My title My title
Brain StormingEducation

आय.आय.टी./एन.आय.टी.च मृगजळ: एक वास्तवता

आय.आय.टी./ एन.आय.टी. च मृगजळ: एक वास्तवताहल्ली समाजमाध्यमामधे अनेक विषयावर चर्चा झडत असतात.

अशाच एका शैक्षणिक चर्चेत एक सुशिक्षित जिज्ञासु महिला आयआयटी बद्दल प्रश्न विचारत होती.

आयआयटी क्लासेसची फि किती?

परीक्षा किती अवघड?

कसा अभ्यास करावा?

किती तास अभ्यास करावा?

कुठे कोचिंग लावावे वगैरे. एव्हड़ी उत्सुकता आणि प्रश्नानन्तर प्रश्न विचारून भंडावून सोडलेल्या महिलेस मग उतर देणाऱ्या महाशयांनीही एक प्रश्न विचारला कि ‘मैडम, आपका बच्चा कौनसी क्लासमें पढ़ रहा है?’

तिकडून मिळालेले उत्तर ऐकुन ते थक्कच झाले. त्या मैडमच बाळ दुसऱ्या इयत्तेत शिकत होतं!

मग या चर्चेत एक मानसोपचारतज्ञ डॉक्टरही शामिल होते त्यांनी लगेच एक मोठी कॉमेंट टाकली – ‘माफ़ करा मैडम. तुम्ही आठ वर्षानी जगाच्या मागे आहात.

आयआयटीच कोचिंग खुप आधीच सुरु होत असतं, त्यासाठी लहानपणीच वेगवेगळी ट्रेनिंग-कोचिंग दयावी लागते आणि त्याचेही क्लासेस शहरात उपलब्ध आहेत.

आता तुमच्या बाळाच काही खरं नाही, झाला तो उशीर ठिक आता अजुन उशीर करु नका.

आणि जमलंच तर माझ्या क्लिनिकला अपॉइंटमेंट घेवून या, आपण या विषयावर सविस्तर चर्चा करु.’, 

अर्थात ते डॉक्टर महाशय खुप चिडुन उपहासत्मकेने उत्तर देत होते.

बिचारं हसर-रडनारं बाळ ज्याला या जगात येवून काही दिवसंच झालेले, अजुन आई-बाबाचे पुरेसे संस्कार मिळाले नाही, घरातील प्रत्येकांशी पुरेशी ओळख झाली नाही, शारीरिक बौद्धिक वाढ झालेली नसतानाही आई आतापासूनच त्याच्या आयआयटीचे स्वप्न रंगवत होती.   

तो भविष्यात जगाच्या स्पर्धेत मागे राहू नये  हया भितिपोटी तिची हि धडपड. 

हि वस्तुस्थिति आहे कि आज प्रत्येक पालकाला आपला मुलगा आयआयटीच व्हावा अशी इच्छा असते. 

शिक्षण , नोकरी आणि उद्योग धन्द्यामधे एकापेक्षाएक सरस हजारो चांगले पर्याय उपलब्ध असताना सर्व पालकाना आपला मुलगा आयआयटीच व्हावा,असे का वाटावे?

असं काय दडलयं या आयआयटी/एनआयटीमध्ये? खरोखरच आयआयटी म्हणजे करोड़च पैकेज का?

गैरसमझ दूर होवून पालक व विद्यार्थ्याची मानसिकता बदलावी यासाठी हा लेख.

एकशे तीस कोटीच्या घरात जाणाऱ्या लोकसंख्येच्या आपल्या भारत देशात सर्व राज्यात जुने-नवीन मिळून २३ आयआयटी संस्था आहेत. 

त्यात उपलब्ध जागा आजघडिला मात्र १०९९८ आहेत.

येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलींचा टक्का वाढावा म्हणून वेगळ्या १४% जागा खास त्यांच्यासाठी राखीव असतील असा केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे कदाचित १००० जागा वाढण्याची शक्यता आहे.

राज्यघटनेप्रमाणे एकंदरित जागेपैकी ५०%  जागा नियमाप्रमाणे इतर मागासवर्गीय जातिसाठी आरक्षित आहेत. त्यातही आयआयटीमध्ये काही शाखा अशा आहेत की ज्या विद्यार्थ्याना आवडत नाही आणि त्या शाखा विद्यार्थी निवडतही नाहीत आणि दरवर्षी रिकाम्या राहतात. 

१६ जुने विकसित,अनुभवी फैकल्टी असलेल्या आयआयटी संस्था सोडल्या तर इतर ७ संस्था पाहिजे तेव्हड़या विकसित झालेल्या नाहीत.

आयआयटीच्या नियमानुसार त्यांच्याकड़े सर्व सुविधा, इमारत, प्रयोगशाळा, हॉस्टेल, लाइब्ररी विकसित झालेले नाहीत.

आजही बऱ्याच नव्या आयआयटीच्या स्वतःच्या इमारती तयार नाहीत त्यामुळे त्यांना इतर कॉलेजच्या भाडोत्री वास्तुमध्ये शिकवावे लागते.

काही आयआयटी कॉलेज इतक्या रिमोट ठिकाणी आहेत की तेथे अनुभवी, उच्चशिक्षित प्राध्यापक रुजू होत नाही. काही चांगले आयआयटी सोडले तर इतर ठिकाणी उच्च शिक्षित प्राध्यापकाचा वानवा आहे.

दर वर्षी  बारावी विज्ञानशाखेचे साधारण 9 लाख विद्यार्थी जेईई मेन ही प्रवेश परीक्षा देतात. यामधील गुणवंत विद्यार्थ्याला एनआयटी, आयआयआयटी  किंवा आयआयएसइआर सारख्या संस्थेत प्रवेश मिळतो. 

9 लाखापैकी साधारण साधारण अडीच लाख गुणवंत विद्यार्थी पुढे जेईई एडवांस ही आयआयटी प्रवेशसाठी पात्र परीक्षा देतात.

शेवटी त्यापैकी १०९९८ विद्यार्थी आयआयटीत प्रवेश घेतात. 

जेईई हि देशातील एक कठिन परीक्षा म्हणून गणली जाते.

या परिक्षेचे प्रश्न खुप कठिन असतात आणि ते प्रश्न रिपीटही होत नाहीत. 9 लाख मधून १०९९८ ची निवड यावरूनच स्पर्धेचा अंदाज येवू शकतो.

अर्थातच वाढत्या स्पर्धेमुळे आणि उपलब्ध कमी जागेमुळे ही स्पर्धा जीवघेनी ठरते.

प्रत्येक वर्षी या परिक्षेच्या अभ्यासाच्या तणावामुळे होत असलेल्या आत्महत्या आपण ऐकत असतो. 

राजस्थानातील कोटासारख्या ३०० कोचिंग सेंटरची बाजारपेठ असलेल्या शहरामधे मागील काही वर्षात ७६ आत्महत्या झाल्या. त्या घडू नये म्हणून राजस्थान सरकारने एक समिति नेमून त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला.

तसेच विद्यार्थी वसतिगृहामध्ये समुपदेशकाची नेमणूक केली आहे.आयआयटी ची सुरुवात :

ब्रिटिश राजवटीमधे भारतात उच्चतंत्रज्ञानाचे असे कोणतेही कॉलेज नव्हते.

स्वातंत्र्योतर काळात विज्ञान-तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात देशाची प्रगति व्हावी, देश स्वावलंबी व्हावा म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूनी दुसऱ्यां महायुद्धनन्तर एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

सर जोगेंद्रसिंग यांनी स्थापन केलेल्या या कमिटीचे श्री नलिनी सरकार हे अध्यक्ष होते. भारतातील विविध भागात उच्च तांत्रिक शिक्षण देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्याची जबाबदारी या कमिटीची होती. 

या कमिटिने निष्कर्ष काढला कि खरोखरच देशाची उन्नति व्हायची असेल तर फक्त पैसा आणि भांडवल उपयोगी नसून देशात औद्योगिक उच्चतंत्रज्ञान देणारी संस्था आवश्यक आहे.

ब्रिटीश राजवटीमधे सर्व छोटेमोठे उद्योग-कारखाने बंगाल प्रांतात एकवटलेले होते त्यांमुळे कमिटीने पहिले तंत्रज्ञान महाविद्यालय बंगालमध्येच सुरु करण्याचे सूचविले.

त्यानुसार हिजली डिटेंशन कैंप खड़गपुर येथे पहिल्या आयआयटी संस्थेची सुरुवात मे १९५० मधे झाली. १५ सप्टेंबर १९५६ पार्लमेंटमधे सर्व सम्मतिने आयआयटीचा कायदा पास केला आणि त्याला ‘इंस्टिट्यूट ऑफ़ नॅशनल इम्पोर्टेंस’ असा दर्जा देण्यात आला.

देशाच्या सर्वच भागाचा संतुलित विकास व्हावा म्हणून मग इतर चार संस्था एक एक वर्षाच्या अंतराने मुम्बई, मद्रास, कानपूर आणि दिल्ली येथे सुरु करण्यात आल्या.

पुढे राजीव गांधी पन्तप्रधान असताना आसाममधे विद्यार्थीचा वाढता उद्रेक बघून एक आयआयटी संस्था १९९४ मध्ये गुवाहाटी येथे सुरु करण्यात आले. सन २००१ मधे रुड़की येथील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला.

पुढे अटलबिहारी वाजपेयी पन्तप्रधान असताना इतर राज्यानाही एकएक आयआयटी देण्याचे ठरले. त्यांनंतर आयएसएम धनबाद,  बनारस हिंदू येथील उच्चशिक्षणाच्या कॉलेजला आयआयटी दर्जा देण्यात आला.

आजघडिला अख्या देशात नवे-जुने मिळून २३ आयआयटी  संस्था आहेत. तसेच प्रत्येक राज्यात एक असे ३१ एनआयटी (राष्ट्रिय प्राद्योगिक संस्था) आणि २३ आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, किंवा ट्रिपल आयटी) आहेत.

या सर्व संस्थाना शासनाने ‘इंस्टिट्यूट ऑफ़ नेशनल इम्पोर्टन्स’ असा दर्जा दिला आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी ह्या देशातील जागतिक दर्जेच्या संस्था म्हणून गणल्या जात असल्या तरी सर्वच संस्था दर्जा टिकवून आहेतच असे नाही.

आधीचे १६ आयआयटी, पहिले १० एनआयटी आणि ५ ट्रिपल आयटी सोडले तर इतर संस्था दर्जेच्या मानांकनमध्ये मागे आहेत. जेईई मेन, जेईई एडवांस अशा कठिन परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यानाच या संस्थेमधे प्रवेश दिला जातो.आयआयटी महत्व कसे वाढले ?

सन १९९१ पूर्वी आयआयटीबद्दल देशात तेव्हड़ी जागरूकता नव्हती.

काही सुशिक्षित शहरी समाज सोडला तर इतर लोकांना या परिक्षेची माहितीसुद्धा नव्हती. प्रचार व प्रसार नसल्यामुळे खुप कमी विद्यार्थी जेईई या परिक्षेस बसत होते. १९९१ मधे सरकारने ‘लायसन्सराज’ बन्द करून ‘मुक्त व्यापार’ धोरण अवलंबिले त्यामुळे परदेशी कंपन्यासाठी देशाचे द्वार खुले झाले. 

कंप्यूटरक्रांतिमुळे आयटी क्षेत्रात प्रचंड बदल होत गेले. कॉम्प्यूटर आणि माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होवून त्यात सॉफ्टवेयर अभियंत्याची प्रचंड मागणी वाढली. 

तसेच बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यात भारतीय बुद्धिजीवी अभियंत्याना नोकऱ्या मिळू लागल्या. आयआयटी संस्थेमध्ये हुशार विद्यार्थ्याना करोड़ो रूपयाचे पैकेज देण्यात येत असल्याच्या बातम्या वृत्तमानपत्र तसेच टीव्हीवर झळकु लागल्या.

जिथे पारंपरिक पदवी अभियंत्याना २० वर्षापेक्षा जास्त अनुभव असुनही वार्षिक १० लाखापेक्षा जास्त पगार मिळत नव्हता तिथे २२ वर्षाचे नुकतेच मिसरुडे फ़ुटलेली ‘सॉफ्टवेयर इंजीनियर’ मुलं मोठ मोठ्या पैकेजवर आयटी कंपनीत लागत होती.

आयटी क्षेत्रात करोड़ोच पैकेज मिळवण्यासाठी तल्लख बुद्धिमत्तेशिवाय इतर संसाधनाची गरज नसते. इतर क्षेत्राप्रमाणे तिथे २५-३० वर्षाचा अनुभव लागत नाही.

त्यामुळे कमीतकमी वर्षात जास्तीत जास्त पैकेज मिळवण्याचा हमखास मार्ग म्हणजे ‘आयटी सॉफ्टवेयर इंजीनियर’ हे समीकरण बनले. वृतमानपत्रात अशा बातम्या पहिल्यापानावर झळकु लागल्या आणि घरोघरी आयआयटीची चर्चा होवू लागली.

आज समाजात  पारंपरिक अतान्त्रिक शिक्षणापेक्षा तांत्रिक शिक्षणाला जास्त महत्व आहे. अशात जेंव्हा सर्व विद्यार्थ्याचा लोंढा अभियांत्रिकीकड़े जात असेल तर आयआयटी/एनआयटीच महत्व वाढने साहजिक होते.

त्यातच कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक त्यांचे प्रवेश वाढावे म्हणून मुलांच्या डोळयासमोर आयआयटीबद्दल एव्हडी काही रजंक स्वप्न रंगवतात की आयआयटीशिवाय या जगात काहीच मोठ नाही असं मुलांना वाटू लागतं. 

पालकानाही वाटते की एकदा काय मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला की त्याला मोठ्या पैकेजची नोकरी मिळून त्याचे लवकर करियर घडेल म्हणून कोचिंगसाठी लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात.

मग ज्याना शक्य आहे ते राजस्थानातील कोट्याला जावून स्वतः मुलासोबत राहून दोन वर्षासाठी साधारण ५-६ लाख रुपये खर्च करतात. आपल्याकड़े यश हे पैशामध्ये मोजले जाते तेंव्हा जेव्हड़ मोठं पैकेज तो तेव्हड़ा यशस्वी  हे समीकरण तयार झाले.

एखाद्या शहरातुन कोणी आयआयटीला लागला म्हणजे त्याला चार वर्षानंतर करोड़च पैकेज मिळणार असा गैरसमझ समाजात रूढ़ झाला. मग शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्रमण्डली आणि सहकर्मचारी सर्वाना आपल्या मुलाने इतर काही नाही फक्त आयआयटीलाच प्रवेश घ्यावा असे वाटने साहजिक होते.

आणि त्यामुळेच आयआयटीची अफाट प्रसिद्धि वाढली.खरी वस्तुस्थिति काय आहे, खरोखरच कोटीच पैकेज मिळतं का?

मुळात आयआयटी/एनआयटी मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्याना कोटिच पॅकेज मिळते हा निव्वळ गैरसमज आहे.

एव्हडेच नाही तर हा सर्व धांदात खोटारडेपणा आणि फसवा प्रचार आहे.

दरवर्षी गूगल, याहू, फेसबुक किंवा माइक्रोसॉफ्टसारख्या आयटी क्षेत्रातील बहुदेशीय आयटी कंपन्या नोकरभरतीसाठी आयआयटी/एनआयटीमधे कैंपस इंटरव्हिव घेत असतात. 

चांगल्या आयआयटीच्या कंप्यूटर शाखेच्या एखादया खूपच  हुशार विद्यार्थ्यास १.५ ते २ करोड़च (डॉलरच्या रुपात ) पैकेज देतात.

  लक्षात ठेवा फक्त कंप्यूटरशाखेच्या विद्यार्थ्यास आयटी कंपनीकडून हे पैकेज मिळत असत. इतर क्षेत्रातील कंपन्या एव्हड़ पैकेज देत नाही, किंबहुना त्यांना परवडत नाही.

मग अशा मोठया पॅकेजच्या बातम्या वृतपत्राच्या पहिल्यापानावर झळकतात आणि समाजमाध्यमाद्वारे व्हायरल होतात. मग तो विद्यार्थी, तो शिकत असलेली आयआयटी संस्था आणि ती पैकेज देणारी कंपनी याची फुकटात देशभर जाहिरात आणि पब्लिसिटी होवून जाते. 

पण वस्तुस्थिति वेगळीच असते.  ही पैकेजची ऑफर मुळात परकिय चलन म्हणजे डॉलर मध्ये असते. कंपनीचे इतर भत्ते, पीएफ, ग्रैजुटि शेअर वगैरेचा समावेश त्यात केलेला असतो. 

सर्व वजाजाता हिशोब केला तर मिळणारी रक्कम खुप कमी असते. समजा गूगलने एका विद्यार्थ्यास  १ कोटि पैकेज युएस डॉलरची ऑफर दिली तर त्यास भारतीय रूपये स्वरुपात फक्त ४० लाख रूपये मिळत असतात.

ते काम करत असलेल्या ठिकाणाच राहणीमान व इतर खर्च बघता मिळणारा पगार काही जास्त नसतो. कारण हा पगार डॉलर स्वरुपात असतो.

तेथील राहण्याचा खर्च, मेडिकल, टैक्सेस आणि इतर सर्व बाबीचा विचार करून उरलेल्या चलनाचे भारतीय चलनात रूपांतर केल्यास हातात साधारण ४० लाख रुपये पडतात.

हे आतलं सत्य सांगायला मिडियाकड़े वेळ नसतो. त्यामुळे ‘करोड़च पैकेज’ हा खोटारडा प्रचार ठरतो.आयआयटी/एनआयटी म्हणजेच सक्सेस का?

मुळीच नाही, भारतीय समाजात यश फक्त पैशामध्ये मोजले जाते, ही खुप मोठी शोकांतिका आहे.

ज्याच्याकड़े जेव्हड़ा जास्त पैसा तो तेव्हड़ा यशस्वी, हे समीकरण बनले आहे.

त्यामुळे आयआयटी एखाद्यास १ करोड़च् मिळाले म्हणजे तो खूपच यशस्वी अशी धारणा झाली आहे. 

मुळातच आयआयटी मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे बुद्धिजीवी, गुणवंत, मेहनती आणि हुशार असल्यामुळे मोठे उद्योजक तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या उद्योगात नवनवीन संशोधन व विकास करण्यासाठी अशा मनुष्यबळाची गरज असते. 

आज मोठमोठ्या उद्योजकाच्या बोर्डवर एकतरी आयआयटिन असतोच त्यामुळे त्यांना यशाच शिखर गाठन त्यांना सोप जात. तसेच भारत सरकारची भागेदारी असलेल्या कम्पनी (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग)मधे जास्तीत जास्त भरती आयआयटी/एनआयटीची असते. परदेशातही भारतीय आयआयटीयन ला खुप मागणी आहे.

तसेच त्यांच ‘अल्युमनी नेटवर्क’ पक्क असल्यामुळे त्यांना नोकरी-उद्योगामधे वरिष्ठाकडून सहायताही मिळते.

इनफ़ोसिसचे नारायण मूर्ति, नन्दन नीलकेणी, अरविंद केजरीवाल, सुन्दर पिचाई  आणि चेतन भगत अशी काही लोक आहेत जे आयआयटीमध्ये शिकुन विविध क्षेत्रात खुप पुढं गेली आहेत. 

त्यांनी पैसा आणि नावलौकिकही कमावला. बरेचसे आयआयटीयन आज आयएएस, आयपीएस सारख्या नागरी सेवेत रुजू आहेत. काही आयआयटीयन परदेशात उच्चशिक्षण घेवून तिथेच स्थायिक होतात, कालांतराने एखाद्या आयटी कंपनीचे सीईओ बनतात.

पण याचा अर्थं सर्वच आयआयटीयन यशाच्या उंच शिखरावर पोहोचतातच किंवा त्यांना करोड़ोच पैकेज मिळतेच असे नाही.

पालक किंवा विद्यार्थ्याने या भ्रमात राहु नये. तेथील चार वर्षात विद्यार्थी आपल्या अभ्यासासह इतर जड़नघड़नीवर, स्वतःचा बौद्धिक, मानसिक विकासावर किती भर देतो यावर त्याचा पुढचा प्रवास ठरतो.

बरेचशे विद्यार्थी एकदा आयआयटीला प्रवेश मिळाला कि निश्चिन्त होतात, भरकटतात आणि अभ्यासात मागे पड़तात नि मागे राहतात. 

जे खरोखरच हुशार आणि मेहनती आहेत अशा दोन-चार कंप्यूटर इंजियरिंगच्या विद्यार्थ्याला  कंपनी चांगल्या ऑफर देतात बाकिना साधारण  ९ लाख ते ११ लाखपर्यन्त पैकेज मिळतो.

मग चांगली नोकरी मिळवन्यासाठी त्यांना अजुन पुढे शिकावे लागते. काही उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात आणि मग तिकडलेच होतात.

पण यशाच उंच शिखर गाठण्यासाठी फक्त आयआयटी/एनआयटीच पाहिजे असं नाही. एखाद्या चांगल्या दर्जेदार राज्यस्तरीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेवून नंतर परदेशात एमएस करून विद्यार्थी उज्वल करियर घडवू शकतो.

जागतिक स्तरावर आयआयटी/एनआयटीसारख्या संस्थेत शिक्षण न घेताही खुप व्यक्ति बहुराष्ट्रीय कंपनीच्या उच्चपदावर पोहचलेल्या आहेत. भारतरत्न माजीराष्ट्रपति डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आयआयटीयन नव्हते.

‘ऑपरेशन फ्लड’ द्वारे देशात ‘दुग्धक्रांति’ घडवनारे पद्मविभुशन सन्मानित डॉ वर्गीस कुरियन हे आयआयटीयन नाहीत.  इस्रोचे अध्यक्ष अनिल वाकोडकर हे व्हिजेटीआयचे विद्यार्थी आहेत.

माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेलासुद्धाही त्यापैकी एक मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलोजी सारख्या साधारण कॉलेजमध्ये शिक्षण घेवून ते उच्चपदावर पोहोचले, माइक्रोसॉफ्टचे सीइओ झाले.

वर्ष २००९ मधे ज्याना रसायनशास्त्रात नोबेल प्राईज नंतर पद्मविभूषण मिळविणारे वेंकट रामकृष्णन हे काही आयआयटीयन नाहीत. ‘फादर ऑफ़ पेंटीयम चिप’ अशी उपाधी ज्याना मिळाली ते विनोद धाम यांनी दिल्ली विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण घेतल आणि ते आयआयटी किंवा एनआयटीचे विद्यार्थी नाहीत.

ज्या  हॉटमेलला माइक्रोसॉफ्टने विकत घेतले त्या हॉटमेलचे सबीर भाटिया काही आयआयटीयन किंवा एनआयटीयन नव्हते. एव्हड़च काय आज देशात अगनित उद्योजक, वैज्ञानिक आणि यशाच उंच शिखर गाठलेली मंडली आहेत ज्यांच शिक्षण खुप मोठ्या नामांकित कॉलेजमधे झालं नाही.  वैज्ञानिक संशोधन क्षेत्र तसेच इस्रोमधे आयआयटीचा भरना नाही. 

विशेष म्हणजे, आज आयआयटी संस्था सुरु होवून ६७ वर्ष झाली पण एकही आयआयटीयनला ‘नोबेल प्राईज’ किंवा ‘भारतरत्न’ सारखा सर्वोच्च बहुमान मिळालेला नाही.

कारण मानवजातीच्या कल्यानासाठी कितीतरी वर्ष रात्रंदिवस झटुन विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या साहित्य, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशात्र आणि जागतिक शांतता क्षेत्राच्या संशोधकास नोबेल प्राईज सारखा सन्मान मिळतो.

आयआयटीचा प्रवास जेईईपासून सुरु होवून एका मोठ्या पैकेजची आरामदायक नोकरी किंवा परदेशी नोकरीवर येवून थांबतो. या पैकेजच्यापुढे आयआयटीयन विचार करत नाही.

आज जरी वृतमानपत्र करोड़च्या पैकेजची दख्खल घेत असतील पण उद्याच्या इतिहासाच्या पानावर अब्जाधिशाबद्दल एक ओळही लिहीत जाणार नाही, हेही तेव्हडचं खरं. ज्यानी समाज आणि देशासाठी स्वतःला वाहून घेतले अशाच व्यक्तीची इतिहास नोंद घेतं.

  साधी कला शाखेची पदवी घेवून, विपरीत परिस्थितीत २१ व्या वर्षी आयएएस, आयपीएस झालेले तरुण आपल्या देशात आपण बघतो.

‘स्टे हंग्री स्टे फुलिश’ किंवा ‘कनेक्ट द डॉट्स’ सारखी पुस्तके वाचून आपल्या लक्षात येईल कि हनुमंत गायकवाड़, विठ्ठल कामथ सारखी काही मंडली जुजबी शिक्षण घेवूनही आपल्या मेहनत, कौशल्य, सचोटी आणि जिद्दीच्या जोरावर यशाच्या उंच शिखरावर पोहचली आहे. तेंव्हा सक्सेससाठी मोठी पदवी लागतेच हा भ्रम दूर होतो.

  ‘सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे…जे सुदूर, जे असाध्य तेथे मन धावे’ हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आज गरज आहे कि पालकानी वेळीच जागे होण्याची, आपल्या मुलाची प्रतिभा, क्षमता आणि कल ओळखण्याची.

प्रत्येक विद्यार्थी हा प्रतिभाशाली असतोच, त्यामध्ये एक वेगळी प्रतिभा (टेलेंट) असते गरज आहे ती फक्त ओळखण्याची.  त्यामुळे शेजाऱ्याचा मुलाला आयआयटीत प्रवेश मिळाला म्हणजे माझ्याही मुलाला प्रवेश मिळावाच असा हट्ट धरून आपल्या अपेक्षेचे ओझे मुलावर लादू नये.

कारण तुमचा मुलगा आयआयटी न करता आयआयएम, आयएएस, उद्योजक किंवा एखादा मोठा कलाकार होवून खुप पुढे जाऊ शकतो.   क्षमता असेल तर उत्तमच, नसता इयत्ता ११/१२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानेही कोचिंग क्लासेसच्या मोठ-मोठ्या जाहिराती, आमिषे, भूल-थापाला बळी न पड़ता सदसदविवेकबुद्धिंने योग्य तो निर्णय घ्यावा. 

तसेच फक्त आयआयटी, एनआयटी अशा एकेरी विचार न करता इतर शैक्षणिक क्षेत्र आणि करियरचाही विचार करावा. कारण देशाच्या प्रगतीसाठी अभियांत्रिकीप्रमाणे इतर क्षेत्रही तेव्हडीच महत्वाची आहेत.

प्रेम जैस्वाल premshjaiswal@gmail.com

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button