गुलाब
©तुषार खरे
माझं नुकतंच तारुण्यात आगमन झालं होतं. आजूबाजूच्या मित्र,मैत्रिणी प्रेमात पडलेले पण आमचा नंबर मात्र अजूनही ह्यात लागला नव्हता.
त्याचं कारण जिला पाहून माझ्या हृदयाची गिटार वाजेल असं मला कोणी आजवर भेटलंच नव्हतं. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं.
नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर मी सकाळी ७:३० च्या ठोक्याला हजर झालो होतो. मित्र मंडळी जमली होती. गप्पा, मज्जा, मस्ती,किस्से अगदी रंगवून सुरू होते.
जिथे इतर मुलं, मुली कॉलेजला जायला उशीर होऊ नये म्हणून धावपळ करत होते. तिथे हा आमचा नेहमीचा निवांतपणा रोजच सुरू असायचा.
आणि सगळ्यांची सगळी धावपळ संपली की मग आम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यात उशिरा वर्गात प्रवेश करायचो. त्यादिवशीही सगळं सुरळीत चाललं होतं गप्पा रंगल्या होत्या.
सगळे गुंग होते. इतक्यात कोणीतरी ओरडलं कॅन्टीनमध्ये राडा झाला रे चला लवकर! कोणाचीतरी भांडण झाली असणार म्हणून आम्ही जीवाच्या आकांताने धावत जाऊन कॅन्टीन गाठलं.
तिकडे प्रचंड गर्दी, गोंधळ, राडा, किरकिर, मुलींचा आरडाओरडा ऐकायला येत होता पण पुढे जायची हिंमत कोणातच नव्हती.
गर्दीला बाजूला सारून चित्रपटातल्या हिरो प्रमाणे मी पुढे झालो आणि पाहतो तर काय? साधारण वडिलांच्या वयाचा एक माणूस एका कोमल,नाजूक तरूणीला बेदम मारहाण करत होता.
त्याच्यापाठी ४,५ मुली असं करू नका काका, अस करू नका, तुमचा गैरसमज होतोय, अशी विनवणी करत होत्या पण हा काका जणू सैतानच त्याने मुलीला संपूर्ण कॉलेज समोर पायाखालून काढलं.
ती गोरी गोमटी मुलगी अक्षरशः लालबुंद झाली होती. ती धाय मोकलून रडत होती पण तिने त्या माणसाचा प्रतिकार केला नाही ना त्याला उलट उत्तर दिलं.
तिला वाचवायला कोणीच मध्ये पडत नव्हतं. सगळे फक्त तमाशा पाहत होते. मग माझे मित्र मला नेहमीप्रमाणे गळ घालू लागले.
तुषार ह्या मुलीला वाचव. हे थांबव हे इथेच थांबलं पाहिजे. तु काहीतरी कर तूच हे थांबवू शकतोस मग काय नेहमीप्रमाणे माझ्यातला समाजसेवक जागा झाला आणि धावत जाऊन मी त्या माणसाची कॉलर पकडली.
आता दुसऱ्या हाताने त्याला कानाखाली ठेवून देणारं इतक्यात मागून माझा हात एका माणसाने पकडला. हा आमचा घरगुती प्रश्न आहे ह्यात पडू नका.
मग मी ओरडलो प्रश्न घरगुती आहे तर घरी जाऊन सोडवा. इथे हे चालणार नाही. तो माणूस माझी माफी मागून त्या मुलीला मारहाण करणाऱ्या माणसाला समजावत घेऊन तिथून निघून गेला.
ती दोन माणसं दिसेनाशी झाल्यावर मी आणि माझी टोळी त्या मुलीची विचारपूस करायला धावलो. ह्या मुलीला प्रचंड मार बसला होता.
ओरखडे, रस्त्यावर पडून झालेल्या जखमा, तिच्या कोवळ्या चेहऱ्यावर उठलेली त्या माणसाची बोटं हे सगळं पाहून माझा राग खुप अनावर झाला होता.
आजूबाजूला असलेल्या गर्दीवर ओरडत तो मी काढला आणि ती गर्दी हटकली. त्या मुलीसोबत ४,५ मैत्रिणी होत्या. त्यांना मी सांगितलं तुम्ही तिला घेऊन कॅन्टीन मध्ये या.
आपण तिच्यावर प्रथमोपचार करूयात. त्या मुलीला व्यवस्थित चालताही येत नव्हतं. इतका मार त्या व्यक्तीने तिला दिला होता.
कसा बसा आधार देत तिच्या मैत्रिणी तिला कॅन्टीनमध्ये घेऊन आल्या. तिला खुर्चीवर बसवलं आणि पाण्याने तिचा चेहरा, हात -पाय, धुवुन काढायला तिच्या मैत्रिणींना मी सांगितलं.
कॅन्टीनमध्ये असलेली प्रथमोपचार पेटीही आणली. मैत्रिणी तिला मलमपट्टी करू लागल्या. आता कुठे घाबरून रडत असलेली ती मुलगी सावरू लागली होती पण तिच्या अंगाला सुटलेली थरथरी मात्र थांबली नव्हती.
आता मी तिला पूर्ण पाहू शकत होतो. मी तिला पाहिलं आणि त्याच क्षणी माझ्या हृदयाची गिटार आयुष्यात पहिल्यांदा वाजली.
तिला ह्या क्षणी असं पाहणं हे चुकीचं असलं तरी प्रेम आंधळं असतं म्हणतात ना?
तेच हे. इतकी, सुंदर, सालस, सरळ, गोड, मुलगी ह्याआधी आयुष्यात कधी पाहिलीच नाही असं मला वाटलं.
जिची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती हीच. तिच्या ह्या दुःखद प्रसंगी मी मनातून आनंदी असणं हे असुरी वाटत असलं तरीही नियतीपुढे आपलं काही चालत नसतं.
जे घडायचं ते घडतच. आम्ही नाश्ता मागवला तिला जबरदस्तीने तो खाऊ घातला. बोलता बोलता तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता कळालं मारहाण करणारे तिचे वडील होते.
जे ग्रामीण भागातून आले होते आणि त्यांच्यासोबत असणारी ती दुसरी व्यक्ती त्याने हिच्याबद्दल भलतं सलतं सांगून त्यांना भडकावून इथे आणलं होतं.
सकाळी ह्या मुली नाश्ता करायला कॅन्टीनमध्ये आल्या असता. तिथे एक नवीनच रुजू झालेले सर ह्यांच्याशी संवाद साधत होते.
ते तिच्या वडिलांनी पाहिलं आणि तिथून तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने त्यांना दारू पाजून आणलं असावं आणि भडकावलंही असावं.
असंही त्यांनी सांगितलं. सगळा प्रसंग ऐकून मी तिच्याशी संवाद साधला. एकूण काय प्रकार आहे? तिनेही तेच सांगितलं ह्या मुली सांगत आहेत ते सगळं खरं आहे.
घरची परिस्थिती बिकट आहे. वडील शेतकरी आहेत. परिस्थिती नसताना मला इथे शिकायला त्यांनी पाठवलं आहे. चूक माझीच आहे मी इथे यायला नको होतं.
मी एकटं रहायला हवं. हे सांगून ती ढसाढसा रडू लागली. आम्ही तिची समजूत काढली आणि तिला हॉस्टेलवर सोडलं.
जाताना काही मदत लागली तर मला नक्की कळव हे ही सांगितलं. आम्ही तिथून निघालो पण माझं मन बैचेन झालं होतं.
तिच्याबद्दल मनात फार मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. खरंतर मी तिच्यात गुंतायला सुरुवात झाली होती रात्र-दिवस मला जिकडे तिकडे तीच दिसत होती.
पुस्तक, फळा, भिंती जिकडे तिकडे तीच मला दिसत होती. मी सतत तिला शोधू लागलो. तिचा पाठलाग करू लागलो.
माझ्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींना हे हेरलं होतं. तिच्या विरहात मी झुरू लागलो होतो. मी वर्गात कमी आणि तिच्या वर्गासमोर जास्त दिसत होतो.
तसा संवाद होत नव्हताच कारण त्यादिवशी घडलेल्या प्रसंगानंतर तिने स्वतःला एकलकोंड करून घेतलं होतं. वडिलांना त्रास द्यायचा नाही आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही कदाचित तिने हे ठरवलं होतं.
कुठल्याही मैत्रिणीशी तिने आता संपर्क ठेवला नव्हता. त्यामुळे माझा संपर्क होणं जवळपास अशक्य! मी तिचा पाठलाग सोडला नव्हता आणि मी तिचा पाठलाग करतोय.
हे तिला माहीत असूनही तिने मला कधी खडसावलं नाही. ह्यातच मला माझं उत्तर मिळालं होतं. तिला एक दिवसही न पाहता जगणं मला अशक्य झालं होतं.
तिच्या आयुष्यातली सगळी संकट तिच्याशी लग्न करून आपण दूर करायची ही बालस्वप्नं मी पाहिली होती. जवळपास सहा महिने लोटले. सगळं असंच सुरू होतं.
संवाद नव्हता, होता तो फक्त पाठलाग. आम्ही दोघेही ह्यातच खुश होतो पण कुठेतरी सुरुवात व्हावी म्हणून आता लवकरचं येणाऱ्या “रोझ डे” ला मी तिला गुलाब द्यायचं ठरवलं.
माझी तयारी सुरू झाली. आर नाही तर पार आता सोक्षमोक्ष लावायचा हे मी ठरवलं. त्यादिवशी नेमकी परीक्षा होती.
मग मी ठरवलं पेपर झाल्यावर त्याच दिवशी तिला गुलाब द्यायचा आणि आपल्या भावना व्यक्त करायच्या. तो दिवस उजाडला माझ्या मनातली धाकधूक प्रचंड वाढली.
आयुष्यात खुप काही केलं होतं पण हे धाडस म्हणजे हृदयात धडकी भरवणार होतं. मी सकाळी सकाळी कॉलेज गाठलं.
पेपर आधी तिचं दर्शन घेऊ म्हणजे पेपर सोपा जाईल ही त्यापाठची भावना. बराच वेळ वाट पाहूनही ती रोजच्या वेळेत आलीच नाही.
मला उशीर झाला म्हणून मी पेपर द्यायला आत गेलो. घाईगडबडीत पास होण्यापूरता पेपर लिहिला आणि तिच्या वर्गात पोहचलो जिथे ती बसणार होती.
तो बाक रिकामा होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गेले २ दिवस ती मला दिसली नव्हती. हॉस्टेलगेटवर चौकशी केल्यावर कळालं ती गावी गेली आहे.
मी आज काहीही करून तिला भेटायचं ठरवलं. ऑफिसमध्ये जाऊन रोल क्रं शोधून शिपायासोबत सेटिंग लावून मी तिचा पत्ता घेऊन आलो.
तिचं गाव १०० किमी होतं. मी गुलाब घेऊन निघालो आज तिला गुलाब द्यायचा हे माझं ठरलं होतं. धावत पळत जाऊन मी एसटी धरली.
मनात वेगळीच धाकधूक होती. तिच्या गावात जाऊन तिला गुलाब द्यायचा. हे फार मोठं आव्हान होतं ते मी स्वीकारलं होतं. वेळप्रसंगी तिच्या वडिलांशी दोन हात करायची.
मी आज तयारी ठेवली होती. कसे बसे ३ तास झाले. मी तिच्या गावात पोहचलो.
एसटीतून उतरलो आणि पत्ता विचारत हळूहळू गल्ल्या सोडत तिच्या घराकडे जाताना तिथून एक अंत्ययात्रा जाताना दिसली त्यात तिचे वडील अग्रस्थानी होते.
मी थोडा भांबावलो. नंतर भानावर आलो घरातली कोणी मोठी व्यक्ती गेली असावी मी अंदाज बांधला माझा अंदाज बरोबर ठरणार तोच पार्थिव माझ्या डोळ्यासमोरून विजेसारखं चमकत गेलं.
तिचा तो लोभस चेहरा आणि हार तुरे दिसले.
माझ्या पायाखालाची जमीनच सरकली. रडून ओरडून कोणाला काय उत्तरे देऊ? मी तोंडात रुमाल कोंबला आणि एका निर्मनुष्य कोपऱ्यात उभा राहून गर्दीला न्याहाळू लागलो.
एका क्षणात माझं होत्याचं नव्हतं झालं होतं. माझा कशावरच विश्वास नव्हता. मी उध्वस्त झालो होतो. मन काहीही मानायला तयार नव्हतं.
स्वतःला कसा बसा तातुपरता सावरत मी त्याच गर्दीच्या मागे जाऊन तिला शेवटचा निरोप द्यायला तयार झालो.
तिला द्यायला आणलेला गुलाब कोणाच्याही नकळत जाऊन मला पोहोचवायचा तिथे मी गर्दीत पोहोचवला.
लांबूनच सगळा विधी मी पाहिला.
गर्दीत कळालं तिच्या वडिलांनी तिचा विवाह मनाविरुद्ध ठरवला होता आणि तिचं शिक्षण बंद करून ह्याच आठवड्यात तो विवाह होणार होता.
तो विवाह त्याच व्यक्तीशी होणार होता. जो व्यक्ती तिच्या वडिलांना कॉलेजवर घेऊन आला होता. हे सगळं तिला सहन होत नव्हतं म्हणून तिने आत्महत्या केली.
मी परतीच्या प्रवासाला निघालो. मनात वादळ उठलं होतं. त्याची उत्तर सापडत नव्हती. एसटीतून उतरून मी धावत धावत हॉस्टेल गाठून तिच्या मैत्रिणींना हे सगळं सांगणार.
इतक्यात तिची एक मैत्रीण म्हणाली तुषार २ दिवस झाले तु दिसला नाहीस. तिने एक पत्र दिलं आहे तुला वाचून घे.मी पत्र उघडलं त्यात काय लिहिलं होतं ही उत्सुकता होती पण कागद फक्त कोरा होता.
त्यात फक्त एक लाल गुलाब होता. जो माझ्या हातात “रोझ डे” दिवशी द्यायचा.
हे तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं. मी घडलेली सगळी हकीकत रडत रडत त्यांना सांगितली. सगळेच हे सगळं ऐकून बिथरले त्यांचाही हंबरडा फुटला! समाप्त
RELATED POSTS
View all
