आरं माणसा आता तरी थांब…

आरं माणसा आता तरी थांब…
©डॉ. आनंद दत्ता मुळे
प्रकृतीच्या नियमानुसार माणसाच्या जगण्याच्या गरजा तीनच अन्न, वस्त्र व निवारा.
परंतु, नावीन्याच्या ध्यासाने ग्रासलेल्या माणसाने आभासी विश्वात उंचच उंच भरारी घेण्यासाठी प्रचंड महत्वकांक्षेचे पंख लाऊन गरुड भरारी घेण्याचे मृगजळी स्वप्न पाहिले.
भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला आपल्या जगण्याच्या मुलभूत गरजांचा विसरच पडला.
पैसा, संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, धर्म, ज्ञान व विज्ञान या एकाच पंखांचा आधार घेऊन मनुष्य प्राणी निसर्गाच्या विरोधात प्रवास करू पाहत होता.
आपण या एकाच पंखाचा आधार घेऊन उंच भरारी घेऊ शकतो असा समज झालेल्या मनुष्य प्राण्याला उडण्यासाठी दोन पंख लागतात व दुसरा पंख म्हणजे निसर्गाने दिलेले त्याचे शरीर व आरोग्य आहे याचा त्याला पद्धतशीर विसर पडला होता.
ब्रान्डेड कपड्याच्या आत असलेले नग्न शरीर निसर्गाची देवाण आहे याचा विचार न करता स्वतःची ब्रान्ड इमेज तयार करत होता. मनुष्य प्राणी निसर्गाला नमवल्याच्या अविर्भावात शिस्तीत नाही तर मस्तीत जगत होता.
नाही म्हणता भूकंप, पूर अश्या संकटात टाकून निसर्गाने मानवाला आव्हान दिले होते. परंतु, मानवाने मानवी जीवनाची भरपाई पैश्यात करून निसर्गाच्या संकटातून बाहेर पडल्याचा गैरसमज निर्माण करून घेतला होता.
भौतिक सुखाच्या मागे लागलेला माणूस. जिथं तुलना सुरु होते तिथं आनंद संपतो या वाक्याला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत होता. निसर्गाने देलेल्या पोटाची भूक शांत करण्यासाठी निसर्गाने दिलेली साधने वापरत होता.
परंतु, त्याच्या मनाची भूक शांत करण्याची ताकद निसर्गातही नव्हती. तुलनेतून निर्माण झालेली राक्षसी भूक शांत करण्यासाठी तो कोणत्याही थराला जात होता. मनुष्याचे हे कृत्य अनादी काळापासून अगदी काल-परवा पर्यंत चालू होते.
कोरोना या संपूर्ण विश्वात खळबळ निर्माण करणाऱ्या सूक्ष्म विषाणूने मनुष्याचा मनुष्याने दुर्लक्षित केलेला दुसरा पंख कापला व दिले आवाहन घे भरारी…
वापर तुझा पैसा, संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, धर्म, ज्ञान व विज्ञान.
कोरोनाची निर्मिती निसर्गाने केली का मानवाने? या प्रश्नाचे उत्तर भविष्यात मिळेलही पण कोरोनाने काळ थांबवलाय. मनुष्याला नग्न केलंय हे वास्तव आहे.
आरं माणसा आता तरी थांब…ऐवजी आपण आरं माणसा आता घरीच थांब… असं म्हणूया व या संकटातून जगण्याची नवी दिशा निश्चित करूया.
©डॉ. आनंद दत्ता मुळे, तुळजापूर