.



५)New Year Fraud:

वर्षअखेर जवळ येत चालली आहे. अशावेळी प्रसिद्ध उपहारगृहांच्या नावाने फेसबुकवर ‘एका थाळीवर एक फ्री’ अशाप्रकारच्या सवलतीच्या जाहिराती आपल्या पेजवर येत राहतात.

त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला एका खोट्या फेसबुक पेजवर नेले जाते,तिथे फॉर्म भरून आपण आपले बँक डिटेल्स देतो. तुम्हाला ‘तुमची थाळी तयार आहे, बँकेचा OTP शेअर करा’ म्हणून मेसेज येतो.

तुम्ही तो शेअर करता आणि..बुम! तुमच्या खात्यातले पैसे गायब! एका फ्री थाळीच्या नादात लोकांनी ५०-६० लाख रुपयेही गमावले आहेत.



६) Google Edit Fraud:

यात बँकांचे, वाईन शॉपस्, पिझ्झा कंपन्यांचे ‘कस्टमर केअर नंबर’ एडिट करून (बदलून) त्यावरून तुम्हाला फोन केला जातो. त्यावरून तुमची वैयक्तिक माहिती, खात्याची माहिती घेतली जाते आणि बँकेचा ओटीपी मागवला जातो.

वाईन किंवा पिझ्झाच्या खरेदीसाठी तुम्ही पैसेही भरतात,पण डिलिव्हरी होत नाही. म्हणूनच कस्टमर केअर नंबर्स हे नेहमी अधिकृत साइटवर जाऊन पडताळून बघा आणि मगच व्यवहार करा.



७)Screen Share Fraud:

ज्यांना मोबाईल किंवा कम्प्युटर बाबत तांत्रिक ज्ञान नाही, विशेषतः वयस्कर व्यक्ती किंवा स्त्रिया, त्यांना यात फसवण्यात येते.

‘तुम्हाला हवा तो व्यवहार करण्यास मी मदत करतो’ असे सांगून तुमच्या कडून ‘स्क्रीन शेअर’ नावाचे ॲप डाऊनलोड करून तुमच्या कम्प्युटरचा अथवा मोबाईलचा ताबा समोरची व्यक्ती स्वतःकडे घेते.

आणि त्यानंतर ती तुमच्या वैयक्तिक माहितीचा कसा आणि किती गैरवापर करू शकते, ते सांगू शकत नाही!



८) Insurance Fraud:

याचे उदाहरण म्हणजे अगदी करोना काळातील ही घटना. चार-पाच वर्षापूर्वी रिटायर झालेले गृहस्थ, त्यांना मेलवर उत्तम रिटायरमेंट पॅकेज ऑफर करण्यात आले. त्यांनी तीन वर्षे नियमितपणे पैसेही भरले.

वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरण्यासाठी त्यांना सूचना मिळत गेल्या तरीही त्यांना संशय आला नाही. Cyber Crimeच्या या गुन्हेगारांचे हे वैशिष्ट्यच आहे की त्यांचे ‘वाचा आणि भाषेवर’ जबरदस्त प्रभुत्व असते.

दुर्देवाने कोरोना काळात या गृहस्थांचे निधन झाले. पत्नीने इन्शुरन्सच्या रकमेची मागणी केल्यावर पॉलिसी क्लोजर च्या नावाखाली तिच्याकडून अजून पैसे उकळून हि गुन्हेगार मंडळी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून गायब झाली.

आपल्या खात्रीच्या इन्शुरन्स एजंट कडून किंवा कंपनी कडूननच पॉलिसी घ्या, ऑनलाइन कॉल्सवर भरवसा ठेवू नका.



९)Custom Gift Fraud:

यात स्त्रिया जास्त फसल्या जातात, विशेष करून अविवाहित, एकल महिला. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट वरुन त्या एकाकी आहेत याचा अंदाज घेतला जातो व ऑनलाइन मैत्रीचे जाळे फेकले जाते.

थोडी मैत्री झाल्यावर ‘मी तुला एक गिफ्ट परदेशातून पाठवतोय’ म्हणून सांगितले जाते. स्त्री ‘नको- नको’ म्हणते पण सुखावते.मग तिला ‘कस्टम डिपार्टमेंट’ च्या नावावर कॉल येतो.’कस्टम्स ड्युटी भरा’ या बाबीवर कित्येक लाख मागितले जातात.

परदेशातला मित्र सांगतो ,’मीच गिफ्ट पाठवली आहे. तू ड्युटी ऑनलाइन भर मी भारतात येतोच आहे.’ या बहुधा परदेशी गँग्स असतात. कुटुंबाच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार केले असल्याने महिला हातोहात फसवलीही जाते आणि ती पोलिसात तक्रारही करत नाही.



१०)Matrimonial Fraud:

मॅट्रिमोनियल साईट वरुन वय वाढलेल्या एकल महिलांना सावज केले जाते. अनपेक्षितपणे एखाद्या देखण्या परदेशी स्थळाकडून विचारणा झालेली स्त्री हि मोहरते.

मग मेलवर किंवा फोनवर वैयक्तिक गप्पा व्हायला लागतात. या गुन्हेगारांच्या ‘लव्ह स्क्रिप्टस्’हि तयारच असतात. ‘माझ्या दिवंगत काकांनी त्यांची संपत्ती माझ्या नावावर केली आहे, मी चेक ने ते पैसे तुझ्या नावावर पाठवतोय’ असे ही व्यक्ती सांगते.

स्त्रीला पुरेसे काही उमजायच्या आतच कस्टम्स मधून कॉल येतो

‘तुमचा चेक आला आहे, हे टेररिस्ट फंडिंग नाही म्हणून सर्टिफिकेट द्या, एवढे पैसे कुठून आले ते सांगा!’ असे म्हणून घाबरवून महिलेकडून पैसे उकळले जातात.



११) KBC Fraud:

तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागलीये,या नंबरवर कॉल करा अशासारखे मेसेज येतात.मोहात पडलेली व्यक्ती फोन करते, बँक डीटेल्स देते, जीएसटी भरावा लागेल असेही सांगितले जाते. मग ओटीपी शेअर केला जातो आणि या प्रक्रियेत व्यक्तीचे अकाउंट रिकामे होते.



१२)Purchase Fraud:

साड्या,दागिने, बॅग्स अत्यंत कमी किमतीत दाखवून खोट्या वेबसाईट बनविल्या जातात. महिला तिथे पैसे भरतात पण वस्तू घरी येत नाही.



१३)Loan Fraud:

यात मोठमोठ्या फायनान्स कंपन्यांच्या नावाचा वापर केला जातो. पार मा. पंतप्रधानांचा फोटो वापरून वेबसाईट तयार करून ‘पंतप्रधान कर्ज निधी’मधून कर्ज देण्याच्या जाहिरातीसुद्धा ही मंडळी करतात.

कर्जाच्या रकमेच्या काही टक्के रक्कम तुमच्याकडून आधीच घेतली जाते आणि मंडळी गायब होतात.



१४)Sextortion:

तुमच्या सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवले जाते. पॉर्नसारख्या साइट्सवर तुमची हालचाल जाणवली तर तुम्हाला ‘लाइव्ह सेक्शुअल व्हिडिओ कॉल’ केले जातात, ‘चॅटस्’हि येतात.

यात ‘डिप फेक टेक्नॉलॉजीचा’ वापर केला जातो. हेतुम्ही प्रतिसाद दिलात तर तुमचाही लाइव्ह व्हिडिओ रेकाॅर्ड होतो.पुढे धमक्या आणि ब्लॅकमेल यांचे सत्र सुरू होते आणि लाखो रुपये उकळले जातात.

हेच व्हिडीओ दुसऱ्या गँग्सना दिले जातात जे तुम्हाला ‘पोलिस’/ ‘सीबीआय’ या नावाने फोन करून परत पैसे उकळतात.



१५)Fake Facebook Profile:

तुमच्याच फेसबुक प्रोफाईल वरील माहिती घेऊन दुसरे प्रोफाइल तयार केले जाते आणि त्यावरून तुमच्या मित्र मंडळींना पैशाची मागणी केली जाते.



१६) सोशल मिडियावरील मुलींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून पॉर्नसाईटवर टाकणारी मोठी साखळीच आहे. कित्येक अजाण मुलीनी अशा परिस्थितीत घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

आपले अकाऊंट वैयक्तिक ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींना अकांउटमधे प्रवेश न देणे हाच यावर उपाय आहे.



१७)Minor Girls Fraud:

हा एक भयंकर प्रकार आहे.पालकांच्या नकळत कधीकधी अल्पवयीन मुली इन्स्टाग्रामवर आपण १८ वर्षावरील असल्याचे दाखवून अकाऊंट उघडतात.

या मुलींना हेरून एखाद्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मैत्री झाल्यावर ‘माझ्याकडे स्तनांचा आकार वाढवायचे औषध आहे.

पण त्यासाठी आधी तुझी साईज बघावी लागेल’ असे सांगून तिच्या कडून नग्न व्हिडीओची मागणी केली जाते.तो दिला कि मग ब्लॅकमेलिंग सुरू होतं.

घाबरलेल्या मुलीकडून तिच्या अकाउंटचा ताबा घेऊन तिच्या मित्र यादीतील इतर अशाच लहान मुलींना या मुलीच्या नावाने संपर्क केला जातो व असेच व्हिडिओज घेतले जातात. अशा गुन्हेगाराकडे नुकतेच ७०० हून अधिक अजाण मुलींचे नग्न व्हिडिओ पोलिसांना सापडले.



हे सगळंच खूप धक्कादायक व सुन्न करणार आहे. या सगळ्या प्रकारात न घाबरता पालकांनी आणि पीडितांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवणे गरजेचे आहे.

डॉ.रश्मी यांच्या मते हा तपास किचकट असतोच पण त्यांच्या कार्यकाळात जवळजवळ ८७% प्रकरणात त्यांना यशही मिळाले आहे. त्यामुळे पोलिसांना जरूर सहकार्य करा.

आपली सुरक्षितता ही आपल्याच हातात असते,यास्तव या ‘सायबर युगातील’ आपले प्रत्येक पाऊल सावधपणे टाकूया आणि सजग राहूया.

हे लोक रोज नवनवीन पद्धतीचे  Cyber Crimes शोधून काढत आहेत. तस आपण स्वत: सुद्धा याबाबत जागरुक रहायला पाहिजे.

Be Aware, Be Cyber Smart & Stay Safe…

#डॉ.रश्मी करंदीकर
पोलीस उपायुक्त, Cyber Crime मुंबई.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

One Comment

  1. I will always be grateful to you for your support and kindness. It would be impossible to count all the ways you’ve helped me in my career. Thank you so much for all that you’ve done — I only hope I can return the favor sometime in the future. Thanks for being a good mentor and for guiding me on the right path.

Leave a Reply

Back to top button