My title My title
Something Different

A relationship – एक नातं असंही (आधारवड)

A relationship – एक नातं असंही (आधारवड)



©विशाल झावरे पाटील



रविवारची सकाळ, अनिकेत मस्त लोळत बेड वर आडवा झालेला, आज जरासा आळसावलेला!


तस सॉफ्टवेअर मध्ये जॉब करणारे सगळेच शनिवार रविवार अशेच मुर्दाडासारखे पडून असतात!


त्यात नुकतंच त्याच्या टीमच रिलीज झालेलं. काल रात्री तेच सेलिब्रेशन करून तो लेट नाईट आलेला!


तो साखरझोपेतच होता तेच त्याची लाडाची लेक मुग्धा आली धावत आणि बसली अंगावर, घोडा घोडा चालू झाला!


तसा अनिकेत पण आळस झटकून मस्त लहान होऊन मुग्धा सबोत धिंगाणा घालू लागला! अनिकेत ची बायको सई ही हे पाहून सुखावली!


विचार करू लागली :’एवढ्यात अनिकेत किती बदलला ना,नेहमी चिडचिड करणारा अनु आता खूप हसतमुख झालाय! ‘


अनिकेत उठला ;आवरून हॉल मध्ये आला,चहाची वाट पाहत मोबाईल खेळत बसला, स्कूल ग्रुपवर पिंकी ने एक सॉंग सेंड केलेलं! ते प्ले केलं अन मस्त मूड झाला त्याचा!


‘पिंकी त्याची स्कूलमेट! पाचवी ते बारावी दोघे एकाच वर्गात! सरस्वती विद्या मंदिर!


पिंकी छोटीशी, नाजूकशी, थोडे कुरळे केस,नेहमी एक वेणी घालणारी, स्वच्छ इस्त्री केलेला युनिफॉर्म, गोरी, सरळ नाक,काळेभोर बोलके डोळे असलेली!


पण बरीचशी शांत, सहसा हसत नसे,पण हसली की एक दात मोत्याप्रमाणे चमकून दिसे,गम्मत वाटे तिला पाहताना! अभ्यासात व्यवस्थित,अक्षर अगदीच छान, त्यात चित्रकला आवडता विषय!


कधी कुठलं फंक्शन असेल तर पंजाबी ड्रेस असे,तोही दोन्ही साईडने पिनअप केलेली ओढणी असलेला. नेहमी तिचे वडील स्कुटर वरून सोडवायला येत आणि न्यायला ही!


मैत्रिणीनंमध्ये रमे थोडी पण मुलांमध्ये फार मिक्स होत नसे, वडील मिलिटरी रिटायर्ड होते आणि आता बँक मध्ये नोकरीला होते, घरात फार शिस्तीच वातावरण असेल असा अंदाज.


तिचा 11 विचा एक किस्सा आठवतो, नवीनच सायन्स साईड, त्याच जरा टेन्शन, त्यात बायोच लेक्चर,खडूस सर, त्यांनी प्रॅक्टिकल मध्ये हार्ट ची डायग्राम सांगितली काढायला.


ती हिने इतकी हुबेहूब काढली की सर म्हणे तू कॉपी केली,ती मान्य करायला तयारच होईना,सर पण ऐकेना, त्यांनी पुस्तकातील ती डायग्राम तिने काढली त्यावर ठेवून दाखवली.

तर अगदी हुबेहूब, पण ती ऐकेना, ती बोलली थांबा परत काढून दाखवते, आणि 10च मिनिटात तिने परत हुबेहूब काढून दाखवली आणि सरांचं तोंड बंद केलं!


बारावीत असताना अचानक तिच्या वडिलांचं हार्ट ऍटॅक ने निधन झालं, आम्ही बरेच बॅचमेट तिच्या घरी जाऊन आलो.


बारावी झाली तशी परत कित्येक वर्षे तिची भेट नाही! कधी आठवणही नाही. दहा बारा बर्षांने सगळ्यांच होत तसं आमच्या बॅच च्या मुलांमध्येही री युनियन चे वारे वाहू लागले!


मग कोण कोण कुणाच्या टच मध्ये आहे,कुणाकडून कुणाचे कॉन्टॅक्ट मिळतील याचे तपशील तयार झाले, आमची 63 जणांची बॅच. सगळे सापडले, कोण पुण्यातच तर कोण फॉरेन ला!


व्हाट्सअप्प ग्रुप झाला,गप्पा रंगल्या,जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जुने क्रश भेटले! भेटण्याची ओढ वाढली, मग दिवस ठरला,सगळ्यांनी येण्याचं प्रॉमिस केलं! आणि सगळे सकाळी रिसॉर्ट वर वेळे आधी हजर झाले!


वन बाय वन ओळख परेड चालू झाली आणि पिंकी उभी राहिली! सगळे आवक होऊन तिच्या कडे पाहू लागले,तिला ऐकू लागले ,मनोमन विचार करू लागले हीच का ती शांत पिंकी???


आज तर नुसतं उसळतं खळखळतं व्यक्तिमत्त्व बनली होती! इतका बदल?? मस्त हेअरस्टाईल, वन पीस मध्ये आलेली पिंकी!!! आज ती डॉ मिसेस अदिती यादव म्हणून मिरवत होती! हसत होती ,खिदळत होती,गप्पा गोष्टी करत होती!


पुण्यातच होती, अगदी अनिकेत च्या घरा जवळच तीच आयुर्वेदिक क्लिनिक होतं, तिचे पती डॉ केशव यादव , प्रख्यात अस्थिरोगतज्ञ! त्यांचं स्वतःच हॉस्पिटल! पिंकी ला एक मुलगा!


जेवणं झाली आणि अनिकेत निवांत ड्रिंक घेत बसला होता, पिंकी त्याकडे आली, हातात रेड वाइन चा ग्लास!
जुजबी बोलणं झालं त्यांमध्ये!


पण अनिकेत तिच्याकडे पाहतच राहिला! किती मस्त वाटलं त्याला तिच्याशी बोलून!
मनोमन विचार करू लागला : ‘अबोल कळी आज किती सुगंध देऊन गेली! ‘


सगळे तशे सुखावले खूप वर्षांनी भेटत होते ना.
अनिकेत! उंचा पुरा, जिम ने कमावलेलं पिळदार शरीर, सावळा पण आकर्षक चेहरा! बोलणं मधुर पण मोजकं!


अनिकेत ला आधी पासून कंम्पुटर इंजिनिअरिंग करायचं होतं! आणि त्याने ते केलं ही! 2 वर्ष फॉरेन ला जॉब करून आला, आईच्या इच्छेनुसार मामाच्या मुलीशी लग्न ही झालं!


पण दोघांच्या विचारात फार तफावत, ती खेड्यात वाढलेली हा शहरात, तिने कधी गाव सोडलं नव्हतं तर हा विदेश फिरून आलेला, तिला जॉब नव्हता, थोडी संकुचित विचारसरणी होती, हायफाय कल्चरशी ती रुळलेली नव्हती!


त्यातून सई ला थोडी इनसेक्युरी येऊ लागली! अनिकेत चे बाबा रिटायर झाले आणि मग गावाकडे मस्त फार्महाऊस बांधून तिकडे शेतात रमले!


अनिकेत आणि सई दोघे पुण्यात,मग मुग्धा झाली, त्याचा जीव की प्राण ती! सई अनिकेत चे खूप खटके उडत, तेही अगदी क्षुल्लक कारणांनी पण मुग्धा मुळे तो खुश असे!


सईच वागणं त्याला खूप खटके, त्याचा मोबाईल चोरून चेक करणे, मित्रांकडे त्याची चौकशी करणे, विनाकारण ऑफिसमध्ये जाऊन पाहणे की तो आहे का?


याने त्याला फार मनस्ताप होई! पण आपलेच दात अन आपलेच ओठ! काय करणार! आहे तो दिवस कामात व्यस्त जाई, घरी आल की कटकट होई, मुग्धा काय तो त्याला विरंगुळा!


सई च्या किटी पार्ट्या, भिशी, मैत्रिणींसोबत औटिंग! आणि नवऱ्यावर संशय! अस वर्षानुवर्षे चालू होतं!


एका संध्याकाळी अनिकेत सहज चक्कर मारावी म्हणून पायीच निघाला अन पिंकीच्या क्लिनिक समोरून जाताना वाटलं चला ही असेल तर भेटावं!


आत गेलो तर खूपच मस्त अस तीच क्लिनिक होत!

अगदी अद्ययावत आणि टापटीप आणि नीटनेटकं,अगदी प्रसन्न वातावरण, धुपाचा सुगंध! तिने काढलेले सुंदर पैंटिंग्ज तिथे वॉल वर लावले होते! छानसं देवघर ज्यात वडिलांचा फोटो!
रिसेशपशनिस्ट ला सांगितलं तर मॅडम आत काही वाचत बसल्या होत्या!

पिंक कलर चा छानसा टॉप,त्यावर डॉक्टरच ऍप्रन , चेहऱ्याला खुलून दिसेल असा चष्मा, एक केसांची बट मस्त गालावर रुळलेली, मंद स्वरात गाणं ऐकू येत होतं, ती मस्त एकाग्र होऊन पुस्तक वाचत होती!

मी आहे कळलं तर सरळ बाहेर येऊन मस्त हसत स्वागत केलं अन केबिन मध्ये जाऊन बसलो!


अनिकेत (थोडा संकोचून ): पिंकी एक विचारू?
पिंकी: हेच ना तुझ्यात इतका बदल कसा?
अनिकेत: हो तेच ते!


पिंकी: अरे अळी किती दिवस कोशात राहणार ! त्याच फुलपाखरू होणारच की कधी न कधी! केशव चा परिसस्पर्श झाला अन या सुरवंटाच फुलपाखरू झालं!


तू तर मला लहानपणापासून पाहत आलाय,लाजरी बुजरी,धाकात अन शिस्तीत वाढलेली पोर मी.

अभ्यास भला आणि आपलं घर भलं.

अचानक पप्पा गेले अन सगळं कोलमडल, नेमकी आपली बारावी होती,पपांच स्वप्न होत डॉक्टर व्हावं, पण त्यांच्या जाण्याचा धक्का पचवू शकलो नाही आम्ही.

मानसिक दृष्ट्या तर खचलोच पण आर्थिक दृष्ट्या ही कोलमडलो, आपले आपले म्हणणारे अनोळखी वाटू लागले, आईची ओढाताण होऊ लागली.

नवऱ्याचं दुःख बाजूला सारून ती संसाराचा गाडा ओढायला सज्ज झाली, दादा आणि माझं शिक्षण बाकी होतं, पापांची पेन्शन आणि तिला जमेल ते काम करून ती आमचं सगळं हवं नको पाहू लागली.

तिच्या मनाची घालमेल मला पाहवत नव्हती, या सगळ्यात थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं, MBBS ला नंबर लागेना, पेमेंट सीट वर मिळत होत पण पैसे नव्हते!


मग BAMS ला गेले!


आणि मला खूप छान वाटलं, संस्कृत मला आवडत होत, मन लावून शिकले, छान मार्क मिळाले!


कुठेतरी थोडा आर्थिक तणाव आणि नातेवाईक,पै पाहुणे,मित्र परिवार यांकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीमुळे आम्ही सगळेच थोडे अलिप्त राहू लागलो. घर भलं अन अभ्यास!


मग इंटर्नशिप ला लोकमंगल हॉस्पिटलला जॉईन झाले. आणि तिथे हे महाशय भेटले डॉ केशव यादव!


दिसायला साधा सुधा, गव्हाळ वर्ण, सडसडीत, चष्मा असलेला , MS ORtho करत होता.


नुसता गप्पा,मस्ती,चेष्टा, मस्करी, पेशंट असो, त्यांचे नातेवाईक असोत, नर्स असो वा वॉर्ड बॉय, अगदी सिनिअर डॉक्टर असोत,कुणालाच सोडत नसे! सगळ्यांची खेचत असे; अन विशेष म्हणजे सगळे त्याला खेचू देत असत.


मला आय सी यु मध्ये नाईट ड्युटी होती. आणि नेमकी याची पण! माझा अन याचा अगदीच परिचय नव्हता.


पहाटे पहाटे थोडं निवांत झाले अन टेबल वर डोकं ठेवलं ,डोळा कधी लागला ते कळलं नाही, अचानक हाताला चटका बसला म्हणून दचकून उठले तर समोर हा उभा. हातात दोन कॉफी चे कप.


अरे माझ्या हाताला चक्क चटका दिला याने कॉफ़ी चा! आणि वर म्हणे: “मॅडम कॉफ़ी घ्या आणि जाग्या व्हा, तुमच्या डुलकीने इथे पेशंट ला कायमची डुलकी लागेल! “


आणि हसला मोठ्याने. म्हटलं हा कसला आगाऊपणा! असला झापला ना, म्हटलं:’ असाल सिनिअर, तुमच्या मर्यादेत रहा! मी माझं काम चोख केलं आहे! करते आहे!करत राहणार आहे! तुमच्या फुकट सल्याची गरज नाही!’


खांदे उडवून हसला आणि म्हणे: ‘राहिलं बुआ!’
तशीच उठले आणि मेट्रन कडे गेले तक्रार करायला! त्या बोलल्या की “बस, शांत हो, नवीन नवीन सगळ्यांचा त्या बद्दल असा गैरसमज होतोच होतो. पण केशव चांगला मुलगा आहे. तू गैरसमज करून घेऊ नकोस.


खूप काही सोसलंय त्याने. तरी हसतो अन सगळ्यांना हसवतो. तरी मी सांगेल त्याला तुझ्याशी जास्त इंटररियाकट न व्हायला!”
मीपण थोडी शांत झाले. त्याला नंतर अनेक दिवस त्याला असच निरखत असे,पण अंतर ठेऊनच.


चेष्टा मस्करी करे तो पण त्यात थिल्लरपणा नसे, एका विशिष्ट दर्जाचे अगदी दाद द्यावी अशे विनोद असत. कामात म्हणशील तर प्रमाणापेक्षा जास्त काटेकोर,शिकायला उत्तचुक, मदतीला तत्पर , नेहमी एनर्जी ने भरून;भरून नाही ओसंडून वाहत असलेला!


अनिकेत:’ म्हणजे तू असतेस तशीच!’
पिंकी:’ हो आत्ता असते तशी पण आधी कुठे अशी होते! कामात मी परफेक्ट असे, शंकांचं नाही,पण चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले!
त्याने माझं नाव ठेवलं होतं : लेडी जमदग्नी!
बोल आता आहे की नाही परफेक्ट नाव.


मला कळलं तेव्हा राग कमी अन हसू जास्त आलं. कॅन्टीन मध्ये बसला तरी त्या भोबती आपोआप 4 मानस जमत, खातो कमी आणि गप्पाच जास्त. किस्सेच किस्से! खरे किती खोटे किती माहीत नाही!


एकदा मी कॅन्टीन मध्ये बसलेले ,जेवण उरकून ड्युटीला पळायची घाई नव्हती. सहज शेजारी लक्ष गेलं तर हा माणूस आज एकटाच बसला होता टेबल वर डोकं टेकवून. म्हटलं परतफेड तो बनती है!


कॉफ़ी चे 2 कप घेतले आणि दिला त्याला चटका! टनकन उडाला😉. पाहते तर मलाच धक्का बसला. त्याचे डोळे रडून लाल झालेले होते. मलाच अपराध्यासारखं झालं! सॉरी सॉरी म्हणू लागले!
तर बाबा म्हणतोय: सॉरी का? आना मॅडम ती कॉफ़ी इकडं; लेडी जमदग्नी ची कॉफ़ी मिळायला पण पुण्य लागतं.अन खळखळून हसला!


काय रसायन असेल हे काही कळायला मार्गच नाही.
विचारलं ‘काय झालं? का रडत होतात!’


म्हणाला: ‘काही नाही रे ! आज रिझल्ट आला! MS पूर्ण झालं! बाप खुश असेल म्हणून डोळे मिटून बोलत होतो त्यांसोबत, कधी पाणी आलं त्यातून कळलं नाही! साला हे डोळे पण आपले नसतात,नकळत धोका देतात.’


माझं कंफ्युजन लक्षात आलं त्याच्या मग बोलला: ‘अरे वडील नाहीत मला, 12 वर्ष झाली जाऊन, एकसिडेंट झालेला त्यांचा.


वेळीच योग्य उपचार मिळाले नाहीत, आर्थिक परिस्थिती बेताची, योग्य सल्ला देणारं कुणी सुशिक्षित आजूबाजूला नाही, कमावलं ते सगळं त्यांना नीट करण्यात गेलं पण ते काही वाचू शकले नाही!


तेव्हाच ठरवलं होईल तर डॉक्टरच. जिद्दीला कारण लागतच! मला मिळालं:माझा बाप नाही वाचवू शकलो! पण कुणाचा बाप मरू द्यायचा नाही!


आज तेच त्यांना सांगत होतो! आज पास झालो आता अधिकृत बाप बचाव मोहिम चालू! “आणि मनमोकळा हसला.
का कुणास ठाऊक ते हसणं काळीज चिरून गेलं.


मेट्रन बोलली ते सगळं आज कळलं.
त्याबद्दल आदर वाढला!


आता मी अंतर कमी करायचं ठरवलं. गप्पा टप्पा होऊ लागल्या. जाणवलं की हा उथळ नाही तर अथांग आहे!


दोघे तशे समदुःखी. वडिलांचं छत्र नाही, आर्थिक परिस्थिती बेताची. माझी जरा बरी पण हा तर कमवा आणि शिका मधून आलेला!


बाग काम,गाड्या धुणे, अगदी श्रीमंतांची कुत्री सांभाळणे ,पडेल ते काम करून त्यात मजा घेऊन, हसत खेळत सगळं पुढे नेणारा! स्वतः तर हसत होता पण आजूबाजूचं जग आनंदी ठेवत होता!


‘कसं जमत रे तुला ‘; विचारलं की म्हणे: “माझा टेन्शन मधला चेहरा आईने पाहिला की तिचा बांध फुटत असे!


तिला सावरताना खोटं हसायला शिकलो,मग कळलं खरं हसलो तर क्या बात है! अन खरंच; आहे त्यात खरं हसता यायला लागलं!

म्हटलं आपण तर सेल्फीश झालो; आपल्याला जमलं मग इतरांना नको का हसवायला. मग छंद जडला! हसवायचा!


आता सांग इथे पेशंट येतात ते आजारपणाच टेन्शन घेऊन,नातेवाईक येतात ते आपलं पेशंट नीट होईल,पैसे पुरतील का या टेन्शन मध्ये.


हॉस्पिटल स्टाफ रिस्की ड्युटी करून करून टेन्शन मध्ये, आपले सिनिअर हा हॉस्पिटल चा डोलारा सांभाळण्याच्या टेन्शनमध्ये, आणि आपला अन टेन्शनचा छत्तीस चा आकडा.


मी असेल तर तिथे त्याला चान्स नाही, मग सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी चेष्टा मस्करी चालूच असते!
प्रत्येक पेशंटमध्ये मी माझाच बाप शोधतो,तो बराच व्हायला हवा या हट्टाने पेटून उठतो,प्रसंगी 24 तास काम करावं लागलं तरी पर्वा नाही,मग मला थकवा ही जाणवत नाही………
असच काहीसं नेहमी सांगत असतो…..
कळतं नकळत मीपण कधी हसायला लागले कळलं नाही!


त्याला कुठून कळलं मी छान चित्र काढते माहीत नाही! आला अन म्हणे: लेडी जमदग्नी मला एक पोट्रेट हवंय तुझ्याकडून! माझ्या वडिलांचं चित्र! तो वर्णन करत राहिला अन मी काढत राहिले!


आणि ते चित्र पाहून तो वेड्यासारखा अख्या हॉस्पिटलमध्ये पळत सुटला,जो दिसेल त्याला तो ते दाखवी अन म्हणे जमदग्नीच्या हातात जादू आहे राव: बाप जिवंत केला तिने कागदावर!

पळून पळून दमला आणि माझ्या समोर येऊन बसला! हात हातात घेतले आणि म्हणे: “ये हात मुझे देदे ठाकूर!”
कशाला???
तर बोलतो मला ऑपरेशन सोडून कोणती कला येत नाही आणि तुला हे येऊन तू काही करत नाही! म्हटलं दाखवावं जगाला या हाताची जादू!
खूप कौतुक वाटलं मला त्या दिवशी जेव्हा ते चित्र पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं!


मग मीपण वेड्यासारखी खूप चित्र काढत राहिले, अगदी विसरून गेलेला माझा छंद अन सूर पुन्हा गवसला मला!
खूप वर्ष लागली मला हे कळायला की त्याने ते मुद्दाम घडवून आणल होत माझ्यातला कलावंत बाहेर काढण्यासाठी!


माझी पण इंटर्नशिप संपत आली. पुढे काय करावं या द्विधा मनस्थितीत होती. मी त्याला विचारलं “काय करू रे आयलोपॅथी की आयुर्वेद”?? बोलला “खरं सांगू : आयुर्वेद!
महान आहे ते! जतन करावं असं! अमूल्य!”
मलाही तेच वाटत होतं!


ठरलं!
मग मी आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये शिक्षण चालू केलं! भेट होत असे आमची वरचेवर. तो ही जॉब करत होता. घरी लग्नाचे वारे वाहू लागले! आईने विचारलं ‘कुणी आहे का तुझ्या आयुष्यात!

‘म्हटलं ‘नाही असं कुणी, पण हा असेल तर मला आवडेल.’ त्याला मी आवडेल का?

तर मला वाटलं नाही आवडणार! पण म्हटलं विचारून पाहावं!

आईचा विरोध असण्याचं कारण नव्हत! त्याला कॉल केला,भेटलो,बोललो,मी विचारलं! तो मनसोक्त हसला!


म्हणे: “माझी तक्रार करायला मेट्रन कडे जाणारी ते मला लग्न करतोस का विचारणारी! प्रवास फारच वेगवान झाला.”
आईशी बोलून सांगतो बोलला आणि झालं आमचं लग्न!


त्याने मला जगणं शिकवलं! रोज शिकवतो! प्रचंड आशावाद काय असतो हे मी रोज डोळ्याने पाहते, त्या इतकी नाही पण दहा टक्के जरी त्यासारखं जमलं तरी खूप झालं मानते!


तो त्याच हॉस्पिटल मी माझं क्लिनिक . 1 मुलगा आहे, मला त्याला वेळ देता यावा म्हणून मी 4 तास असते इथे, मग माझा रिसर्च, संसार आणि छंद! मज्जा चालू असते! “


अनिकेत लहान मूल होऊन हे ऐकत होता! केशवने पिंकीला कसे पैलू पाडले हे अनुभवत होता! अर्थात पिंकी हिराच होती म्हणून तो पैलू पाडू शकला!


त्याला आता त्याची सई आठवली! भानावर आला!
पिंकी ने बरोबर ताडल . “दाल मे कुछ काला है!”
पण तिने काही विचारलं नाही! ती वाट पाहत होती अनिकेत होऊन काही सांगतोय का.ओपन होतोय का.
पिंकी: तुझा संसार काय म्हणतोय! सगळे कशे आहेत.


मग अनिकेत ने आपली राम कहाणी सांगितली.
त्यावर ती हसून इतकंच म्हणाली: त्यात काय एवढं विशेष. शंभरातल्या नव्वद बायका अश्याच असतात रे. त्यांचं जग आपल्या संसारपूरत मर्यादित असतं.

आता तू हाऊसवाईफ निवडलीस तेव्हा हे तुझ्या लक्षात यायला हवं होतं!


ती शंका का घेते याचा बारीक विचार जर तू सुरवातीलाच केला असतास ना तर इतकी वर्षे वाया गेली नसती तुमची. तीच जग म्हणजे काय? तर तू अन आता मुग्धा.

आधी तर फक्त तूच.

मग तिला जर वाटलं की याने फक्त माझं असावं,माझ्या जवळ असावं, माझ्याच जवळ व्यक्त व्हावं. तर तीच काय चुकलं?


कारण ती फक्त तुझी, गप्पा मारायला ही फक्त तू. कारण इथे ना तिचे आईवडील ना मित्र मैत्रिणी. त्यात ती खेड्यातून आलेली. तिथे फार स्वातंत्र्य नाही, तुझं सो कॉल्ड मेट्रोपोलिटंट कल्चर तिच्या आवाक्याबाहेरच!


तिला ते आत्मसाद होईना अन तुला ते कळेना! तिची नक्कीच यात घुसमट झाली असणार, न्यूनगंड आला असणार! त्यातून शंकेने जन्म घेतला असणार!


मग तो भस्मासुर मोठा झाला असणार, त्यात तू तिला सावरण्याऐवजी तिच्यावर चिडचिड करत बसलास! त्याने त्या भस्मासुरला अजून खतपाणी मिळालं असणार; आता बसलाय मग तो मानगुटीवर!


“मी सांगते ते करशील? “
अनिकेत ने मोहिनी व्हावी तशी मान डोलावली.


पिंकी: तू तिला बदलण्याचा प्रयत्न करत बसू नकोस! तूच थोडे सोपे बदल करून घे! ती आहे तशी छानच असेल ना. मामाची मुलगी म्हणजे लहानपनापासून माहीतच असेल की.


तू चिडचिड बंद कर. मजेत रहा. घरी वेळ दे. तिला समजून घे, कामात थोडीशी मदत करत जा. ऑफिस मधून 2, 3 वेळा तिला कॉल करत जा.

घरी ऑफिसच्या गप्पा मारत जा. तिला थोडं मनमोकळ बोलतं कर. नक्की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघ!”


अनिकेतलाही पटलं की आपण सईला समजून घेण्यात कमी पडलो .
हळू हळू तो बदलू लागला, पिंकी सोबत गप्पा वाढू लागल्या! ती त्याची आयडॉल बनली होती. कोणतीही अडचण ती सहज सोपी करून सोडवत असे! ती आधारवड वाटू लागली! पिंकी सोबत आहे म्हणजे नो टेन्शन.
अनिकेत तिच्या कडे थोडा आकर्षित होऊ लागला!
एकदा कॉफी ला भेटले असता तो पिंकी ला म्हणाला: मला ना एक गिल्ट आहे!
पिंकी: मी तुला आवडायला लागले याचं??
अनिकेत ताडकन उडाला.


कारण पिंकी ने त्याचं मन अचूक ओळखलं.पण ती अगदी शांतपणे हे कसं काय बोलू शकली याच त्याला आश्चर्य.
पिंकी ने ते आश्चर्य पण ओळखलं!


पिंकी: त्यात काय विशेष आहे रे. मी आहेच की अवडण्यासारखी. तुला काय कुणालाही आवडू शकते.
तुला गिल्ट आहे यातच तुझे संस्कार दिसले.


मी आवडणं,माझा सहवास आवडणं आणि मला भोगण्याची इच्छा निर्माण होणं या भिन्न गोष्टी झाल्या. तुझ्या मनात हे नाही हे मी खात्रीने सांगू शकते.


तितकं जानवण्या इतका सेन्स आहे मला. तस जाणवलं असत तर हे फुलपाखरू कधीच कोशात गेलं असतं.


प्राजक्ताचा सडा केशवच्या दारात पडला तरी त्याच्या सुवासाने अनेक अनिकेत मोहरू शकतात हे सत्य ना प्राजक्त ने नाकारल ना केशव ने!!!!


अनिकेत पुन्हा सुन्न……..
परिस्थितीतुन केशव घडला….
केशवने पिंकी घडवली……
पिंकी ने अनिकेत……
अनिकेत ने सई……..
सिलसिला आज भी जारी है……..
कोश भेदून सुरवंट फुलपाखरू होऊ पाहतंय…….



लेख आवडला तर

जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

©विशाल झावरे पाटील

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button