Brain StormingEducation
Start With Why – Simon Sinek (Management Guru)
©टीम नेटभेट
या लेखात आपण Start with why या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल माहिती घेणार आहोत.
एखादी गोष्ट आपण करतो, एरवीही सहज करत असतो, पण ती गोष्ट आपण का करतोय याचं परिपूर्ण उत्तर बरेचदा आपल्या स्वतःलाही ठाऊक नसतं..
आणि यशस्वी माणसांना हेच उत्तर नेमकं ठाऊक असतं म्हणूनच ते एकदा नव्हे तर वारंवार यशस्वी होतात आणि त्यांना जीवनात एक यशस्वी व्यक्ती म्हणून ओळख मिळते.
खरंच, हे असं कसं काय होतं.. एका छोट्याश्या उत्तराने जीवन बदलतं एवढा फरक कसा काय होऊ शकतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..?
या प्रश्नाचं उत्तर सापडतं ‘Start With Why‘ या पुस्तकात !
Simon sinek या मॅनेजमेंट गुरूने लिहीलेल्या Start With Why या पुस्तकात तुम्हाला जीवनाकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळतो.
कोणतीही गोष्ट आपण का करतोय या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुमच्या मनाला ठाऊक होतं तेव्हा तुमचं मन तुमचं जीवन घडवतं ही बाब अनेक यशस्वी लोकांना ठाऊक होती असं लेखक म्हणतो.
म्हणजे, समजा तुम्हाला कोणी विचारलं की ‘तू नोकरी का करतोस..?’ तर सामान्यपणे त्याचं उत्तर, ‘अर्थार्जनासाठी’ असंच दिलं जाईल पण हे उत्तर अपूर्ण आहे.
कारण, काम करण्यामागचा हेतू केवळ पैसे कमावणे हाच असता तर मग भराभर नोकऱ्या बदल, नवीन व्यवसाय सुरू कर, वा अन्य कोणतंही काम करून अधिक पैसे मिळवण्याचा चंगच प्रत्येकाने बांधला असता !
जगातील बहुतांश लोक वा बहुतांश कंपन्या ‘आपण ‘काय’ करत आहोत’ यावर फोकस करतात.
पण त्याउलट यशस्वी कंपन्या व यशस्वी लोक मात्र ‘आपण जे करत आहोत ते ‘का’ करत आहोत’ हे सांगण्यावर भर देतात.
Google, Apple सारख्या मोठ्या कंपन्या, आजवर होऊन गेलेले मोठे मोठे नेते यांनी आपल्या कामाचं उद्दीष्ट आणि ते करण्यामागचा आपला हेतू आधी स्पष्टपणे सांगितला आणि म्हणूनच ते यशस्वी झाले.
आपण भारतातलीच उदाहरण घेऊयात…
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन, मास्टरब्लास्टर सचीन तेंडुलकर हे सगळेच जण नेहमीच आपण एखादी गोष्ट ‘का’ करतोय हे जगाला सांगतात.
आपल्याकडील अनेक नेत्यांच्याही मागे प्रचंड मोठा जनसमुदाय उभा राहिला तो याचमुळे !
छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
आणि अशा कित्येक थोर नेत्यांमागे लोक कोणत्याही आर्थिक हितासाठी कधीच आले नाहीत.
तर ते केवळ या मंडळींचे विचार पटले, आणि त्यांच्या कामामागचं कारण… अर्थात ‘का?’
या लोकांना पटला होता. हे समजावून सांगण्यासाठी लेखकाने गोल्डन सर्कलची संकल्पना समजावून सांगितली आहे.
✔️ गोल्डन सर्कल –
गोल्डन सर्कल मध्ये सगळ्यात बाहेरच्या वर्तुळामध्ये आहे ‘काय’ हा प्रश्न,
मधल्या वर्तुळामध्ये आहे ‘कसं’ हा प्रश्न आणि आतील वर्तुळात आहे ‘व्हाय’… अर्थात ‘का’ हा प्रश्न.
👉 Apple कंपनीचे उदाहरण –
बऱ्याच कंपन्या ग्राहकांना आपल्या उत्पादनामध्ये काय आहे हे सांगत असतात.
म्हणजे उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगतात, काही कंपन्या यापुढे जाऊन आपलं उत्पादन कसं तयार होतं, काय काळजी घेतली जाते हे सांगतात म्हणजे गोल्डन सर्कलमधल्या हाऊ?
अर्थात ‘कसं’ या प्रश्नाचं उत्तर ते देतात. मात्र, Apple सारख्या कंपन्या सुरूवातीलाच ग्राहकांना ‘का’ या प्रश्नाचं उत्तर सांगतात…
Apple ने जेव्हा आयफोन लाँच केला तेव्हा स्टीव्ह जॉब्सने सांगितलं, की ‘आम्ही हा फोन लाँच करतोय कारण आम्हाला मोबाईल फोनच्या क्षेत्रात बदल घडवून आणायचाय.
आम्हाला आमच्या ग्राहकांना एक सर्वोत्तम अनुभव द्यायचाय.. ‘ हे उत्तर लोकांना प्रचंड भावलं आणि लोकांनी अगदी सहा सहा तास रांगेत उभं राहून आयफोन विकत घेतले हे आपण पाहिलंय.
‘व्हाय’ आणि ‘व्हॉट’ यामुळे किती फरक पडतो हे या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल.
👉 लक्षात ठेवा –
‘तुम्ही ‘काय’ करत आहात त्यात लोकांना रस नसतो, तर तुम्ही ते ‘का’ करत आहात यात लोकांना अधिक रस असतो’.
म्हणूनच मित्रांनो, स्वतःला ‘व्हाय’ हा प्रश्न आधी विचारा.
या प्रश्नाने तुम्हाला तुमच्या कामाचा, बिझनेसचा आणि जगण्याचा हेतू काय आहे याचं उत्तर मिऴेल आणि मग बघा पुढचा मार्ग आपोआप सुकर होईल…
Start With Why या पुस्तकाची मराठी आवृत्ती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा – https://salil.pro/startwithwhy
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com