
ती…!!
©विशाल झावरे पाटील
निसर्गाच्या कुशीत रमलेल्या एका टुमदार गावी एका बागायतदार शिक्षकाच्या पोटी तिचा जन्म झाला!!
पहिलीच कन्या झाल्याने तिचे आई वडील खूप खूश झाले…
लाडाकोडात पण संस्कारांच्या धाकात ती वाढत होती!
एका मर्यादेत तिचे सगळे हट्ट पूर्ण होत होते…
सधन सुसंस्कृत कुटुंबात ती वाढत होती,घडत होती,फुलत होती…
नंतर तिला एक भाऊ झाला!
छानसं कुटुंब आनंदाने नांदू लागले…
लहानपणापासून तिला गोड फार आवडे…
त्यातल्या त्यात साजूक तुपातला मुग डाळीचा शिरा!
ती हट्टाने आईकडून बनवून घेई…
अगदी रोज दिला तरी चालेल इतका आवडे…
तिची आई सुशिक्षीत गृहिणी…
ती सांगे आवडत असेल तरी पचायला जड…
सारखं खाऊ नये…
पण हट… आईच कोण ऐकतं…
भाऊ ने तर तीच नावच ठेवलं: ये मूग डाळीचा शिरा…!
झालीच तिची आणि भाऊची भांडणं…
शाळा संपली अन ती पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या गावी आली…
कुणीही जिल्हाच्या गावी जाणार असेल तर आई तिला कॉल करे,
“डब्यात काय देऊ?”
उत्तर ठरलेलं असे,
“पहिले मूग डाळीचा शिरा आणि मग आई तुला आवडेल ते!!”
हॉस्टेलला मैत्रिणींना पण एव्हाना माहीत झालं की जसं राक्षसाचा जीव त्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटात तसा तिचा जीव शिऱ्यात!
चांगल्या मार्कांनी ती Msc पास झाली…
सुट्टीत आई तिच्या कडून घरातली सगळी कामं करवून घेत असे! स्वयंपाक शिकवत असे…. म्हणे लेकीच्या जातीला सगळं यायला हवं… सासरी कुणी म्हणायला नको की हिला काही येत नाही….
ती पण सगळं आवडीने करे!!
आता घरच्यांना वेध लागले तिच्या लग्नाचे…
आणि छान योगायोग जुळून आले… छत्तीसच्या छत्तीस गुण जुळले…
अनुरूप जोडी…
तो इंजिनिअर…
छान नोकरी,घरचे सुशिक्षित…
ठरलं!!
तयारी, लगबग चालु झाली.
घरात चर्चेच्या मैफिली बसू लागल्या…
मंगल कार्यालय,कपडे,दागिने,पाहुण्यांची यादी…. अन जेवणाचा मेनू… भाऊ बोलला,
“बाकी काहीही नसलं तरी चालेल पण मूग डाळ शिरा हवाच” 🤣🤣🤣🤪
आणि तिच्यासह सगळे मोठ्याने हसले…
वडिलांनी साऱ्या वऱ्हाडाला लेकीचा आवडता साजुप तुपातला शिरा पोट भर खाऊ घातला…
लेक खुश अन बापही!
आईने तिला खूप काही शिकवून पाठवलं होतं सासरी…. संस्कारांची शिदोरी…
नवीन घर,नवीन माणसं, ती भिती,हुरहूर अन नवीन संसाराची स्वप्न!!
नव्याचे नऊ दिवस छान गेले…
ती सर्वांचं सगळं मन लावून करत होती…
रोज नाश्त्याला, जेवणात सगळ्यांची आवड निवड जपे…
अगदी tv पहायला बसले तरी बाकीच्यांच्या आवडीचं चॅनेल लावत असे…
कधी ठरलं की आज तुझ्या आवडीचं कर खायला…. तर हमखास काय करत असेल बरं??
राईट…. शिरा!!!
बाकीच्यांच्या आवडी वेगळ्या वेगळ्या… कधी मिसळ,तर कधी इडली,तर कधी थालीपीठ…
पण इथे एकच…
शिरा!!
सगळे डायनिंग टेबलवर तिचा चवदार शिरा खात होते आणि सासूआई थोडंस कुत्सित बोलल्या,
” काय बाई दर वेळी हिचा साजूक तुपातला मूग डाळीचा शिरा…जसं हिच्या बापाने कधी खाऊच घातला नाही वाटतं!!!!”
सगळे मस्त हसले!
ती काहीच बोलली नाही….
पण परत तिने कधीच शिरा खाल्ला नाही…
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
RELATED POSTS
View all
