My title My title
Something Different

Priceless 2006 Explained in Marathi

Priceless 2006 Explained in Marathi



©भूषण भन्साली



‘सुंदर स्त्रीयांच्या मागे हे जग अक्षरश: वेडं आहे’ हे वाक्य जितकं टोचणारं आहे तितकंच प्रखर सत्यही आहे.


लेख पुर्ण वाचलात तर नक्कीच YouTube वर शोधायची इच्छा होईल…


टोचणारं या अर्थाने कि तिच्या सौंदर्यापुढे तिचं मन, हृदय, आवडी, बुध्दीमत्ता यांचा काही विचारच नसतो पहाणा-या पुरूषी नजरांना.

अशा सौंदर्याचा भरपूर उपयोग करून घेताना बहुतांश सुंदर स्त्रीयाही श्रीमंतीचं आयुष्य देणारा पुरूषच पसंत करतात कारण हि-याला सोन्याचंच कोंदण हवं.

प्रेम नाही मिळालं तरी चालेल पण पैसा मात्र हवा, तोही भरपूर हवा. ही त्यांचीच निवड असते.

श्रीमंती ही अमुक एका मर्यादेनंतर लुळी पडते कारण ती उपभोगण्यावर मर्यादा येते. एका शरीराने तुम्ही काय काय उपभोगणार आणि किती. वय वाढत जातं तशी श्रीमंतीही म्हातारी होत जाते.

एक क्षण श्रीमंतांच्या जिवनात असा येतो की जिवनात तुमच्यावर प्रेम करणारं कुणी नसेल तर तुमचं जिवन आणि तुमची श्रीमंती ही कवडीमोलाची ठरते, तिचा काहीच उपयोग नसतो.

खरं तर तुमच्या जिवनात असलेलं प्रेम ही किंमतच न करण्याइतकी अफाट मोठी संपत्ती असते.

असे अनेक श्रीमंत लोक मग नेहमी एखाद्या आपल्या अर्ध्या वयाच्या युवतीसह कुठे रिसॉर्टवर दीर्घकाळ मनसोक्तपणे प्रेमसुखात डुंबण्यासाठी जात असतात, तिचं प्रेम विकत घेऊन.

पण ते कॉन्ट्रॅक्ट असतं. ते काही तिचं वा त्याचं खरं प्रेम नसतं. एक विरंगुळा मात्र. आणि अशा असंख्य एकाकी श्रीमंतांसाठी खुप सुंदर सुंदर मुली सदा तयारच असतात पंचतारांकीत हॉटेलांच्या लॉबीमध्ये.

जिवनात प्रेम आणि पैसा म्हणजे श्रीमंतीचं आयुष्य यापैकी काय निवडायचं या यक्षप्रश्नावर या अशा सर्व सुंदर स्त्रीयांनी मन निष्ठूर करून पैसाच निवडलेला असतो. तेच त्यांचं जिवन असतं.

या श्रीमंतीच्या जिवनाच्या हव्यासापायीच्या हापापलेपणात त्यांना स्वत:च्या मनाचा व हृदयाचाही विसर पडलेला असतो…

अशीच एक सौंदर्यवती इरीन (ऑड्री टॉटु नावाची फ्रेंच नटी. दा विंन्सी कोड, अमेलिया चित्रपटांची हिरोईन, फ्रेंच उच्चार उद्राय तुतु).

ही एक तिशी पार केलेली सुंदरी तिच्या दुप्पट वयाच्या श्रीमंताबरोबर गिलेस बरोबर फ्रेंच रिवियेरा येथिल रिसॉर्टवर आलेली असते तिचा वाढदिवस साजरा करायला.

एके रात्री गिलेस गाढ झोपेत असताना उशिरा रात्रीपर्यंत ती मद्यपान करीत असताना तिची जीन या तरूणाशी ओळख होते (नट गॅड अल्माले).

खरं तर जीन हा त्या हॉटेल मधिल नोकरी टिकवायला पडेल ते काम करणारा अत्यंत गरीब स्वभावाचा हरकाम्या नोकर असतो ज्याला पडेल त्या परिस्थीतीशी विरोध न करता जगणं महत्वाचं असतं.

त्याच्या मृदू स्वभाव व बोलण्याच्या शांत पध्दतीवरून तिला तोही गिलेससारखाच कुणी अतिश्रीमंत माणूस वाटतो व तिला तो आवडूनही जातो कारण दोघंही समवयस्कही असतात.

दोघांच्यात त्या रात्री प्रेमप्रसंगही होतो. नंतर दुस-या दिवशी तिला कळते की हा तर हॉटेलमधला पो-या आहे तेव्हा ती त्याचा विचार मनातुन झटकुन टाकते.

पण त्या प्रेमप्रसंगामुळे जीनच्या मनात इरीन घर करून बसलेली असते तिचा व्यवसाय माहीत असुनही. त्याला ती हवी असते आणि तिला फक्त पैसा हवा असतो.

तो ऐपत नसतानाही तिच्यावर आपले अतिकष्टांनी साठवलेले सारे पैसे उधळतो. कारण त्यालाच माहीत नसतं की काय आकर्षण असतं ते.

शेवटी त्याचे सगळे पैसे संपतात तेव्हा अगदी निष्ठुरपणे ती त्याला जायला सांगते तेव्हा खरंच आपण तिचा कुठेतरी मनात तिरस्कार करतो.

तो खिशातुन शेवटचं एक नाणं काढतो आणि तिला देतो व विचारतो यात मला तुझा किती वेळ मिळेल आणि ती म्हणते फक्त एक मिनिट.

त्या एक मिनिटात तो तिला डोळे भरून पाहून घेतो, साठवुन घेतो. मग ती त्याला क्रूरपणे जायला सांगते. आणि तो परततो हॉटेलला आणि इरीन पुन्हा तिच्या विश्वात.

पुन्हा पुढील वर्षी तिच्या वाढदिवसाला ती याच हॉटेलात येते गिलेस बरोबर तेव्हा जीन पुन्हा भेटतो तिला. पण जीन आता या वर्षभरात बराच बदललेला असतो.

सर्व पैसे इरीनच्यापायी संपवल्यावर त्याला पैशांची फारच चणचण असते. एका साठीच्या अतिश्रीमंत बाईला तो आवडलेला असतो व तिचा कीप म्हणून आणि तिच्या सुटमधे तो रहात असतो.

आता तो हॉटेलचा हरकाम्या नसतो तर इरीनच्याच धंद्यातला एक भाडोत्री पुरूष ( जिगोलो ) बनलेला असतो.

परंतु भोळसटपणामुळे साधेपणामुळे त्याला तेही तितकंसं जमत नसतं. इरीनला हे ऐकुन गंमतच वाटते व ती त्याला एक क्रॅश कोर्सप्रमाणे सल्ले देऊन त्या श्रीमंत म्हातारीला कसं लुटावं हे शिकवते.

दरम्यान इरिन व जीनचं हुकलेलं प्रेमाचं आकर्षण पुढे तृप्त होत सुरू रहातं गुपचुपपणे.

एक वेळ अशी येते की इरीनला गिलेस अचानक सोडून गेल्यामुळे व जाताना तिचं सर्व काही घेवुन गेल्यामुळे फक्त नेसत्या कपड्यावर येते ती, रहायला जागा नाही आणि जवळ दमडीही नाही.

अशावेळी जीन तिच्या पाठीशी उभा रहातो. तेव्हा तिला त्याचं प्रेम हे शरीरापलिकडचं व सौंद-यापलिकडचं आहे हे जाणवतं.

त्याच्याकडे दमडी नव्हती तेव्हा तिने त्याचा अपमान केलेला असतो. या उलट तिला तो संकटकाळात आधार देतो.

हळुहळु दोघांनाही जाणवते की दोघंही एकमेकांची खूप काळजी करतात व एकमेकांशिवाय आता राहू शकत नाहीएत.

2006 मधे आलेल्या Priceless या चित्रपटाची कथा तुम्हाला मी सांगतोय. प्रेक्षकांची बुध्दीमत्ता व रसिकता गृहित धरून प्रेमातील बारकावे विषद करून सांगताना.

विनोदाची झालर असलेला परंतु आयुष्यावर व प्रेमावर भाष्य करणारा हा चित्रपट खरं तर प्रत्येकाने एकदा तरी पहावाच. कुठेही उथळपणा, भडकपणा वा पांचटपणा नाही.

काही हाफ न्यूड सीन्स आहेत परंतु ते कथेला पूरक असल्याने ते वावगे वाटत नाहीत आजिबात. देहवासनेतुनच प्रेमाचं नातं कसं रूजतं हे अतिशय सुंदरपणे दाखवताना पदोपदी हा चित्रपट आपल्याला निखळपणे हसवतही रहातो.

गुलछबु इरीनचं पात्र ऑड्रीने इतकं सहज, छान व अभिनवपणे उभं केलंय की जर तुम्ही प्रथमच तिला पहात असाल तर नक्कीच तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.

तिच्या चेह-यावरचे मुरलेले भाव जणु एक कादंबरीच वाटेल तुम्हाला तिच्या स्त्रीजिवनाची. गॅडने जीनचं पात्र उभं करताना एक खरोखरचा माणूस उभा केलाय जो चुकतोमाकतो पण सत्य आहे.

जिवनावर रागावलेल्या त्याचे दु:खी डोळे आपल्या मनाला आपल्या जिवनात डोकावायला लावतात.

इतकं होवुनही प्रचंड ताण असुनही तो कुठेही निराश होत नाही, जीव मुठीत घेऊन जिवनाशी लढत रहातोय हे आपल्या मनाला भावतं.

पैशाच्या जगातील निष्ठूरता सुंदर विनोदात गुंडाळुन फ्रेंच लेखक दिग्दर्शक पेरी साल्वादोरीने हा खूप आगळावेगळा चित्रपट बनवला आहे.

या निमित्तानं तो आपल्याला फ्रांसमधिल अति महागड्या हॉटेलातील अतिश्रीमंताचं जिवन दाखवतोय. पहायला खूपच छान वाटतं.

तिस हजार युरोचं घड्याळ, आठशे युरोचा शर्ट, जेवणाच्या हॉलची एंट्री फी दोनशे युरो इतकं महागडं जिवन या चित्रपटाद्वारे प्रेक्षक स्वत:ही जणु एकदा स्वप्नवत जगून घेतात.

मग या अति महागड्या जिवनात नेहमी जगण्यासाठी कुणीही स्वत:ला विकलं तर त्यात नवल ते काय असं वाटून जातं प्रेक्षकांना.

पण तेच तर तो सांगतोय की या संपत्तीत लोळण्यात सुख नाही तर ते प्रेम करण्यात व प्रेम मिळवण्यात आहे.

विकतचा सेक्स व पैसा हा विषय अति हळुवारपणे पण रंजकपणे मांडताना दर मिनिटाला प्रेक्षकांची पसंती मिळवतो हा दिग्दर्शक.

उत्तम साजेश्या श्रीमंतीचा पदर असलेल्या संगीतानं सजलेला हा चित्रपट स्वप्नवतच आहे.

अतिश्रीमंतीचं जिवन व सतत भरमसाठ पैशांना चटावलेली हावरट इरीन एकच चुक करते की ती जीन या एका प्रेमळ माणसाला आपल्या मोहजाळात अडकवायला जाते.

चित्रपटाचा शेवट काय होतो तो तुम्ही पहाच. जाऊ दे सांगूनच टाकतो.

त्याने तिला दिलेलं नाणं तिच्या पर्समधे तसंच पडुन असतं तो वापरण्याचा हलका प्रसंगच कधी न आल्याने.

तेच नाणं ती त्याला शेवटी देते व विचारते की या पैशांत तु मला किती वेळ देशिल आणि तो तिला त्याचं संपूर्ण जिवनच देवुन टाकतो.

त्या पंचतारांकीत देहविक्रीच्या जिवनाला रामराम ठोकुन दोघेही त्याच्या स्कूटरवर त्या हॉटेलपासुन, त्या जिवघेण्या श्रीमंतीपासून खूप दूर दूर निघून जातात.. आपलं स्वतंत्र प्रेमाचं सहजिवन जगण्यासाठी..

आवडली ना ही कथा. आता पहा संपूर्ण चित्रपट मन लावुन. Priceless प्रेम पहा.



आमच्या  प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा



©भूषण भन्साली

( Amazon prime videos, netflixyoutube वर आहे. )

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button