Something Different
Hacking Part 2
Hacking: Part 2
हॅकिंग : भाग २
©मिलिंद जोशी, नाशिक
मागील लेखात मी वेबसाईट Hacking बद्दल सांगितले होते.
जे लोक नेटवर्क किंवा कॉम्प्युटर फिल्डशी संबंधित आहेत त्यांना याबद्दल जुजबी माहिती असते पण सामान्य माणसाला ही गोष्ट काय आहे हेच मुळी माहित नसते.
पण तो शब्द त्याच्या कानावर सतत पडत असतो. त्यानुसार मग ती व्यक्ती आपल्याच मनाने त्याचा अर्थ लावू लागते आणि फसवली जाऊ शकते.
यासाठीच आजचा लेख. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की Hacking म्हणजे काय? खरे तर ही कोणतीही वेगळी गोष्ट नाही.
खऱ्या जीवनात देखील आपण अशा गोष्टी कायम पहात असतो.
अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर Hacking म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्याशी संबंधित माहिती मिळविणे आणि वापरणे.
जो अशी गोष्ट करतो त्याला Hacker असे म्हटले जाते. एक साधे उदाहरण देतो.
सगळ्यांनी आमिरखान आणि अजय देवगन यांचा इश्क नावाचा चित्रपट पाहिलाच असेल.
त्यात एक सीन असा आहे की आमिरखान सदाशिव अमरापूरकर सारखी वेशभूषा करून अजय देवगन सोबत बँकेत जातो.
आणि बँक म्यानेजरला आपणच अजय देवगनचे वडील आहोत असे भासवून अजय देवगनच्या खात्यातून पैसे काढतो.
यालाच कॉम्प्युटरच्या भाषेत Hacking म्हणता येईल.
कारण पैसे अजय देवगनच्याच मालकीचे आहेत पण ते त्याला काढण्याचा अधिकार नाही म्हणून आमिरखान काही वेळापुरती त्याच्या वडिलांची Identity वापरतो, पण त्यांच्या परवानगीशिवाय.
यात आमिरखानला Hacker म्हणता येईल. याच प्रमाणे पूर्वीच्या काळी जे लोक गुप्तहेर म्हणून काम करायचे तेही एक प्रकारे Hacker च होते.
आज अनेक गोष्टी computerized झाल्या आहेत. बँकेतून पैसे काढायचे असतील तरी आपल्याला तिथे जाण्याची गरज पडत नाही.
कुणाला पैसे द्यायचे असतील तरी आपण Net Banking चा वापर करून ते त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करू शकतो.
हे का शक्य होते तर त्या बँकेकडे आपली माहिती आधीच साठविलेली असते.
जेव्हा आपण त्यांना एखादा व्यवहार करण्याची आज्ञा देतो त्यावेळी ती बँक ही आज्ञा योग्य व्यक्तीकडून आलेली आहे.
याची खात्री करण्यासाठी त्यांच्याकडील उपलब्ध माहितीशी आलेल्या आज्ञेशी संबंधित माहिती पडताळून पहाते. आणि त्यांची खात्री झाल्यावर व्यवहार पूर्ण होतो.
अशा वेळी आपण स्वतः व्यवहार पूर्ण करण्यासाठी तिथे जाण्याची आवश्यकता नसते.
याचा अजून एक फायदा म्हणजे माझ्या परवानगीने माझ्या वतीने मी नेमलेला एखादा व्यक्तीही तो व्यवहार पूर्ण करू शकतो.
पण समजा एखाद्या व्यक्तीने माझी खाजगी माहिती माझ्या परवानगी शिवाय मिळविली तर त्याला Hacking म्हटले जाते.
भलेही ती माहिती त्याने कोणत्याही व्यवहारासाठी वापरली नाही तरीही… आणि अशी माहिती मिळविणारा व्यक्ती Hacker समजला जातो.
Hacker नेहमी वाईटच असतात का? मला वाटते की त्याचा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करीत आहात त्यावर तुम्ही चांगले किंवा वाईट हे ठरते.
ढोबळमानाने पाहिले तर Hacker चे मुख्यतः खालील प्रकारात वर्गीकरण केले जाते. ४, ५ आणि ६ तुमच्या साठी नक्कीच नवीन असणार.
१. Black Hat Hacker :
हे ते व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह असतात जे एखाद्या व्यक्तीची, संस्थेची किंवा सरकारी यंत्रणेची खाजगी आणि गोपनीय माहिती मिळवून त्याचा वापर स्वतःच्या आर्थिक किंवा तत्सम लाभांसाठी करतात.
या गोष्टीचा सावजावर ( victim ) काय वाईट परिणाम होईल याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते.
यात मुख्यत्वे करून संस्थेच्या कामगारांबद्दलची खाजगी तसेच गोपनीय माहिती, संस्थेची कार्यप्रणाली तसेच संस्थेच्या कार्यप्रणालीत आढळून येणाऱ्या त्रुटींवर हल्ला केला जातो.
त्यानंतर त्या संबंधित संस्थेला, व्यक्तीला किंवा सरकारी यंत्रणेला धमकीचा संदेश दिला जातो आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जाते.
किंवा मग ती माहिती इतर कुणाला पैशाच्या मोबदल्यात विकली जाते.
२. White Hat Hacker :
White Hat Hacker आणि Black Hat Hacker यांच्या कार्यप्रणालीत काहीही फरक नसतो.
ज्या पद्धतीने Black Hat Hacker काम करतात अगदी त्याच पद्धतीने हे देखील काम करतात.
दोघांचेही माहिती मिळविण्याचे तंत्र सारखेच. पण फरक कुठे येतो तर त्यांच्या माहितीच्या वापरामध्ये.
जिथे Black Hat Hacker माहितीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात तिथे हे माहितीचा उपयोग विधायक कामासाठी करतात.
अनेकदा एखाद्या संस्थेने, सरकारी यंत्रणेने किंवा व्यक्तीने देखील त्यांना त्यांच्या कार्यप्रणालीतील दोष दाखविण्यासाठी मोबदला देऊन नियुक्त केलेले असते.
आणि ज्यावेळेस हे लोक एखाद्याची माहिती hack करतात त्यावेळी त्याबद्दल आधीच त्या व्यक्तीची, समूहाची किंवा सरकारी यंत्रणेची लिखित परवानगी घेतलेली असते.
कार्यप्रणालीतील अनेक त्रुटी किंवा दोष दूर करण्यासाठी हेच लोक सगळ्यात जास्त कारणीभूत असतात.
आणि त्यांच्या कामाला Ethical Hacking असे म्हटले जाते. पुढे चालून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप वाव आहे.
एका विदेशी कंपनीने केलेल्या सर्वेनुसार फक्त भारतातच जवळपास ३० लाख Ethical Hacker ची गरज असताना प्रत्यक्ष संख्या मात्र अगदी एक लाखाच्या घरात आहे.
थोडक्यात या क्षेत्रात आज खूप संधी आहेत.